Goan Varta News Ad

पर्रा येथे १ किलो गांजा जप्त

हॉटेलच्या वेटरला अटक

|
24th October 2020, 10:24 Hrs
पर्रा येथे १ किलो गांजा जप्त

फोटो : अटक केलेल्या अशोक गुल्लर या संशयितासह पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक विराज कोरगावकर व पोलिस पथक. (उमेश झर्मेकर)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा ः अमलीपदार्थ विरोधी कारवाईखाली म्हापसा पोलिसांनी पर्रा येथे अशोक दुरगाप्पा गुल्लर (२६, रा. रामनगर-कर्नाटक) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला. संशयित आरोपी हणजूण येथे सोनिक बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टमध्ये वेटर म्हणून कामाला होता.

पोलिसांनी ही कारवाई शनिवारी पहाटे ३ ते ४.३० च्या दरम्यान केली. पर्रा येथे चार रस्ता जंक्शनवर अमलीपदार्थाची विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. संशयित ड्रग्ज विकण्यासाठी आला असता पोलिसांनी त्यास पकडले व त्याची झडती घेतली. संशयिताजवळ १ किलो १०० ग्रॅम गांजा सापडला. संशयिताला पोलिसांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम २०(ब)(ii)(अ) खाली गुन्हा नोंदवून अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज कोरगावकर, स्नेहा सावळ, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई राजेश कांदोळकर, सर्वेश मांद्रेकर, पांडुरंग उसापकर, तुकाराम कांबळी व संतोष नार्वेकर या पथकाने केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.