आयुष्यातील ओझी

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
22nd November 2020, 05:39 pm
आयुष्यातील ओझी

गरज पडल्यास इंट्रो. लेखाला फोटो आहे.

हल्लीच मी एक ललित लेखांचे पुस्तक वाचत होतो. वाचता वाचता एका वाक्यापाशी आलो आणि अडखळलो. पुन्हा एकदा ते वाक्य वाचले. ते होते, ‘आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते अपेक्षा आणि गरजांचं.’ क्षणभर मला हसू आले. लेखक झाला म्हणून काहीही लिहावे? आज जगण्यासाठी माणूस दिवसभर जी काही हाणामारी करतो, विविध ताणतणाव झेलतो, अनेक प्रसंगांना सामोरे जातो ते काय आयुष्य सरळ आणि साधं आहे म्हणून? याच दृष्टिकोनातून मी माझ्या नोकरीच्या कालावधीतील दैनंदिन जीवनाकडे पाहिले. माझं साडेनऊचं ऑफिस, पत्नीची आठची शाळा. आठला शाळेत पोहोचायचं म्हणजे किमान साडेसातला घरातून निघायला हवं. दुपारी दोन वाजता येऊन स्वयंपाक करणे शक्य नाही म्हणून जाण्यापूर्वी तो करायला हवा. म्हणजे किमान पाच वाजता उठायला हवं. एका बाजूला कुकर, दुसऱ्या बाजूला पोळ्या करता करता सहा वाजत. मुलांना न्यायला सात वाजता स्कूल व्हॅन येते, त्यामुळे त्यांच्या मागे लागायचं. पावणेसातला मुलं गेली की गिझर लावून भाजी फोडणीला टाकायची. आंघोळ करून येईपर्यंत सव्वासात वाजून जात. कसातरी कपभर चहा पोटात ढकलून शाळेला जायला पळायचे. मला साडेनऊला ऑफिस. त्यामुळे साडेआठला निघावे लागे. कारण पावणे नऊची बस चुकली तर लेटमार्क पडायचा. संध्याकाळी दमलेल्या मनाने आणि शरीराने घरी यावे तर मुलं वाटच पाहात असत. शरीर साथ देत नसलं तरी त्यांना वेळ द्यावा लागे. एवढं सगळं करेपर्यंत रात्रीचं जेवण केव्हा होई आणि झोप केव्हा लागे तेच कळत नसे. यालाच सरळ आणि साधं जीवन म्हणायचं? मी पत्नीला बोलावले आणि हे सर्व सांगितले. माझा हा त्रागा बघून ती हसली आणि म्हणाली, ‘अहो, आयुष्य खरंच साधं आणि सरळ आहे. आपणच ते कॉम्प्लीकेटेड करून ठेवले आहे.’

‘काय?’ मी काहीशा आश्चर्याने विचारले. होय! हे बघा, माझ्या लहानपणी आमच्या छोट्याशा घरात अकरा मुलं आणि चार मोठी माणसं मिळून पंधराजण राहात होतो. सालात दोन चटया घालून त्यावर आम्ही भावंडं झोपत होतो. सकाळी उठलं की न्हाणीकडे जाऊन चुलीतील एक कोळसा काढायचा, दात घासायचे, आंघोळ करून आले की पेज जेवायची आणि शाळेला जायचे. दुपारी येऊन जेवलो की काय असेल तो अभ्यास करायचा की खेळायला मोकळे. वीज नव्हतीच त्यामुळे रेडिओ किंवा टीव्हीचा प्रश्नच नव्हता. काळोख पडायच्या सुमारास जेवलो की झोपलो. परीक्षेचा निकाल लागला की पालक किती टक्के पडले असे न विचारता फक्त पास झालास का? एवढाच प्रश्न विचारायचे आणि कामाला लागायचे. घरातली कामं स्त्रिया बघायच्या आणि पुरुष चरितार्थाची सोय करायचे. कसली स्पर्धा नव्हती की ताणतणाव नव्हता. साधं आणि सरळ आयुष्य होतं ते. असं आयुष्य चालेल का तुम्हाला?

