Goan Varta News Ad

राज्यातील चौघांना राष्ट्रपती पदक

दोघे पोलिस, दोघे गृहरक्षक यांचा सन्मान

|
26th January 2021, 12:01 Hrs
राज्यातील चौघांना राष्ट्रपती पदक

फोटो : प्रबोध शिरवईकर

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर आणि कुडचडे स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांना यंदाचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी होमगार्ड प्लॅटून कमांडर मीनाक्षी अनंत कुबल व होमगार्ड स्वयंसेवक नयन दीपू वेलिंगकर यांना गृह रक्षक राष्ट्रपती पदक केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे.

उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर १९९० मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रूजू झाले होते. त्यांनी नाशिक (महाराष्ट्र) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना २००० साली पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली. २०१५ मध्ये त्यांना उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली. १९ डिसेंबर २०१२ रोजी मुख्यमंत्री पोलिस पदक देऊन त्यांना गौरवण्यात आले. याशिवाय त्यांना २० डिसेंबर २०१४ रोजी पोलिस महासंचालक इंसिगनिया पोलिस पदक मिळाले आहे. त्यांनी मडगाव, फोंडा, शिवोली, केपे तसेच इतर पोलिस स्थानकांत सेवा बजावली अाहे.
पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई ३ सप्टेंबर १९८२ रोजी पोलिस कॉन्स्टेबल पदावर सेवेत दाखल झाले. त्यांना २००२ मध्ये पोलिस हवालदारपदी बढती देण्यात आली. १४ जून २००२ रोजी त्यांची उपनिरीक्षकपदी भरती झाली. त्यांना २०१३ साली पोलिस निरीक्षकपदी बढती देण्यात आली. १९ डिसेंबर २०११ रोजी त्यांना मुख्यमंत्री पोलिस पदक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय त्यांना २० डिसेंबर २०१६ रोजी पोलिस महासंचालक इंसिगनिया पोलिस पदक मिळाले आहे. त्यांनी हणजूण, वास्को, मडगाव, पणजी, सांगे, मायणा-कुडतरी, केपे, काणकोण, कोलवा, तसेच इतर पोलिस स्थानकांत सेवा बजावली अाहे.
गृहरक्षक प्लॅटून कमांडर मीनाक्षी कुबल सप्टेंबर १९८४ मध्ये गृहरक्षक स्वयंसेवक म्हणून रूजू झाल्या. २०१४ मध्ये त्यांना प्लॅटून कमांडर म्हणून बढती देण्यात आली. १९ डिसेंबर २००९ रोजी त्यांना मुख्यमंत्री पदक देऊन गौरवण्यात आले. त्यांना इतर अन्य पदकही मिळाली आहेत. २०१६ मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेवेळी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
गृहरक्षक स्वयंसेवक नयन दीपू वेलिंगकर उर्फ विजया माथोंडकर नोव्हेंबर १९८९ मध्ये गृहरक्षक स्वयंसेवक म्हणून रूजू झाल्या. १९ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना मुख्यमंत्री पदक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय त्यांनी राज्य स्तरावर अनेक क्रीडा स्पर्धांत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवले आहे.
---------------------
प्रशासकीय दिरंगाईमुळे अग्निशमन कर्मचारी वंचित
प्रशासकीय दिरंगाईमुळे यंदा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन पदकापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे निराशाची भावना कर्मचारी खासगीत व्यक्त करत आहेत. दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने स्वतःचाच अर्ज पाठवला होता, असे समजते.