मडगावात सक्रिय रुग्ण अडीच हजाराच्या उंबरठ्यावर

दिवसभरात दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात १४ जणांचा मृत्यू


04th May 2021, 12:47 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव आरोग्य केंद्राच्या परिसरातील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरात तीनशेपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली असून सध्या २,४५४ एवढे सक्रिय रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच सासष्टीतील इतर ठिकाणीही रुग्ण संख्येत वाढ झाली असून सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
मडगाव परिसरात दिवसभरात ३०४ करोनाबाधित आढळून आल्याने मडगावातील संख्या आणखी वाढली आहे. याव्यतिरिक्त बाळ्ळी परिसरात ४८७ रुग्ण, कासावलीत ९६३ रुग्ण, चिंचणी परिसरात ३३३, कुडतरीत ५३३, लोटली आरोग्य केंद्राच्या परिसरात ५१८, तर नावेली परिसरात ४३६ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दिवसभरात १४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाचा ईएसआय कोविड इस्पितळात मृत्यू झालेला आहे. याशिवाय सासष्टीतील सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात बाणावलीतील ७६ वर्षीय वृद्धाचा, मंडोपा येथील ४८ वर्षीय महिलेचा, फातोर्डा येथील ५८ वर्षीय महिला व ५२ वर्षीय तरुणाचा असा दोघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मडगावातील ८२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा इस्पितळात, तर ७० वर्षीय वृद्धाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात मृत्यू झाला आहे.
वाढत्या करोना संसर्गामुळे मडगावातील न्यू मार्केट असोसिएशनने आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिली. मात्र, दिवसभरात मार्केटमधील काही दुकाने खुली होती. याशिवाय बाजारातील इतर ठिकाणीही गर्दीवर आळा आणणे शक्य झालेले नाही. त्यामुळे कडक निर्बंध लादून नागरिकांना घरात राहण्यास सांगण्याची मागणी सर्वसामान्य लोकांकडून व व्यापाऱ्यांकडून होत आहे.
जिल्हा इस्पितळात तपासणीसाठी गर्दी
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात करोना चाचणी केंद्र असून ते दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे केंद्र मडगाव रवींद्र भवन येथे नेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या जिल्हा इस्पितळात तपासणीसाठी सकाळपासून नागरिक येऊन रांगेत राहत आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत रांगा कमी झालेल्या दिसत नाहीत. इस्पितळात सध्या कर्मचारी कमी असल्याने त्यांच्यावरही कामाचा ताण वाढलेला आहे. याशिवाय नागरिक खासगी इस्पितळातही तपासणीसाठी गर्दी करत आहेत.                    

हेही वाचा