Goan Varta News Ad

बाद फेरीसाठी आज हैदराबाद-गोवा निर्णायक लढत

|
27th February 2021, 10:12 Hrs
बाद फेरीसाठी आज हैदराबाद-गोवा निर्णायक लढत

फातोर्डा : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बाद फेरीतील अखेरच्या स्थानासाठी एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यात निर्णायक लढत होईल. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियवरील विजयी संघ बाद फेरीत प्रवेश करेल.
१९ लढती झाल्यानंतर या ९० मिनिटांतील कामगिरीने दोन्ही संघांचे भवितव्य नक्की होईल. गोव्याचे पारडे जड असून त्यांना एकाच गुणाची गरज आहे. गोव्याचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांनी मात्र आपला संघ एका गुणासाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्रत्येक सामन्यात तुमच्यावर दडपण असते. आमच्या क्लबची मानसिकता प्रत्येक सामन्यात निर्णायक विजयाचे तीन गुण मिळविण्याची आहे. आम्हाला अर्थातच तीन गुण हवे आहेत, याचे कारण आमची मानसिकता उच्च दर्जाची आहे.
गोव्याचा संघ स्पर्धेत सर्वाधिक दरारा असलेल्यापैकी आहे. आक्रमणातील ताकदीमुळे त्यांना महत्त्वाचे गुण मिळाले आहेत, पण त्यांच्या बचाव फळीची क्षमता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यांना २३ गोल पत्करावे लागले आहेत.
गोव्याचा संघ गेल्या १२ सामन्यांत अपराजित आहे. गोल करणे ही फरांडो यांच्या संघासाठी काही समस्या ठरलेली नाही. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात गोल करण्याची जणू काही सवयच त्यांना जडली आहे आणि त्यामुळे त्यांनी महत्त्वाचे गुण मिळविले आहेत. फरांडो यांना हीच योजना कायम ठेवण्याची आशा आहे.
फरांडो यांनी सांगितले की, आम्ही आक्रमक स्थितीत खेळू, कारण आम्हाला जिंकायचे आहे. आमची योजना सारखीच असेल. १-० फरकाने जिंकणार असू तर आमची मानसिकता दुसरा गोल नोंदविण्याची असेल. प्रतिस्पर्ध्याने गोल केला तर आम्ही गोल करून १-१ बरोबरी साधतो आणि मग दुसरा गोल करतो. मी आनंदात असून या मानसिकतेच्या जोरावर या संघाच्या कामगिरीत सुधारणा करणे शक्य होते.
हैदराबादला आव्हान कायम राखण्यासाठी निर्णायक विजय अटळ आहे. त्यामुळे त्यांना सर्व ताकद पणास लावावी लागेल. प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांना नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाकडून कृपेची अपेक्षा होती, पण त्या संघाने केरळा ब्लास्टर्सला आरामात हरविले.
मार्क्वेझ म्हणाले की, नॉर्थईस्ट दोन्ही सामने हरले असते तर चांगले झाले असते. आता आम्ही एकच करू शकतो. ते म्हणजे केवळ एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी या दोन संघांचेच नव्हे तर चमकदार मोसमाबद्दल नॉर्थईस्टचेही अभिनंदन करू शकतो.
ते पुढे म्हणाले की, पहिल्या दिवसापासून संघाचे मनोधैर्य चांगले राहिले. ही लढत बाद फेरीसारखीच आहे, कारण जिंकलेल्या संघासाठी स्पर्धा पुढे सुरु राहील. ही जवळपास अंतिम फेरीच आहे. ही लढत खडतर होईल.
हैदराबादवर दडपण असेल, कारण गोव्याला आगेकूच करण्यासाठी केवळ बरोबरीही चालू शकते आणि मार्क्वेझ यांच्यादृष्टिने ही बाब प्रतिकूल आहे. त्यांनी सांगितले की, अर्थातच ही केवळ आकडेमोड आहे. मोसम संपल्यानंतर सर्वोत्तम संघ पहिल्या चार मध्ये येतात आणि इतर संघांना ५,६,७ असे क्रमांक मिळतात.