बेळगावात भडकले कांद्याचे दर!

पावसाचा फटका; बाजारपेठेतील आवक थांबली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th October 2020, 11:47 pm
बेळगावात भडकले कांद्याचे दर!

बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सध्या बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डातील कांद्याची आवक थांबली आहे. याच कारणाने शनिवारी कांद्याचे दर अचानक भडकले.
विशेष म्हणजे मार्केटमधील साठवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात कुजल्याने उपलब्ध कांद्याचे दर वाढले आहेत. प्राप्त माहितीनुसार, या बाजारपेठेत शनिवारी एक नंबरी कांद्याचा किरकोळ दर ८० रुपये, मध्यम दर्जाचा दर ५० रुपये तर निकृष्ट दर्जाचा दर २० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे होता. एकंदरीत तुटवड्यामुळे आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बेळगावातील कांद्याचे दर भडकल्याची बातमी कळताच गोव्यातील बाजारपेठेतील कांद्याचे दरही लगेच शनिवारी वाढल्याचे दिसून आले. मडगाव येथील बाजारपेठेत मध्यम दर्जाच्या कांद्याचा दर ७० रुपये प्रतिकिलो असा होता, तर फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर याच कांद्याचा दर ६४ रुपये प्रतिकिलो इतका होता.

हेही वाचा