जारकीहोळींकडून मंत्रिपदाचा राजीनामा

अश्लील चित्रफित प्रकरण भोवले


03rd March 2021, 11:17 pm
जारकीहोळींकडून मंत्रिपदाचा राजीनामा

बंगळुरू : अश्लील चित्रफीत समोर आल्यानंतर कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ती चित्रफीत खोटी आहे. या प्रकरणाची चौकशी निःपक्षपातीपणे होण्यासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहोत. पण आरोप खोटे ठरल्यास पुन्हा मंत्रिमंडळात येईन, असे जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
जारकीहोळी यांचे भाऊ आणि भाजप आमदार बालचंद्र जोरकीहोळी यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. तसेच ही बनावट सीडी बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार अाहे, असे बालचंद्र यांनी म्हटले आहे.
कथित ‌व्हिडिओमध्ये जारकीहोळी हे एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येतात. हा व्हिडिओ कर्नाटकात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेक कन्नड वृत्तवाहिन्यांमध्ये हा ‌व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. त्यानंतर नोकरीच्या मागणीसाठी आलेल्या महिलेवर रमेश जारकीहोळी यांनी लैंगिक अत्याचार केले, तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना धमकावले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
ज्या महिलेवर अन्याय झाल्याचा दावा केला जात आहे, ती कोण आहे, हे अद्याप माहीत नाही. त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मागणीवरून कुणीतरी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार पूर्णपणे चुकीची आहे. पीडित व्यक्तीने स्वतः तक्रार करणे अपेक्षित असते. इतर कुणीही रस्त्यावरचा व्यक्ती ही तक्रार दाखल करू शकत नाही, असेही आमदार बालचंद्र यांनी म्हटले आहे.

हेही वाचा