तिळारी ‘ओव्हरफ्लो’; सावधानता बाळगा!

शापोराकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना


22nd June 2021, 11:53 pm
तिळारी ‘ओव्हरफ्लो’; सावधानता बाळगा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोडामार्गातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी शिखर स्तरापर्यंत पोहोचली आहे. या पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर शापोरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्यामुळे शापोरा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, अशी सूचना डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी जारी केली आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिळारी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी शिखर स्तरापर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत तेथून पाण्याचा कधीही विसर्ग सुरू होऊ शकतो. विसर्ग झाल्यानंतर तिळारीसह गोव्यातील शापोरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्याचा फटका नदी किनारच्या रहिवाशांना बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे. नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन मामलेदार पंडित यांनी केले आहे.
..............................................
गतवर्षी आला होता पूर
गेल्या वर्षी तिळारीतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर शापोरा नदीला पूर आला होता. त्याचा मोठा फटका बार्देश, डिचोली आणि सत्तरीतील गावांना बसला होता. अनेकांचे संसार वाहून गेले होते. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक नागरिकांना स्थलांतरितही व्हावे लागले होते. तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा