Goan Varta News Ad

‘इन टू द डार्कनेस’ चित्रपटाला ‘सुवर्ण मयुर’

‘वाईफ ऑफ स्पाय’ने महोत्सवाचा समारोप : विश्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्कार

|
24th January 2021, 11:50 Hrs
‘इन टू द डार्कनेस’ चित्रपटाला ‘सुवर्ण मयुर’

फोटो : विश्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. सोबत रवी किशन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बाबूल सुप्रियो आणि मान्यवर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : ५१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘सुवर्ण मयुर’ पुरस्कार डेन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’ चित्रपटाला प्राप्त झाला. रोख ४० लाख रुपये आणि सुवर्ण मयुर असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत चटर्जी यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘वाईफ ऑफ स्पाय’ चित्रपटाने रविवारी महोत्सवाचा समारोप झाला.
ताळगावच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्याला राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी, मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत, केंंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसिद्धी मंंत्रालयाचे सचिव अमित खरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांंची घोषणा करण्यात आली. गोवा हे सुप्रसिद्ध चित्रीकरण स्थळ व्हावे. चित्रिकरणासाठी गोवा सरकारचे नेहमीच सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांनी सांगितले. राज्यात पर्यावरणीय पर्यटनालाही प्रतिसाद मिळेल. येत्या फेब्रुवारीत राज्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. चित्रपटामुळे संपूर्ण देशच नाही तर शेजारील देशही एकत्र येतात. प्रत्येक महोत्सवातून काही ना काही शिकायला मिळते, असे राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी म्हणाले. चित्रपट हे आपल्याला शिकवतात, जीवनात प्रकाश आणतात, असे केंंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंंत्री बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.
चित्रपट महोत्सव झाला ही आनंदाची गोष्ट आहे. चित्रपटांंची जादू कायम आहे, असे प्रमुख पाहुण्या आणि अभिनेत्री झीनत अमान यांनी सांगितले. या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी, मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. इफ्फीची फोकस कंंट्री असलेल्या बांंगलादेशातही मला पुरस्कार मिळाला आहे, असे अभिनेते विश्वजीत चटर्जी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले. विशेष अतिथी या नात्याने उपस्थित असलेले अभिनेते रवी किशन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेनुसार हा महोत्सव झाला. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपण सुरक्षित आहोत, असे रवी किशन म्हणाले.
या सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या संंदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. केंंद्रीय माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव अमित खरे यांनी स्वागतपर भाषणात मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत आणि गोवा सरकार यांच्या पाठिंब्यामुळे कोविड महामारीच्या काळातही इफ्फी आयोजित करणे शक्य झाल्याचे सांगितले. नियोजन आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे इफ्फीचे यशस्वी आयोजन शक्य झाले, असे मनोरंजन संंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी सांगितले. महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी आभार मानले. सोहळ्यात मनोरंजनात्मक संगीत आणि नृत्याचे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले.
को चेन नियेन ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयुर पुरस्कार ‘द सायलेंंट फॉरेस्ट’चे दिग्दर्शक को चेन नियेन यांना प्राप्त झाला. रोख १५ लाख आणि रौप्य मयुर, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुशॉन लिओ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जोफिया ट्रेनेस यांना रौप्य मयुर पुरस्कार मिळाला. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. विशेष परीक्षक मंंडळाचा पुरस्कार ‘फेब्रुवारी’ चित्रपटाचे दिग्दर्शक कॅमन केली यांना मिळाला. ‘द ब्रिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक कृपाल कलिता यांना रौप्य मयुर पुरस्कार मिळाला. पदार्पणातील चित्रपटासाठीचा पुरस्कार ‘वेलेंंटिन’चे दिग्दर्शक कॅशिओ परेरा दोस सांंतोस यांना मिळाला.