फ्रान्स पुन्हा हादरले

- चर्चमध्ये दशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू : अनेकजण जखमी

Story: पॅरिस : |
30th October 2020, 01:46 am
फ्रान्स पुन्हा हादरले

पॅरिस : चर्चमध्ये झालेल्या तिघांच्या हत्येने फ्रान्स पुन्हा हादरले आहे. मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला. त्यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. फ्रान्सच्या नीस शहरात ही घटना घडली. हा एक दशतवादी हल्ला आहे, असे फ्रान्समधील पोलिसांनी म्हटले आहे. 

 नीस शहरातल्या नोट्रे डेम चर्चमध्ये हा चाकू हल्ला झाला आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.  हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जिची हत्या गळा चिरून करण्यात आली आहे. इतर अनेक लोक जखमी आहेत. फ्रान्सच्या एका मंत्र्यानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. 

ज्या हल्लेखोराला पकडण्यात आलेय तो सातत्याने ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत होता, असेही महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी सांगितले. पोलिसांनी हा चाकू हल्ला करणार्‍यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला अटकही केली आहे. काही आठवड्यांआधीच एका शिक्षकाची गळा चिरून हत्या झाली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या घटनेमुळे फ्रान्समध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दहशतवादविरोधी पथकाला या हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताची फ्रान्सला साथ  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे.

हेही वाचा