कोहलीला आरसीबीच्या कर्णधारपदावरून हटवा

माजी क्रिकेटपटू तथा भाजपचा खासदार गौतम गंभीर यांचा हल्लाबोल


07th November 2020, 09:34 pm

दुबई : विराट कोहलीला आरसीबीच्या कर्णधारपदावरून दूर करा, असा हल्लाबोल भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने केला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ हा प्ले-ऑफमध्ये खेळण्यासाठीही लायक नव्हता, अशी तोफ गंभीरने डागली आहे. आरसीबीला शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाकडून पराभूत व्हावे लागले.
यावेळी गंभीर म्हणाला, तब्बल आठ वर्षे कोहली हा आरसीबीचा कर्णधार आहे. पण, या आठ वर्षांमध्ये एकदाही कोहलीला आरसीबीला जेतेपद मिळवून देता आलेले नाही. आठ वर्षे हा फार मोठा कालावधी असतो. ही एक जबाबदारीची गोष्ट असते आणि ती तुम्हाला पार पाडायची असते. त्यामुळे सध्याच्या घडीला कोहलीकडून आरसीबीचे कर्णधारपद काढून घ्यायची वेळ आलेली आहे. कारण जर कर्णधार बदलला नाही तर आरसीबी आयपीएलचे जेतेपद जिंकू शकेल, असे वाटत नाही.
गंभीरने यावेळी आरसीबीच्या संघाबाबत सांगितले की, प्रत्येक वर्षी आरसीबीचा प्रशिक्षक बदलला जातो, पण निकाल तोच लागतो. प्रशिक्षक बदलून काही होणार नाही. कारण संघाच्या नेतृत्वामध्येच बदल करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत पराभवाचा जबाबदार कर्णधाराला ठरवल जात नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहणार. मला आरसीबीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफबद्दल फारच वाईट वाटते. कारण त्यांना दरवर्षी पराभवाचाच सामना करावा लागतो. प्रत्येक खेळाडूला आपल्या संघाने जेतेपद मिळवावे, असे वाटत असते. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली गेले आठ वर्षे ही गोष्ट घडलेली पाहायला मिळालेली नाही.
आरसीबीच्या पराभवाला विराट जबाबदार
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ढिसाळ कामगिरीवर भाष्य केले. अबुधाबीच्या मैदानात झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराटच्या संघाला पराभव पत्करावा लागला. संघाच्या पराभवाला विराट कोहलीची खराब कामगिरीही जबाबदार आहे, असे गावसकरांनी म्हटले आहे. विराट नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरल्याची संघाला मोठी किंमत चुकवावी लागली, असा उल्लेखही त्यांनी केला. विराट आणि डिव्हिलियर्स यांच्या भात्यातून होणारी फटकेबाजी आणि मोठी खेळी ही संघाची ताकद होती. पण त्यांना चांगला खेळ करता आला नाही. आरसीबीच्या पराभवाचे हेही एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.