Goan Varta News Ad

मोले प्रकल्पांना कडक सुरक्षा

पोलिस महासंचालक; शांतता पाळण्याचे विरोधकांना आवाहन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd November 2020, 12:08 Hrs
मोले प्रकल्पांना कडक सुरक्षा

पणजी : केंद्र आणि राज्य सरकारमार्फत गोव्यात सुरू असलेले प्रकल्प विकासासाठीच आहेत. विकासात्मक प्रकल्पांना विरोध करणे योग्य नाही असे म्हणत, रेल्वे मार्ग दुपदरीकरणासह मोलेतील इतर प्रकल्पांनाही पोलिस संरक्षण देण्यात येईल, अशी भूमिका पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी स्पष्ट केली.
शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार प​रिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत उप महानिरीक्षक परमा​दित्य व गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग उपस्थित होते. राज्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक राज्यांतील नागरिक अशा प्रकल्पांबाबत सरकारला पाठिंबा देत असतात. चौपदरी, सहापदरी मार्ग व्हावेत यासाठी ते लढेही देत असतात. पण गोव्यात मात्र रेल्वे मार्ग दुपदरीकरण तसेच इतर प्रकल्पांना नागरिकांकडून का विरोध होत आहे, तेच समजत नाही. या प्रकल्पांमुळे विविध समस्या सुटून राज्याचाच विकास होणार आहे. त्यामुळे प्रकल्प विरोधकांनी शांतता पाळावी, असे आवाहन महासंचालक मीना यांनी केले.
विकासात्मक प्रकल्प उभारत असताना केंद्र किंवा राज्य सरकार त्यांचा पूर्ण अभ्यास करीत असते. प्रकल्पांचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊनच त्यांना मंजुरी दिली जाते. प्रकल्पांसाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्रकल्पांचे काम सुरू केले जाते. देशाच्या किंबहुना राज्याच्या विकासासाठीच सरकार अशा प्रकल्पांची उभारणी करीत असते. रेल्वे मार्ग दुपदरीकरण तसेच मोलेतील प्रकल्प याच हेतूने उभारले जात आहेत. हे प्रकल्पाला विरोध करीत असलेल्या दक्षिण गोव्यातील लोकांनी समजून घ्यावे. सरकारी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
कोविड काळात गोवा पोलिसांनी योग्य प्रकारे आपले कर्तव्य बजावले आहे. राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस चोवीस तास सतर्क आहेत. महासंचालकपदाचा ताबा घेतल्यापासून आपण पोलिस खात्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. रखडलेली बढती प्रक्रिया पुन्हा सुरू करून अनेक पोलिसांना बढत्या देण्यात आल्या. पोलिसांची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्याचे तसेच नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस स्थानकांत स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येत आहे. आपल्यासह इतर वरिष्ठ अधिकारी पोलिस स्थानकांतील स्वच्छतेवर लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील करोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे तसेच समुद्र किनाऱ्यांवर गर्दी वाढत आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे, असेही मीना यांनी नमूद केले.

ड्रग्सबाबत मीना म्हणतात...
- राज्यातून ड्रग्स मुळापासून नष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांच्या रात्रंदिवस कारवाया सुरू आहेत.
- गेल्या काही दिवसांत ड्रग्ससारख्या अमली पदार्थांच्या व्यवहार प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आता ड्रग्स व्यवहारातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- अमली पदार्थांचे व्यवहार रोखण्यासाठी स्थानिकांनीही पोलिसांना मदत करणे गरजेचे आहे. असे प्रकार आढळल्यास तत्काळ त्याची पोलिसांना माहिती द्या.
- इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील गुन्हेगारीचा दर कमी आहे. शिवाय गुन्हे प्रकरणांचा छडाही लवकरात लवकर लावण्यात येतो.

पोलिसांवर राजकीय दबाव नाही! 

गोवा पोलिसांवर राजकारण्यांचा अजिबात दबाव नाही. कायद्याविरोधात जाऊन वर्तन करणाऱ्यांवर कारवाईचे मुक्त अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसारच त्यांच्याकडून कारवया सुरू आहेत. तरीही पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे कोणाला वाटत असेल, तर त्यांना न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही महासंचालक मीना यांनी स्पष्ट केले. जीत आरोलकर यांच्यासंदर्भातील प्रश्नावर ते बोलत होते.