मडगाव हरिमंदिरातील दिंडी उत्सवाला प्रारंभ

मडगावातील हरिमंदिर येथील दिंडी उत्सवाला रविवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत श्रींची पूजा, अभिषेक व इतर कार्यक्रम करण्यात आले.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd November 2020, 12:50 am
मडगाव हरिमंदिरातील दिंडी उत्सवाला प्रारंभ

मडगाव : मडगावातील हरिमंदिर येथील दिंडी उत्सवाला रविवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत श्रींची पूजा, अभिषेक व इतर कार्यक्रम करण्यात आले. समितीने यावेळी हा कार्यक्रम साधेपणाने साजरा होणार असल्याचे जाहीर केलेले असल्याने भाविकांची गर्दी दिसून आली नाही.
यावर्षी करोना महामारीच्या धर्तीवर मंदिरातील धार्मिक विधी केल्या जातील, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आलेले आहे. यावर्षी मंदिराला दरवर्षीप्रमाणे विद्युत रोषणाईचा साज चढवण्यात आलेला असून, विठ्ठल रखुमाईची उत्सव मूर्तीही सुंदररीत्या सजवण्यात आलेली आहे. रविवारी सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम करून उत्सवाला प्रारंभ झाला. यावर्षी दिंडी उत्सवाचा मुख्य कार्यक्रम शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी असेल. मात्र, प्रतिवर्षीप्रमाणे दिंडीची पालखी मिरवणूक निघणार नाही. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग न होण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी पालखी मिरवणूक व गायनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असून केवळ सत्यनारायण महापूजा होणार आहे. १९०९ सालापासून सुरू या दिंडी उत्सवात १९११ साली प्लेगच्या साथीमुळे खंड पडला होता. त्यानंतर यावर्षी दिंडी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे. उत्सवाच्या प्रारंभ होत असला तरी भाविकांनीही समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली नव्हती.