Goan Varta News Ad

हात जोडतो, आयआयटी रद्द करा!

विश्वजीत राणेंची सपशेल शरणागती; मुख्यमंत्र्यांना पत्र

|
12th January 2021, 11:48 Hrs
हात जोडतो, आयआयटी रद्द करा!

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : आयआयटी प्रकल्प सत्तरीवासीयांनाच नको आहे. त्यामुळे मलाही सत्तरीत आयआयटी नको. हात जोडतो, आयआयटी प्रकल्प रद्द करा. स्था​निकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना करत स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी सपशेल शरणागती पत्करली.
शेळ-मेळावली येथील स्थानिकांनी आयआयटीविरोधात एल्गार पुकारल्यानंतर सत्तरीतील विविध गावांतूनही शेळ-मेळावलीवासीयांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे भांबावलेल्या मंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पत्र पाठवून लोकांना नको असेल तर आयआयटी प्रकल्प आपणासही नको आहे. त्यामुळे सरकारने आयआयटी प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे प्रकल्पासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
सत्तरी तालुक्यासह संपूर्ण गोव्याचा विकास व्हावा, यासाठी आपण आयआयटी प्रकल्पाचे समर्थन केले होते. पण आता स्थानिक जनता प्रकल्पाविरोधात रस्त्यावर येत आहे. मी लोकांत राहणारा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे स्थानिकांचे हित लक्षात घेऊन आयआयटीसंदर्भात आपण लोकांसोबत राहण्याचे निश्चित केले आहे. लोकांचा विरोध झुगारून पोलिसांमार्फत सरकार आयआयटी प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने तत्काळ प्रकल्प रद्द करावा. प्रकल्प शेळ-मेळावलीतून इतर ठिकाणी हलवावा आणि स्थानिकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
माझे वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी गोव्याचा तसेच सत्तरी तालुक्याचा मोठा विकास साधला आहे. सत्तरीतील अधिकाधिक लोकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यांच्याच वाटेने आपणही जात आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानेही आपणही सत्तरीच्या विकासालाच प्राधान्य दिले आहे. अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. आयआयटीबाबतही आपण यापुढे स्थानिकांसोबतच असू, असेही मंत्री राणे यांनी नमूद केले.
विश्वजीत राणे म्हणतात...
- सरकारने आयआयटी प्रकल्प शेळ-मेळावलीतून इतर ठिकाणी हलवावा.
- स्थानिकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.
- स्थानिक महिलांवर अन्याय केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी.
- आपण कधीही पोलिसांमार्फत लोकांवर अत्याचार केलेले नाहीत. पण आता का झाले, याचे उत्तर आपल्याकडे नाही.
- मी आमदार असेपर्यंत आयआयटी प्रकल्पच काय, प्रकल्पासाठी एक दगडही रचू देणार नाही.
- सरकारने शेळ-मेळावलीत पोलिस पाठवू नये. पुन्हा पोलिस आल्यास त्यांना मला पार करून लोकांपर्यंत जावे लागेल.