स्वरयोगी विष्णुबुवा फडके

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
10th January 2021, 01:08 pm
स्वरयोगी विष्णुबुवा फडके

तीस डिसेंबरचा दिवस, वेळ सकाळी सात- साडेसातची. मी कुठल्याशा कामात होतो. एवढ्यात फोनची रिंग वाजली. कुणाचा फोन या विचारात मी फोन उचलला आणि पलीकडून शब्द कानावर पडले, ‘तात्या गेले.’ दोनच शब्द. मी स्तब्ध झालो. गेली ९८ वर्षे तेवत असणारा संगीताचा दीप शांत झाला होता. हार्मोनियमचे स्वर थांबले होते. ज्येष्ठ संवादिनी वादक विष्णुबुवा फडके यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता.

सव्वा पाच फूट उंची. गौर वर्ण, रुंद कपाळ, मागे फिरवलेले केस, सडपातळ बांधा असलेल्या विष्णुबुवांना घरचे आणि बाहेरचे सारेजण तात्या या घरगुती नावानेच ओळखत. तात्यांनी संगीत विद्येची चार तपाहून अधिक काळ साधना केली. विशेषतः संवादिनी (हार्मोनियम) हे त्यांचे जीवन. अगदी लहान वयात त्यांनी संगीताची आराधना करायला सुरुवात केली. तात्यांचा सांगीतिक प्रवास डोळे विस्फारण्यासारखा होता. व्यावसायिकदृष्ट्या म्हणता येईल असे पहिले संगीत नाटक त्यांनी वाजवले ते वयाच्या विसाव्या वर्षी. शेवटचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी. म्हणजे तब्बल बासष्ट वर्षांचा संगीत नाटक वाजवण्याचा प्रगाढ अनुभव. नाटकांखेरीज नामवंत गायकांना शास्त्रीय गायनातही साथ केली. कीर्तनाला साथ करणे हा तर त्यांचा डाव्या हाताचा मळ होता. आफळेबुवा, कोपरकरबुवा यांच्यासारखे पट्टीचे कीर्तनकार गोव्यात कुठेही आले तरी साथीला तात्यांना बोलवा, असे आयोजकांना आवर्जून सांगत. तीन हजारांहून अधिक संगीत नाटकांना त्यांनी ऑर्गनची तर चार हजारांहून अधिक कीर्तनांना पेटीची साथ केली. ते संगीत दिग्दर्शक होते. याशिवाय मडगावच्या दामोदर ट्रेनिंग कॉलेजात तसेच पणजीच्या स्वामी विवेकानंद सोसायटीच्या संगीत विद्यालयात संगीत शिक्षक या नात्याने काही वर्षे काम केले. एका अर्थाने ते संगीत क्षेत्रातील तपस्वी होते.

उत्तरायुष्यात तात्या नावारूपाला आले असले तरी त्यांचे बालपण अतिशय खडतर गेले. जीवन आणि मृत्यू या शब्दांचा अर्थ कळण्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले. घरात मागे राहिलेली आई आणि पदरात चार मुले. उपजीविकेचे एकमेव साधन म्हणजे श्रीशिवनाथाची पुराणिक ही वृत्ती. देवळातल्या सेवेबद्दल वर्षाला सहा खंडी भात मिळे. ते गवताच्या मुडीत साठवायचे आणि वर्षभर पुरवायचे. वडिलांचे निधन झाल्यामुळे देवळातल्या सेवेचा प्रश्न उभा राहिला. काहीकाळ जवळच्या नातेवाईकांनी मदत केली, पण तो कायम स्वरूपी तोडगा नव्हता. त्यामुळे आईने दादांची मुंज बांधली आणि देवळाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.

तात्यांचे मराठी प्राथमिक शिक्षण आक्काकडे म्हणजे मोठ्या बहिणीकडे गुडी- पारोडा येथील चंद्रेश्वर पर्वतावरच्या प्राथमिक शाळेत झाले. आक्काच्या घराच्या मागच्या बाजूलाच ‘लयशास्त्रातील चमत्कार’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्या लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकरांचे घर. शाळा सुटली की तात्यांचा मुक्काम खाप्रुमामांच्या घरात असे. खाप्रुमामांची नेहमीच लयसाधनेत समाधी लागलेली असायची. तात्यांना त्या वयात त्यांची थोरवी कळली नाही. पण, रक्तातच संगीत असल्याने खाप्रुमामांच्या मुखातून आलेले अनेक बोल तात्यांच्या स्मरणात असल्याचे ते अभिमानाने सांगत. पर्वतावर त्या काळातल्या गायिका वत्सलाबाई पर्वतकरांचे घर होते. बिनकार बाजीमामा पर्वतकर राहत असत. कळत न कळत का होईना, पण अशा दिग्गजांचे संस्कार तिथल्या मुलांवर होत असत. पुढील शिक्षणाची सोय नसल्याने चौथी झाल्यावर तात्यांनी पर्वत सोडला.

