Goan Varta News Ad

टॅक्सीमालकांचे स्वतंत्र अॅप हाच पर्याय

काही जणांची मक्तेदारी संपत आहे म्हणून हा पुन्हा पुन्हा आंदोलन, संपाचा मार्ग अवलंबून सरकारला झुकविण्याचा प्रयत्न होत आहे? तसे असेल तर सरकारनेही आपल्या निर्णयावर ठाम रहावे.

Story: अग्रलेख |
10th April 2021, 12:52 Hrs
टॅक्सीमालकांचे स्वतंत्र अॅप हाच पर्याय

कुठल्याही व्यवसायात चुकीच्या मार्गाने ठेवलेली मक्तेदारी, एकाधिकारशाही ही अधोगतीकडेच नेते. चुकीच्या आणि दादागिरीच्या मार्गाने अवघ्या काही जणांच्या स्वार्थासाठी जर कोणी सरकारला नमवायचे प्रयत्न करत असतील आणि जनतेला नाहक त्रास देत असतील तर अशा लोकांना सरकारी घटकांकडून खतपाणी मिळणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी लागेल. दर हंगामात पुन्हा पुन्हा आंदोलन करणाऱ्या टॅक्सीमालकांनी बदलत्या काळासोबत जाण्याचे सोडून जुन्याच पद्धतीने टॅक्सी व्यवसाय चालू रहावा यासाठी धरलेला हट्ट हा बालीशपणाच आहे. टॅक्सी व्यवसायात काही स्वयंघोषित दादा तयार झाले आहेत, त्यांना आपल्या स्वार्थासाठी इतर टॅक्सीचालकांचा विचार करण्याची सवड नाहीए, त्यामुळेच इतर टॅक्सी चालक अशा आंदोलनाला बळी पडतात. करोना नियंत्रणात येत नाही. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. सरकारी यंत्रणा हतबल झाली आहे. पर्यटन व्यवसाय पूर्ववत होत आहे असे दिसतानाच करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे काळजीत असलेल्या प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायची वेळ असताना अशा वेळी आंदोलन करून टॅक्सीमालक आणि चालक नेमके काय साध्य करू पाहत आहेत? पर्यटनाचा हंगाम ऐन मध्यावर असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे हे आधीच संकटात असलेल्या पर्यटन व्यवसायालाही मारक आहे. एखाद्या टॅक्सी अॅपला विरोध करण्यासाठी काही ठरावीक टॅक्सी मालक असे उतावीळ का झालेत? अॅपमुळे एवढे घाबरून जाऊन जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या टॅक्सीमालकांना स्वत:चे अॅप काढण्याची हिंमत का होत नाही? एकापेक्षा जास्त अॅप तयार करून राज्यात पर्यटन व्यवसायातील टॅक्सींमध्ये चांगली स्पर्धा करण्याची धमक टॅक्सीमालकांमध्ये नाही का? की काही जणांची मक्तेदारी संपत आहे म्हणून हा पुन्हा पुन्हा आंदोलन, संपाचा मार्ग अवलंबून सरकारला झुकविण्याचा प्रयत्न होत आहे? तसे असेल तर सरकारनेही आपल्या निर्णयावर ठाम रहावे.

अॅपद्वारे टॅक्सीसेवा देणारे गोवा माईल्स अॅप बंद करावे आणि नीज गोंयकारांचा उद्योग म्हणून टॅक्सीमालकांनाच हा व्यवसाय करण्याची संधी द्यावी अशी मागणी करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न टॅक्सीमालक करत आहेत. गोंयकारपणाचा खरोखरच तुम्हाला अभिमान असेल तर गोमंतकीय टॅक्सीमालकांनी एकत्र येऊन स्वतःचे अॅप सुरू करावे. एकापेक्षा जास्त अॅप गोव्यात असावेत. चांगली स्पर्धा व्हावी. नीज गोंयकारपणाच्या नावाखाली प्रवाशांची होणारी लूट थांबवावी. गोमंतकीयांचाच टॅक्सी व्यवसायात दबदबा असावा पण तो सकारात्मक पद्धतीने. गोमंतकीयांनीच हा व्यवसाय पुढे चालवावा पण तो एकमेकाला सोबत घेऊन. अॅपच्या माध्यमातून टॅक्सी व्यवसाय चालविण्यासाठी कुठलाच नकारात्मक मुद्दा दिसत नसताना आणि सर्वांनाच समान रोजगार मिळण्याची शक्यता असताना फक्त ठरावीक टॅक्सीमालकांचीच मक्तेदारी, एकाधिकारशाही गोमंतकीयांनी का म्हणून खपवून घ्यावी?

देशात इतरही राज्यांत अॅपद्वारे चालणारे टॅक्सी व्यवसाय आहेत. गोव्यात अजूनही स्वत:ला नीज गोंयकार म्हणवून घेणाऱ्या टॅक्सी मालकांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि इथला व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती ठेवण्यासाठी टॅक्सी संघटनांचे एक दोन अॅप तयार करण्याची संधी आहे. सध्या गोव्यात अस्तित्वात असलेले अॅप आणि टॅक्सी संघटनेचे एक किंवा दोन अॅप एवढेच गोव्यात चालतील अशी हमी सरकारकडून घ्यावी. सरकारने जास्त एपनांही परवानगी देऊ नये. पण 'अॅप नकोच, आम्ही आपल्याला हवा तसा धंदा चालवू' असे म्हणता येणार नाही. बदलत्या काळासोबत प्रवास करण्याची तयारी टॅक्सी मालकांनी दाखवावी. 'नीज गोंयकार' प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यात मागे नाहीत हे सिद्ध करावे.

सरकारने टॅक्सीमालकांना त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच दिला आहे. नोव्हेंबर २०२० पासूनच सहा महिन्यांसाठी एस्मा लागू केला आहे. त्यामुळे संप बेकायदा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. सरकारला कठोर कारवाई करण्याची संधी टॅक्सीमालकांनी देऊ नये. परवाने रद्द होतील किंवा खटले दाखल होतील अशी कृती करू नये. त्यापेक्षा टॅक्सी संघटनेने आपला संघटितपणा सकारात्मक गोष्टींसाठी दाखवावा. गोवा माईल्स २०१८ पासून सुरू आहे. कुठलीही तक्रार नसताना प्रवाशांची सोय होत आहे. अनेक प्रवासी त्यांच्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्याच धर्तीवर आपली अॅप सेवा टॅक्सी मालकांनी सुरू करावी हाच या वादावरचा रामबाण उपाय आहे.