‘अगं, पण आता काळ बदललाय,’ मी म्हटले.

‘काळ बदललाय म्हणजे नेमकं काय झालं हो? अजून सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो. पौर्णिमेला चंद्र पूर्ण प्रकाशतो आणि अमावस्येला काळोख होतो. मृग नक्षत्रावर पाऊस येतो आणि पावसाळ्यातच टायकीळा उगवतो. काजूच्या झाडाला काजूच लागतात. आंबे नाही. माणसाच्या रक्तातील तांबड्या पेशी पिवळ्या झाल्या नाहीत की पांढऱ्या पेशी काळ्या झाल्या नाहीत. पैसे कितीही खाल्ले तरी पोट भरायला अन्नच लागते. काळ बदलला नाही. आपल्या अपेक्षा वाढल्यात, गरजा बदलल्यात. पूर्वी एकत्र कुटुंबात सर्वजण सुखासमाधानाने राहात. आज प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट हवा असतो. त्यासाठी कर्ज काढावे लागते. त्यानंतर कर्जाचे हप्ते सुरु होतात. सोसायटीचा मेंटेनन्स सुरु होतो. दोघेही नोकरी करत असल्याने घरातली कामं करायला बाई ठेवावी लागते. स्वयंपाक घरात फक्त गॅस असून भागत नाही. पटकन गरम करायला हवं म्हणून ओव्हनची गरज भासते. फ्रीझ तर हवाच हवा. फ्लॅटमध्ये राहतो म्हणजे मिक्सर, ज्युसर पाहिजे. एकवेळ घरातली साखर संपली तरी चालेल पण मोबाईल अगोदर रिचार्ज करावा लागतो.

आमच्या वेळी मोठ्या बहिणीला घेतलेली पुस्तके लहान भावंडांपर्यंत पुरत असत. आपल्या मुलाला वर्षातून तीन वेळा पुस्तके घ्यावी लागतात. आम्हाला कपड्याचे दोन जोड वर्षभर पुरत. आता पाच- सहा जोड घेतले तरी मुलाचे समाधान होत नाही. मी स्लीपर घालून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. आता के.जी. तल्या मुलाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे शूज लागतात. वाढदिवस फारतर घरात एखादा गोड पदार्थ करून साजरा होत असे. आता बर्थडेला किमान काही हजार रुपये खर्च येतो. परीक्षेत मुलाचा एक टक्का घसरला तरी पालकांचे प्रेशर वाढते. मग ट्युशन, क्रॅश कोर्स या सारख्यावर हजारो रुपये खर्च करावे लागतात. मी आमच्या वाड्यावरच्या प्राथमिक शाळेत शिकून पदवी परीक्षा डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. तुम्ही मात्र मुलाला भरमसाठ फी देऊन शहरातल्या कॉन्व्हेंटमध्ये घातले. कारण तुम्हाला तुमच्या मुलाला डॉक्टर करायचे आहे.’ पत्नीच्या या बौद्धिकाने मी अंतर्मुख झालो.

तसं पाहायला गेलं तर माणसाच्या गरजा किती? अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला की पुरे. साध्या तांदळाचा भात खाल्ला काय आणि आंबेमोहोर तांदळाचा भात काय. महत्व आहे ते क्षुधा शांती होण्याचा. आंबेमोहोर हे आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी. वाढत्या अपेक्षांना अंत नसतो. त्यांना कुठे आवर घालावा हे कळले पाहिजे. ते कळले तर आयुष्याचा आनंद होतो. नाहीतर ते ओझे बनते. शेतात राबणारा शेतकरी दमला की चटणी- भाकरी खाऊन तृप्त होतो आणि जमिनीच्या अंथरुणावर आकाश पांघरून निवांतपणे झोपतो. कारण त्याचं आयुष्य साधं आणि सरळ असतं. न पेलणाऱ्या अपेक्षांची आणि गरजांची ओझी त्याच्या आयुष्यात नसतात. आयुष्य सुंदर आहे. फक्त त्यातला आनंद फुलपाखराप्रमाणे टिपता आला पाहिजे.

(लेखक साहित्यिक आहेत.)