काँग्रेसच्या कार्यकाळातच दुपदरीकरणाला मान्यता!

- जागावाटपात २० जागा मिळाल्या तरच काँग्रेसशी युती : राष्ट्रवादी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd November 2020, 12:48 am
काँग्रेसच्या कार्यकाळातच दुपदरीकरणाला मान्यता!

पणजी : केंद्रात यूपीए सरकार आणि राज्यात दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना येथील रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. तत्कालीन खासदार दिवंगत शांताराम नाईक आणि फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यासाठी त्यावेळच्या रेल्वेमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, असे आमदार चर्चिल आलेमाव यांंनी सांंगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत २० पेक्षा अधिक जागा मिळत असतील तरच काँग्रेससोबत युती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजपवरही हल्ला चढवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पणजी येथील कार्यालयाचे रविवारी माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आझाद मैदानावर आयोजित सभेत आमदार चर्चिल बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुजे फिलिप डिसोझा, गोव्याचे प्रभारी नरेंद्र वर्मा, अल्पसंख्याक विभागाचे नझिर खान, संजय बर्डे, सँड्रा मार्टिन्स, नेली रॉड्रिग्ज आदी मान्यवर उपस्थित होते. रेल्वे दुपदरीकरण हे गोंयकारांच्या हीताचे नाही. या प्रकल्पाला राष्ट्रवादीचा विरोध आहे, असे यावेळी जुजे फिलिप यांनी स्पष्ट केले. अविनाश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. 

काँग्रेसमुळे गोव्यात भाजप सरकार : प्रफुल्ल पटेल 

सभेत प्रफुल्ल पटेल म्हणाले, २०१७ मध्ये काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे युती झाली नाही. त्यामुळेच येथे भाजप सरकार आले. राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची अन्य कोणाही समविचारी पक्षाशी युती करण्याची तयारी आहे. मात्र, आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळाल्या पाहिजेत.

भूमिका आणि दावे
* म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळता नये. म्हादईप्रश्नी आम्ही गोंयकारांसमवेत आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
* प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना पहिली कॅसिनो बोट दाखल झाली. त्यानंतर सार्दिन, पर्रीकर यांच्या कार्यकाळात कॅसिनो वाढले, असा दावा चर्चिल यांनी केला.