Goan Varta News Ad

पर्यटकांना कोविडमुक्त प्रमाणपत्राची सक्ती नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट

|
03rd March 2021, 11:18 Hrs
पर्यटकांना कोविडमुक्त  प्रमाणपत्राची सक्ती नाही

साखळी आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लस टोचताना परिचारिका विमल सिनारी.

पणजी : महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत असले तरी गोव्यात येणारे पर्यटक किंवा अन्य प्रवासी यांना कोविड नसल्याचे प्रमाणपत्र आणण्याची सक्त केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. साखळी आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत चढउतार आहे. येथील पर्यटन तथा अन्य व्यवसायही आता पूर्वपदावर येऊ लागले आहेत. आता यापुढे लॉकडाऊनही केले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. करोना प्रतिबंधक लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही लस १०० टक्के सुरक्षित आहे. त्यामुळे अफवांना बळी न पडता, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

आता ७ दिवस २४ तास लसीकरण!
करोनाविरुद्ध लढाईला आणखीन वेग देण्यासाठी लसीकरण मोहिमेतील वेळेची मर्यादाही केंद्र सरकारने संपुष्टात आणली आहे. आता नागरिक आपल्या सुविधेनुसार, दिवसातील २४ तासांत कोणत्याही वेळेस लसीकरणासाठी वेळ निश्चित करू शकतात. दिवसा आणि रात्रीही लसीकरणाची सोय उपलब्ध राहणार आहे. ही घोषणा खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी केली.