Goan Varta News Ad

कृषी क्रांतीसाठी नवे तंत्रज्ञान अवलंबा

मुख्यमंत्री; राज्य कृषी पणनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th October 2020, 11:51 Hrs
कृषी क्रांतीसाठी नवे तंत्रज्ञान अवलंबा

फोंडा : केंद्र व राज्यात सर्वसामान्यांचे सरकार असून पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. सध्या औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही क्रांती घडत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास गोव्याला शेजारील राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या इमारतीचे उद्घाटन रविवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सहकारमंत्री गोविंद गावडे, आमदार रवी नाईक, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, उपाध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नाईक यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री कवळेकर, सहकारमंत्री गावडे व आमदार रवी नाईक यांनी यावेळी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या विद्यमान तसेच माजी संचालक मंडळाचा गौरव करण्यात आला. सूत्रांचालन सुभाष जाण यांनी केले. दुर्गाप्रसाद वैद्य यांनी आभार मानले.

राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांनी संघटितपणे कार्य करण्याची गरज आहे. राज्यातील विविध भागांत भरणाऱ्या आठवडा बाजारात स्थानिक शेतकऱ्यांना आपला माल विकण्याची संधी देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.