हैदराबादचा अखेर पहिला विजय

पंजाबचा सलग तिसरा पराभव : वॉर्नर-बेअरस्टोची दमदार सलामी


22nd April 2021, 12:35 am

चेन्नई : पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर ९ गड्यांनी विजय मिळवला. पंजाबच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी दमदार सुरुवात करत या हंगामातील आपला पहिला विजय मिळविला.
वॉर्नर आणि बेयरस्टोने पॉवरप्लेमध्ये हैदराबादसाठी ५० धावा केल्या. ११व्या षटकात फॅबिएन एलनने वॉर्नरला बाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने ३ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावा केल्या. वॉर्नर-बेअरस्टो यांनी ७३ धावांची सलामी दिली. त्यानंतर बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांनी नाबाद भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. बेअरस्टोने ५६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर विल्यमसनने १९ चेंडूत १६ धावा केल्या.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ १९.४ षटकांमध्ये सर्वबाद १२० धावा काढू शकला. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.४ षटकांमध्ये १ विकेट गमावून सामना आपल्या खिशात घातला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. पंजाबचा कर्णधार केएल राहुल केवळ चार धावांवर बाद झाला. तर मयंक अग्रवाल २२ धावांवर बाद झाला. ६ षटकांत पंजाबने ३२ धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेनंतर मयंक बाद झाला. खलील अहमदने त्याला (२२) झेलबाद केले. अग्रवालनंतर आलेला निकोलस पूरनही शून्यावर धावबाद झाला. राशिद खानने ख्रिस गेलला पायचित करत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलला केवळ १५ धावा करता आल्या.
गेल बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव सावरलाच नाही. दीपक हुडा १३ धावांवर तर मोझेस हेन्रिक्स १४ धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या शाहरुख खानने २ उत्तुंग षटकारांसह २२ धावा करत संघाला १०० पार पोहोचवले. मात्र, तो २२ धावांवर बाद झाला. शाहरुख बाद झाल्यानंतर पंजाबच्या तळाच्या फलंदाजांनीही नांग्या टाकल्या. शेवटच्या षटकात मोहम्मद शमी धावबाद होताच पंजाबचा डाव १२० धावांवर संपुष्टात आला. हैदराबादकडून खलील अहमदने २१ धावांत ३, अभिषेक शर्माने २, तर भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौलने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
पुरन-गेल पुन्हा फेल
भुवनेश्वर कुमारने कर्णधार लोकेश राहुल ‍(४ धावा)च्या रूपात संघाला पहिला झटका दिला. यानंतर आठ धावांच्या आत मयंक अग्रवाल, निकोलस पुरन आणि ख्रिस गेल बाद झाले. मयंकने (२२ धावा), पूरन (० धावा) आणि गेलने (१५ धावा) काढल्या. गेलला राशिदने पायचित बाद केले.
धावफलक :
पंजाब किंग्स : १९.४ षटकांत सर्वबाद १२० धावा. लोकेश राहुल झे. केदार जाधव गो. भुवनेश्वर कुमार ४, मयंक अग्रवाल झे. रशीद खान गो. खलील अहमद २२, ख्रिस गेल पायचित गो. रशीद खान १५, निकोलस पुरन धावचित (डेविड वॉर्नर) ०, दीपक हुडा पायचित गो. अभिषेक शर्मा १३, मोझेस हेन्रिक्स यष्टिचित जॉनी बेयरस्टो गो. अभिषेक शर्मा १४, शाहरुख खान झे. अभिषेक शर्मा गो खलील अहमद २२, फेबियन ऐलन झे. डेविड वॉर्नर गो. खलील अहमद ६, मुरुगन अश्विन झे. जॉनी बेयरस्टो गो. सिद्धार्थ कौल ९, मोहम्मद शमी धावचित (विजय शंकर/जॉनी बेयरस्टो) ३, अर्शदीप सिंह नाबाद १. अवांतर : ११. गोलंदाजी : अभिषेक शर्मा ४-०-२४-२, भुवनेश्वर कुमार ३-०-१६-१, खलील अहमद ४-०-२१-३, सिद्धार्थ कौल ३.४-०-२७-१, विजय शंकर १-०-६-०, रशीद खान ४-०-१७-१.
सनरायझर्स हैदराबाद : १८.४ षटकांत १ बाद १२१ धावा. डेविड वॉर्नर झे. मयंक अग्रवाल गो. फेबियन ऐलन ३७, जॉनी बेयरस्टो नाबाद ६३, केन विल्यमसन नाबाद १६. अवांतर ५. गोलंदाजी : मोहम्मद शमी २-०-१६-०, फेबियन ऐलन ४-१-२२-१, अर्शदीप सिंह ३.४-०-३१-०, मोझेस हेन्रिक्स १-०-७-०, मुरुगन अश्विन ४-०-२२-०, दीपक हुडा ४-०-२२-०.