काँग्रेसचा पाठलाग

देशाबाहेर नेपाळ आणि श्रीलंकेत विस्तार करण्याची तयारी करणाऱ्या भाजपने भारतातील सगळी राज्ये याच मार्गाने काबीज करण्याचा चंग बांधला आहे.

Story: अग्रलेख |
22nd February 2021, 11:28 pm
काँग्रेसचा पाठलाग

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस असताना पुदुच्चेरीमधील काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले. मध्यप्रदेश, कर्नाटक, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, गोव्यानंतर पुदुच्चेरीतूनही काँग्रेसला संपविण्यासाठी भाजपाचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गोव्यात २०१२ च्या निवडणुकीत पार जेरीस आलेल्या काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत भरघोस यश मिळवले होते. काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार असे दिसत असताना भाजपाने अपक्ष, मगो, गोवा फॉरवर्डच्या सहाय्याने सत्ता स्थापन केली. मोठा आकडा असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी दिली नाही. २०१८ मध्ये कर्नाटकात निवडणुका झाल्या. तिथे जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली. पण त्यानंतर फोडाफोडीचे राजकारण करून तिथेही भाजपाने दोन्ही पक्षांकडून सत्ता काढून घेतली. त्याच वर्षी मध्य प्रदेशातही भाजपाने जास्त जागा मिळवून सत्ता स्थापन केली होती. पण तिथेही भाजपाने कमलनाथ यांना सत्तेतून बेदखल करत आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात सत्ता हातात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कदाचित आज ना उद्या तिथेही भाजपाचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. जिथे निवडणुकीच्या निकालातून सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होत नाही तिथे नंतर मार्ग तयार करण्यासाठी तत्त्वांना बुलडोझर लावण्याचे काम भाजप योग्य पद्धतीने करतो हे सर्वश्रूत आहे. वाट्टेल ते करून सर्व राज्ये काबीज करणे हेच भाजपचे ध्येय असते. गोव्यात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. गोव्यात सध्या काँग्रेस जवळ पाच आमदार आहेत. त्यातील काहीजणांचा एक पाय भाजपात आहे. झारखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब असे देशात पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. इतर राज्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. काही ठिकाणी निवडणुकीत सत्ता मिळवण्यासारखे संख्याबळ नाही मिळाले तर निवडणूकपूर्व यश मिळवल्याचे दिसते पण तिथे पुन्हा निवडणुका होतील तेव्हाच काँग्रेसची सध्यस्थिती स्पष्ट होईल. कमलनाथ नंतर काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील वजनदार नेते म्हणूुन परिचित असलेल्या नारायणसामी यांना पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा देण्याची वेळ आणली. विशेष म्हणजे पुदुच्चेरीत एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.
केंद्रातील भाजप सरकारने व्ही. नारायणसामी यांची सत्ता स्थापन केल्यापासूनच गोची केली होती. किरण बेदी यांना तिथे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी सरकारच्या कामकाजात अनेक अडथळे आणले. पुदुच्चेरी सरकारने अनेकदा राष्ट्रपतींना त्या विषयी कळवले पण बेदी यांना पदावरून हटवणे शक्य झाले नव्हते. बेदी यांनी सरकारचा छळ चालवला आहे, असे सांगत नारायणसामी सहानुभूती मिळवू शकतात असे दिसू लागल्यानंतर शेवटी तिथले सरकार अडचणीत असताना बेदी यांना १६ फेब्रुवारी रोजी पदावरून हटवले. त्यानंतर सहाच दिवसांत नारायणसामी यांचे सरकार पाडले गेले. पुढील काही दिवसात तिथल्या निवडणुकांच्या तारखाही जाहीर होतील. पण त्या आधीच अनेक आमदारांवर दबाव आणला गेला. नारायणसामी यांच्यामते सीबीआय, ईडी, प्राप्तीकर खात्याचा वापर करून काही आमदारांना भीती दाखवली गेली. एरवी भाजपचा तिथे निवडून आलेला आमदार नाही. तीन आमदार आहेत ते भाजपने नियुक्त केले आहेत. त्या व्यतिरिक्त तिथल्या विधानसभेत भाजपला स्थान नाही. पण एन.आर.काँग्रेस, एआयएडीएमके आणि डीएमके यांच्या मदतीने भाजप आतून काही कारस्थाने करत आहे, त्यातूनच पुदुच्चेरीत निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर असताना नारायण सामी यांच्यावर राजीनामा देण्याची नामुश्की आली.
नारायण सामी यांनी १० फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन किरण बेदी यांना हटविण्याची मागणी केली होती. राष्ट्रपतींनी बेदी यांना त्वरित हटवले आणि तेलंगणाच्या राज्यपाल तामीलीसाई सुंदरराजन यांच्याकडे ताबा दिला. त्यांची नियुक्ती करण्यातही भाजपने समाज आणि भाषेचे गणित पाहिले. येत्या निवडणुकीत मतदारांना कसे प्रभावित करावे त्याची पूर्ण तयारी भाजपने केली.
मागील काही दिवसात एक काँग्रेसचा आणि दुसरा डीएमकेचा अशा दोन आमदारांना राजीनामा देण्यासाठी फूस लावली गेली. त्यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिले होते. ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून ११ झाली. विश्वासमत ठरावाच्या वेळी काँग्रेसनेच माघार घेत सभात्याग केला. नारायणसामी यांचे सरकार कोसळले. ही जय्यत तयारी पाहूनच भाजपचा पुदुच्चेरीवर डोळा आहे हे स्पष्ट दिसते. देशाबाहेर नेपाळ आणि श्रीलंकेत विस्तार करण्याची तयारी करणाऱ्या भाजपने भारतातील सगळी राज्ये याच मार्गाने काबीज करण्याचा चंग बांधला आहे. एन.आर.काँग्रेसच्या नेत्यांशी भाजपने मैत्री करून पर्यायी सरकार स्थापन करण्याची तयारीही केली. सध्या भाजपने तत्काळ नारायण सामी यांना सत्तेतून बाहेरचा मार्ग दाखवून काँग्रेसला संपविण्यासाठी पाठलाग सुरूच ठेवला असला तरी पुदुच्चेरीच्या विधानसभेत निवडून येण्याची क्षमता नसलेल्या भाजपला येत्या निवडणुकीत यश मिळते की नाही तेही पहावे लागेल.
-0-