मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्या स्थानिक, पर्यटकांना यापुढे शंभरऐवजी दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पोलिसांना दिले.
राज्यातील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. आर्थिक बळकटीसाठी सरकारने पर्यटन सुरू केले आहे. पर्यटन सुरू करत असताना करोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक नियमावलीही जारी करत, पर्यटन स्थळांवर जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क, सॅनिटायझर तसेच शारीरिक अंतर पाळण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. बहुतांशी पर्यटक मास्क, शारीरिक अंतराचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी स्थानिकही सरकारी नियमावलीला हरताळ फासत आहेत. त्यामुळे मास्क न वापरणार्या तसेच शारीरिक अंतर न पाळणार्यांना यापुढे शंभरऐवजी दोनशे रुपयांचा दंड आकारा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
दिल्ली, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे करोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. अशावेळी गोमंतकीय जनता तसेच पर्यटनासाठी गोव्यात येत असलेल्या पर्यटकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जे पर्यटक किंवा स्थानिक करोनाबाबत सावधानता बाळगणार नाहीत, अशांवर दंडाच्या कारवाईचे पूर्ण अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.