सुपारी देऊन काढला काटा!

म्हापशातील बिल्डर्ससह पाच जणांना अटक; एक बेपत्ता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th October 2020, 11:51 pm

म्हापसा/सावंतवाडी : तोर्डा-पर्वरी येथे घडलेल्या विलास मेथर हत्येप्रकरणी हाऊसिंग बार्डे-म्हापसा येथील बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी (३७), खय्याद शेख (३५, रा. सालय-पर्वरी), पवन श्रीकांत बडिगर (३२, रा. धुळेर-म्हापसा), प्रशांत लक्ष्मण दाभोळकर (३६, रा. शापोरा-हणजूण) आणि इक्बाल नानपुरी (३१, रा. गावसावाडा-म्हापसा) यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.


संशयितांमधील बिल्डर अल्ताफ व त्याचा भावोजी खय्याद यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी दरम्यानच अटक केली तर, पवन आणि प्रशांत यांना कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथून अटक करण्यात आली आहे. पाटो-तोर्डा येथील शेतजमीनच्या ठिकाणी बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास मेथर यांना अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला होता. भाजलेल्या अवस्थेत त्यांना गोमेकॉत दाखल केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. या प्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.


सदनिकेला भेगा पडल्याने
पेटली वादाची ठिणगी

विलास यांनी बिल्डर अल्ताफ यांच्या धनवाडा (साल्वादोर-द-मुंद) येथे ‘मिस्ट्री ग्रीन’ या बांधकाम प्रकल्पाच्या एफ इमारतीमध्ये सदनिका घेतली होती. या इमारतीची गच्ची संशयित अल्ताफ यांनी वरच्या मजल्यावरील चारपैकी दोघा सदनिकाधारकांना विकली होती. त्यामुळे संबंधित सदनिकाधारकांनी गच्चीवर बांधकाम सुरू केले होते. या कामामुळे विलास यांच्यासह इतरांच्या सदनिकांच्या भिंतींना भेगा पडून नुकसान झाले होते. विलास यांनी हा प्रकार संशयित अल्ताफ यांच्या निदर्शनास आणून सदनिका दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती.


पंचायतीत तक्रार केल्याने
बिल्डरला आला राग

संशयित बिल्डर अल्ताफने मागणीकडे कानाडोळा केल्यामुळे विलास व इतर तिघांनी साल्वादोर-द-मुंद पंचायतीकडे तसेच बांधकाम नियंत्रण प्राधिकरणाकडे (रेरा) तक्रार दाखल केली. शिवाय पंचायत व नगरनियोजन खात्याकडे इमारतीबाबतची आरटीआय अर्जाद्वारे माहिती मागविली होती. या प्रकारावरून बिल्डर अल्ताफ व विलास यांच्यात वाद झाला होता. आपल्या इमारतीविरुद्ध विलास तक्रार केल्याची माहिती अल्ताफ याने भावोजी खय्याद शेख याला दिली.


सुपारी देऊन घेतला जीव
विलास यांनी तक्रार मागे घ्यावी, यासाठी संशयितांनी त्यांना धमकावण्याचा बेत आखला. त्यानुसार खय्याद याने संशयित पवन व प्रशांत यांना धमकावण्याची सुपारी दिली. त्याप्रमाणे १४ रोजी पंचायतीतून आपल्या सहकारी तक्रारदारांना इमारतीमध्ये पाठवून विलास पर्वरी येथे कामानिमित्त जात असताना संशयित पवन व प्रशांत यांच्यासह इकबाल व आणखी एक मिळून चार जणांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांना वाटेत अडविले व धमकी देऊन तक्रार मागे घेण्याचा दम दिला. पण विलास ऐकून घेत नसल्याने संशयितांनी त्यांना धमकाविण्यासाठी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले, पण तरीही ते घाबरत नसल्याचे पाहून, लायटरच्या सहाय्याने त्यांना आग लावून संशयित पसार झाले.


धमकावण्यासाठी सुपारी
दिल्याची कबुली

पोलिसांनी या घटनेनंतर बिल्डर अल्ताफवर संशय व्यक्त केला होता. १५ रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशीही सुरू केली होती. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी खय्याद शेख यास ताब्यात घेतले होते. शुक्रवारी रात्री दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत धमकावण्यासाठी सुपारी दिल्याचे सांगितले. तसेच अन्य संशयितांची नावेही सांगितली.



संशयितांचा पसार
होण्याचा फसला बेत

बिल्डर अल्ताफ व खय्याद यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी पकडल्याची माहिती संशयित पवन व प्रशांत यांना मिळाली होती. त्यामुळे अटक टाळण्यासाठी गोव्याबाहेर पसार होण्याचा त्यांनी बेत आखला. दोघेही संशयित गोव्याची सीमा पार करून सावंतवाडीत (महाराष्ट्र) पोहोचल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट झाले होते. त्यानुसार गोवा पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला व संशयितांच्या गाडी क्रमांकासह त्यांचे मोबाईल फोन क्रमांक त्यांना दिल्याने कणकवली पोलिस त्यांच्या मागावर होते.


कणकवली एलसीबीने
दोघांच्या आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीच्या आधारे सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दाभाडे, अतिरिक्त अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी शाखेचे निरीक्षक धनावडे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी उपनिरीक्षक सचिन एम. शेळके यांच्या पथकाने तळेरे गावात जाऊन दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. हे दोन्ही संशयित अलिशान फॉर्च्यूनर कार (जीए-०३वाय-०९९०) या कारमधून अन्य ठिकाणी जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि कणकवली पोलिस स्थानकात आणले. पेडणेचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सहकार्‍यांसह कणकवलीमध्ये जाऊन संशयितांना ताब्यात घेतले व गोव्यात आणून त्यांना अटक करण्यात आली.


चौथा संशयित अद्याप बेपत्ता
कणकवलीत सापडलेल्या दोघा संशयितांना गोव्यात आणून अटक केल्यानंतर त्यांनी इक्बाल नानपुरी व आणखी एका संशयिताचे नाव उघड केले. त्यानुसार पोलिसांनी गावसावाडा येथून इक्बालला अटक करण्यात आली. चौथा संशयित बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्क्रीष्ट प्रसून व उपअधीक्षक एडवीन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलिसांनी म्हापसा, कळंगुट, पणजी, पेडणे, डिचोली तसेच गुन्हा शाखेच्या सहाय्याने तीन दिवसांत या खून प्रकरणाचा छडा लावण्यास यश मिळविले.      

हेही वाचा