मेथर यांच्या खुनासाठी दोन लाखांची सुपारी

संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी


19th October 2020, 10:51 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा : पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांचा खून २ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणण्यात आल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. पाचही संशयितांना म्हापसाच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पाटो तोर्डा येथे घडलेल्या या खून प्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी (३७, हाऊसिंगबोर्ड -म्हापसा), खय्याद शेख (३५, सालय -पर्वरी), पवन श्रीकांत बडिगर (३२, धुळेर - म्हापसा), प्रशांत लक्ष्मण दाभोळकर (३६, शापोरा - हणजूण) आणि इक्बाल नानपुरी (३१, गावसावाडा- म्हापसा) यांना शनिवारी अटक केली होती. धनवाडा साल्वादोर द मुंद मधील मीस्ट्री ग्रीन इमारतीमधील आपल्या सदनिकांचे गच्चीवरील बांधकामामुळे नुकसान झाल्यामुळे विलास मेथर व इतर तिघांनी पंचायत व बांधकाम नियामक प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. शिवाय बांधकाम प्रकल्पांतील कागदपत्रे माहिती हक्क कायद्यानुसार पंचायत व नगरनियोजन खात्याकडून त्यांनी मागविली होती. यावरून बिल्डर अल्ताफ यारगट्टी व विलास यांच्यात वाद झाला होता. संशयित अल्ताफ व त्याचा भावोजी संशयित खयाद शेख यांनी विलास यांना तक्रार व अर्ज मागे घेण्यासाठी धमकावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी संशयित पवन बडीगर यास धरून त्याच्याकडे विलासला धमकावण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिली.  

संशयित बडीगर याने आपला साथीदार संशयित प्रशांत दाभोळकर, इक्बाल नानपुरी व आणखी एकास सोबत घेतले. १४ रोजी संशयितांनी विलास यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व त्यास आग लावून पसार झाले होते.

या प्रकरणातील आणखी एक फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी खास पोलिस पथक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा