Goan Varta News Ad

सत्तरीचे रणमाले

रणमाले हे लोकनाट्य स्थानिक जीवनाचे प्रतिबिंब मांडणारे प्रभावी माध्यम आहे. अतिशय सफाईदारपणे सादर होणाऱ्या या लोकनाट्याची खरी रंगत मात्र ‘धोंगा’ तच असते. अशा या लोकनाट्याचे संवर्धन ही काळाचीच गरज आहे.

Story: शशिकांत पुनाजी |
06th June 2021, 12:04 Hrs
सत्तरीचे रणमाले
आपल्याकडे अनेक लोकनाट्याचे प्रकार आहेत. ‘जागोर’ हा त्यातील प्रामुख्याने सर्वसामान्यांना परिचित असला तरी आपल्याकडे ‘पेरणी जागर’, ‘ खेळ तियात्र’,  ‘दशावतारी काला’ हेही लोकनाट्य प्रकार तेवढेच प्रचलित आहेत. गोव्याच्या उत्तरेकडील तालुक्यात वार्षिक देवस्थानाच्या जत्रोत्सवानिमित्त दशावतारी नाटके सादर होतात. नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळ यात लोकप्रिय. कोकणात दशावतारी नाटक मंडळी या दिवसात शेतीच्या कामात दंग असतात. शेतीची ही कामे झाली की, त्यांच्या दशावतारी नाटकाच्या पुर्वतयारीला आरंभ होतो.सत्तरी तालुक्यात ‘रणमाले’ हे लोकनाट्य सादर केले जाते. दोन वर्षांपूर्वी कंरोजाळे येथे पहिल्या कोंकणी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक रात्र मुक्काम करण्याचा योग आला, त्यावेळी ‘रणमाले’ च्या पुर्वरंगाची झलक येथील लोककलाकारांकडून पहायला मिळाली. आमचे मित्र झिलू गांवकर यांनी लिहिलेले ‘रणमाले : स्वरूप दर्शन’ हे  पुस्तक वाचले होते. या पुस्तकाद्वारे रणमाले समजून घेता आले. रणमाले हे लोकनाट्य स्थानिक जीवनाचे प्रतिबिंब मांडणारे प्रभावी माध्यम आहे. रणमाल्याचे सादरीकरण पाच स्तरावर होते. ‘मांडभरवण’, ‘पुर्वरंग’ ‘मध्यरंग’ ‘उत्तरंग’ आणि ‘गोंधळ’. मुळात लोकनाट्याचे लोकगीत, लोककथा, लोकनाट्य, लोकसंगीत व लोकनृत्य हे प्राण मानले जातात.पूर्वी सत्तरी व पलीकडच्या परिसरात ‘हेब्बार’ नावाची भिल्ल जमात रहायची. सत्तरीबरोबर ‘शिरगें’, ‘ मांगेली’ इथेही रणमाले सादर होतात. ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्थेने रणमाल्याचे संवर्धन व विकास व्हावा या उद्देशाने २००८ ते २०१६ सालापर्यंत ‘रणमाले महोत्सव’ आयोजित केले होते. त्या निमित्ताने रणमालेतील जत व धोंग यावर चर्चा व्हायची. आज त्यात खंड पडल्याचे दिसते. कवी महादेव गांवकर हे मात्र दरवर्षी मोठ्या उत्साहाने रणमाल्यात स्वत: सहभागी होतात. यंदा त्यानी ऐन करोना महामारीच्या सुरवातीच्या काळात होंडा व मावशी येथे रणमाले सादर केले. रणमाल्यातील ‘धोंग’ हा प्रकार खूप मनोरंजन करणारा असतो. तसेच गावातील घडामोडींवर आधारित असतो. ‘धोंग’ सादर करणारा कलाकार शीघ्र कवी व हजरजबाबी असायला हवा, त्याचबरोबर विनोदातून समाजाचे विद्रुप रूप प्रतिबिंबित करण्याची कुवत त्याच्याकडे असायला हवी. इथे लिखित काहीच नसते, वेळ प्रसंग पाहून आपले संवाद बोलायचे असतात.रणमालेवर मराठी, कानडी लोककलांचा प्रभाव पहायला मिळतो. रणमाल्यातील ‘धोंगा’ म्हणजेच संवगे याचा विचार केल्यास त्यांना बराच अभ्यास करावा लागतो. श्री गणेश वंदना सादर झाल्यानंतर रणमाल्यातील ‘नेटयो’ हे पात्र रंगमंचावर येते. हे पात्र  ‘गानेली’ म्हणजेच जे गानवृंद आहे त्यांच्याशी संवाद साधते.या रणमालेत ‘भट’, ‘नेटयो’, ‘लकिचा हिरवा पाला’ ‘गोया संबळ वाजता’, ‘कुल्लेकार’, ‘नुस्तेकार’, ‘क्रिस्तांव’, ‘चोट्टे’, ’ कुणबी’, ‘तारी’,’बोगार’(कलयकार), ‘म्हालो’ अशी अनेक पात्र येतात. पूर्वी ‘कलयकार’ हा गावात यायचा व पितळीच्या भांड्याना ‘कलय’ काढायचा. या बोगाराची फिरकी घेताना प्रेक्षक हळूच विचारतात तू आमच्या आल्युमिनियम तोपाला कलय काढून देतोस कां?सूत्रधार हा रणमाल्यातील प्रमुख तसेच विशेष प्रकारच्या आवाजाची झांज हा रणमाल्याचा प्राण. सूत्रधार नाटक पुढे नेतो. ‘रणमाले’ हे एक प्रायोगिक रंगभूमीकडे झुकणारे लोकनाट्य आहे. नेपथ्या अभावी केवळ ‘गानेली’ (गानवृंद) च्या आधारे दृश्यबदल होताना या नाटकाची रंगत वाढत जाते.जयदेव जयदेव जय म्हाजे बायलेबारा वर्सां जाली बैल म्हाजे व्हावलेहेका नागोवन तेका नागोवनचवथीची परब गा केलीरांदतली बावडी चवथी दिसा मेली.सारख्या मार्मिक काव्यातून ग्रामीण भागात कर्ज घेऊन चतुर्थी मोठ्या थाटा - माटात साजरी करण्याच्या परंपरेवर ओरखडा या रणमाल्यात पहायला मिळतो. गणेशवंदना, सरस्वती स्तवन या संपन्न झाल्यानंतर रामायणातील रामाच्या वनवासाची ‘वेनसाची’ जत सुरू होते. अतिशय सफाईदारपणे सादर होणाऱ्या या लोकनाट्याची खरी रंगत मात्र ‘धोंगा’ तच असते. राजकीय समीकरणे बदलली, निष्ठावंत, पक्षनिष्ठा राजकारणात बाजूला पडत गेली तेव्हा रणमाल्यातून ही परावर्तीत झाली.आमी तुमच्या गांवचे दादातुमकां बशींनी भरतलूंआनी पणजी व्हरतलूंबटाटवडे दिवन तूमकाघरा धाडटलू...‘रणमाले’ चे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीचे दर्शन घडवणारे हे लोकनाट्य टिकले पाहिजे. महादेव गांवकर सारखा युवक धोंग सादर करताना रणमाल्याच्या मांडावर,चायनासून येयलो जगभर भोंवलोरोग हो कोरोना...वरास जावन गेलो तरीफाट हो सोडीना...हे गीत म्हणतो तेव्हा या नाट्यप्रकारात समाजप्रबोधन करण्याची किती ताकद आहे याची प्रचिती येते.