शिरोड्याला आल्यावर त्यांनी सेगुंदग्रावपर्यंतचे पोर्तुगीज शिक्षण घेतले. पण त्यांची आई एवढ्यावर समाधान मानणारी नव्हती. तिने पुढील शिक्षणासाठी पदरमोड करून दादा व तात्यांना पुण्याला पाठविले. तात्यांचा कल संगीताकडे, विशेषतः वाद्यसंगीताकडे होता. शिरोड्याला असताना दत्तू शिरोडकर यांच्याकडे व्हायोलिनचे प्राथमिक शिक्षण झालेले असल्याने त्याचेच अधिक शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरविले. संगीताचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रातःस्मरणीय असे महान कलाकार गजाननबुवा जोशी त्यावेळी पुण्यात होते. त्यांच्याकडे आपल्याला शिकायला मिळावे अशी तात्यांची फार इच्छा. बुवाही एवढ्या थोर मनाचे की त्यांनी तात्यांची शिकण्याची तळमळ पाहून त्यांना शिष्य म्हणून दाखल करून घेतले. तात्यांनी संगीतात जी काही कामगिरी केली त्याचा पाया गजाननबुवांच्या शिष्यत्वाखाली रचला गेला.

शिक्षण चालू असतानाच तात्यांनी विशारदची परीक्षा दिली. एकूण पुण्यात बस्तान बसतंय असं वाटत असतानाच नियतीने त्यांना एक धक्का दिला. इकडे शिरोड्याला त्यांच्या आईचे निधन झाले. पुण्याचा गाशा गुंडाळून दोघेही शिरोड्याला आले. दादा मोठे असल्याने त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यांना अधूनमधून पुण्याहून कार्यक्रमासाठी बोलावणे येई. त्यावेळी ते तिकडे जात. एकदा डॉ. मारुलकरांनी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तथा गायक सुधीर फडके यांच्याकडे तात्यांची शिफारस केली. फडके हे त्यावेळी प्रभात फिल्म कंपनीत संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी तात्यांची स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक केली. इकडे देवळाचा व्यापही वाढला होता त्यातच चतुर्थी, नवरात्र, जत्रा अशा दिवसात काम खूप असे. दादांना एकट्याला ते झेपत नसे. त्यामुळे मदतीसाठी तात्यांना बोलावणे भाग पडे. देऊळ महत्त्वाचे असल्याने नाईलाजाने तात्यांनी नोकरी सोडली.

सणासुदीचे दिवस सोडले तर तात्यांना फारसे काम नसे. तशातच दामुअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाटक मंडळीत त्यांना बोलावणे आले. नाटकं विशिष्ट हंगामातच लागत असल्याने ही नोकरी पत्करायला हरकत नाही, अशा विचाराने ती स्वीकारली. पण, पुन्हा तीच अडचण येऊ लागल्यामुळे तात्यांनी पुण्याचा नाद सोडला आणि कायमस्वरूपी शिरोड्याला आले. इथे आले खरे पण इथे एक वेगळीच समस्या निर्माण झाली. तात्या पट्टीचे व्हायोलिन वादक. कीर्तन किंवा अपवाद वगळता नाटकांना पेटीची साथ लागे. तात्यांच्या स्वरज्ञानाबद्दल प्रश्नच नव्हता. पण पेटी वाजविणे ही वेगळी कला आहे. त्यामुळे तात्यांनी बेळगावला जाऊन निष्णात पेटीवादक विठ्ठलराव कोरगांवकर यांच्याकडे पेटीवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि संवादिनी वादनावरही प्रभुत्व मिळविले.

तात्या आता खऱ्या अर्थाने स्थिरावले आणि त्यांची या क्षेत्रात घोडदौड सुरु झाली. केवळ गोवाच नव्हे तर कारवार, सिंधुदुर्ग या सारख्या ठिकाणाहूनही त्यांना निमंत्रणे येत. त्यांचा संसारही बहरला. मुलं, नातवंडं एवढंच काय पण पतवंडं पाहण्याचंही आणि फक्त पाहण्याचंच नाही तर ते संगीताचा आपला वारसा पुढे नेत असल्याचं पाहण्याचंही भाग्य त्यांना लाभलं. अत्यंत तृप्त मनाने तात्यांनी या जगाचा निरोप घेतला.

तात्यांचं जीवन कृतार्थ झालं या मागे त्यांची संगीतावरची निष्ठा आणि देवावरची श्रद्धा हे कारण आहे. शेवटचे सहा महिने सोडता रोज सकाळी दोन तास रियाज आणि स्नान झाल्यावर श्री गुरुचरित्राच्या एका अध्यायाचं वाचन यात त्यांनी खंड पडू दिला नाही. वरील फोटो हा ९३ व्या वर्षी पेटीवर भैरवी वाजवितानाचा आहे. भैरवीचे स्वर राहिले पण ते वाजविणारे तात्या गेले.

(लेखक साहित्यिक आहेत.)