मंदिराची जमीन वगळता मग शेतजमीन का नाही?

शुभम शिवोलकरांचा सरकारला सवाल; आयआयटीला विरोध कायम राहणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:57 pm

पणजी : आयआयटी प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जमिनीतून मंदिराची जागा वगळण्यात येत असेल, तर स्थानिक कसत असलेली शेतजमीन का वगळता येत नाही, शेतजमिनींसह पर्यावरण उद्धवस्त करून प्रकल्प उभारण्याची खरेच गरज आहे का, असे सवाल मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीचे सह निमंत्रक शुभम शिवोलकर यांनी शुक्रवारी प्रुडंट वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा उपस्थित केले.
प्रकल्पासाठी सरकारने शेळ मेळावली येथील निश्चित केलेली जमीन सरकारी मालकीची आहे, हे मान्य आहे. पण त्या जमिनीत स्थानिक लोक अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. झाडांची लागवड करीत आहेत. १९७१ मध्ये चुकीच्या पद्धतीने सर्व्हे झाल्यामुळेच ही जमीन सरकारच्या नावावर लागली. याचा विचार करून सरकारने संबंधित जमीन स्थानिकांच्या नावावर करणे आवश्यक आहे. पण प्रकल्पाच्या नावाखाली ही जमीन लाटून सरकारने आम्हाला उद्धवस्त करण्याचा घाट घातला आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. पण सरकारने अद्याप प्रकल्पाचे स्थानिकांना होणारे फायदे आणि तोटेही सांगितले नाहीत. सरकारी कारभार लोकशाहीने होणे अभिप्रेत असते. पण येथे लोकशाहीच दिसत नाही. आपल्या मर्जीप्रमाणे कारभार सुरू आहे, अशी खंत शिवोलकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेळ मेळावलीला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली. त्यावेळीही स्थानिकांनीही प्रकल्पाला विरोध दर्शवत जमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केली. हीच मागणी आमची शेवटपर्यंत असेल. त्यामुळे सरकारने तत्काळ आयआयटी प्रकल्प शेळ मेळावलीतून हलवावा आणि लोकांचा विरोध होणार नाही, झाडे तोडावी लागणार नाहीत किंबहूना पर्यावरणाची हानी होणार नाही अशा ठिकाणच्या सरकारी जागेवर तो उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सत्तरी अजूनही पारतंत्र्यात!
प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या १० लाख चौरस मीटर जमिनीपैकी तीन ते चार लाख चौरस मीटर आल्वारा जमीन आहे. ही जमीन पोर्तुगिजांनी स्थानिकांना दिली होती. पण, पोर्तुगीज गेल्यानंतर ही जमीन स्थानिकांच्या नावावर न लागता सरकारच्या नावावर लागली. सत्तरी तालुक्यातील अनेक गावांची अशीच अवस्था आहे. यातून गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला. पण, सत्तरी मात्र अजूनही पारतंत्र्यात आहे हेच स्पष्ट होते, असेही शुभम शिवोलकर म्हणाले.