Goan Varta News Ad

‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुलची सुसाट खेळी

विजय हजारे चषक : हिमाचल प्रदेशवर शानदार विजय; आदित्य तरेच्या ८३ धावा

|
01st March 2021, 11:36 Hrs

जयपूर : विजय हजारे स्पर्धेतील एलिट गटातील डी ग्रुपमधील मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश यांच्यात सोमवारी सामना खेळण्यात आला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हिमाचल प्रदेशला ३२२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी हिमाचलला २४.१ षटकात १२१ धावांवर सर्वबाद केले. या सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने हिमाचल प्रदेशवर २०० धावांनी मोठा विजय मिळवला.
हिमाचलची फलंदाजी
मुंबईने दिलेल्या विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हिमाचल प्रदेशला मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. एकाही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांनी मैदानात टिकून दिले नाही. मुंबईने हिमाचलचा डाव २४.१ षटकांत १२१ धावांवर आटोपला. हिमाचलकडून मयंक डागरने २० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक ३८ धावा केल्या. मुंबईकडून प्रशांत सोलंकीने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर शम्स मुलानीने ३ आणि धवल कुलकर्णीने २ गडी बाद केले.
शार्दुल ठाकूरच्या ९२ धावा
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने धमाकेदार ९२ धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने ७५ चेंडूत १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी केली. तर आदित्य तरेनेही ९८ चेंडूंद्वारे ६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ८३ धावा काढल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात ३२१ धावा केल्या. दरम्यान, शार्दुल या स्पर्धेत गोलंदाजीसह फलंदाजीतही अष्टपैलू खेळी करत आहे. राजस्थान विरुद्ध ८ षटकांमध्ये ५० धावा देत त्याने महत्त्वपूर्ण ४ गडी बाद केले होते.
सूर्यकुमारने १५ चेंडूत ठोकल्या ६० धावा
सूर्यकुमार यादवने हिमाचल विरुद्ध खेळताना ७५ चेंडूंमध्ये ९१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १५ चौकार लगावले. म्हणजेच सूर्यकुमारने १५ बोलमध्ये ६० धावा केल्या. फलंदाजीदरम्यान सूर्याने हिमाचलच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. विजय हजारे करंडकात आतापर्यंत सूर्याने ५ सामन्यांत मुंबईकडून खेळला आहे. या ५ डावांत त्याने १ शतक आणि २ अर्धशतक लगावले. विशेष म्हणजे मधल्या फळीत फलंदाजी करूनही सूर्याचा स्ट्राईक रेट १००पेक्षा अधिक आहे.
मुंबईचा विजयी पंच
मुंबईने हिमाचलला पराभूत करत सलग पाचवा विजय साजरा केला. यासह मुंबई डी ग्रुपमध्ये २० गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. मुंबई या स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करत आहे. प्रत्येक खेळाडू हा आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही आघाड्यांवर मुंबईचे खेळाडू यशस्वी ठरत आहेत.

संक्षिप्त धावफलक :
मुंबई : ५० षटकांत ९ बाद ३२१ धावा. सूर्यकुमार यादव झे. जसवाल गो डागर ९१, आदित्य तारे झे. ठाकूर गो. जसवाल ८३, शार्दुल ठाकूर झे. जामवाल गो. जसवाल ९२. गोलंदाजी : रुषी धवन १०-०-८४-४, पंकज जसवाल १०-०-६५-३.
हिमाचल प्रदेश : २४.१ षटकांत सर्वबाद १२१ धावा. एकांत सेन झे. कुलकर्णी गो मुलाणी २१, प्रवीण ठाकूर पायचित गो. सोलंकी २२, रुषी धवन झे. तारे गो. सोलंकी १४, मयंक डागर नाबाद ३८. गोलंदाजी : धवल कुलकर्णी ४-१-८-२, शम्स मुलाणी ८.१-०-४२-३, प्रशांत सोलंकी ५-०-३१-४.