Goan Varta News Ad

डेअरीला वर्षभरात साडेसहा कोटींचे नुकसान

पशुखाद्यात साडेचार कोटी, तर आईस्क्रिममध्ये १९ लाखांची हानी

|
17th January 2021, 11:20 Hrs
डेअरीला वर्षभरात साडेसहा कोटींचे नुकसान

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दुधाचा दर प्रतिलिटर वाढवूनही २०१९-२०२० वर्षात गोवा डेअरीला ६ कोटी ४१ लाख रुपयांचे नुकसान झाले. पशुखाद्य विभागात ४ कोटी ५० लाख, तर आईस्क्रिम विभागात १९ लाख रुपयांचे नुकसान झाले.
डेअरीची आर्थिक स्थिती २०१८-१९ या वर्षात बरी होती. डेअरीची उलाढाल १३८ कोटी रुपयांची होती व २ कोटी ६० लाखांचा नफा झाला होता. २०१९-२०२० वर्षी दूध आणि पशुखाद्याच्या दरांत ४ रुपयांची वाढ करूनही उलाढाल १३१ कोटींची झाली. डेअरी शेतकऱ्यांना पेंड, भुसा असे पशुखाद्य देते. पशुखाद्यावर २०१८-१९ वर्षात १.८६ कोटींचा लाभ झाला. २०१९-२०२० वर्षी पशुखाद्याचा दर ४ रुपये प्रतिकिलो वाढवूनही ४.५ कोटींचे नुकसान झाले. आईस्क्रिममुळे २०१८-२०१९ वर्षी ८ लाखांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी १९ लाखांचे नुकसान झाले. आईस्क्रिमवरील नुकसान वाढतच आहे.
आईस्क्रिम विक्री २०१९-२०२० वर्षी ११.९३ लाख रुपयांची जाली. कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी १६.४८ लाख रुपयांचा खर्च झाला. आईस्क्रिम विक्रीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिक खर्च झाला. पशुखाद्यांच्या सामानावर २०१८-२०१९ वर्षी २५.१२ कोटी, तर २०१९-२०२० वर्षी ३२.८४ कोटी रुपये खर्च झाले. २०१९-२०२० वर्षी पशुखाद्याच्या खर्चासाठी १२.३४ कोटी रुपये देणे आहे, तर ४.३० कोटींचे अन्य लोकांना देणे आहे. गृहनिर्माणासाठीचे कर्ज ४०.१२ लाख रुपये दाखवले आहे. बरेच कर्मचारी निवृत्त होऊनही पगारावरील खर्च २०१९-२०२० वर्षी २०१८-२०१९ वर्षापेक्षा अधिक आहे.
दूध, पशुखाद्य विक्रीतही घट
दुधाची खरेदी, विक्री यांचे प्रमाणही २०१९-२०२० वर्षी कमी झाले. २०१८-२०१९ वर्षी २४.३० लाख लिटर, तर २०१९-२०२० वर्षी २२.५९ लाख लिटर दुधाची विक्री झाली. मागील वर्षी दूध खरेदीचे प्रमाणही कमी झाले. २०१८-२०१९ वर्षी २२.८३ लाख लिटर, तर २०१९-२०२० वर्षी २०.४६ लाख लिटर दुधाची खरेदी झाली. २०१९-२०२० वर्षी पशुखाद्याची विक्रीसुद्धा खूपच कमी झाली. २०१८-२०१९ वर्षी १७,१३२ दशलक्ष टन झाले, तर २०१९-२०२० वर्षी १६,०२२ दशलक्ष टन पशुखाद्याची विक्री झाली.