भारताच्या अंतर्गत विषयांत चीनने हस्तक्षेप करू नये!

- लडाख, अरुणाचल देशाचे अविभाज्य घटक

Story: दिल्ली : |
17th October 2020, 01:10 am
भारताच्या अंतर्गत विषयांत चीनने हस्तक्षेप करू नये!
दिल्ली : भारतीय सीमेवरील लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे देशाचे अविभाज्य घटक असून, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असा इशारा भारताने दिला आहे.
 जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेश भारताचे अभिन्न अंग आहेत आणि राहतील. याविषयी आमची भूमिका सातत्यपूर्ण आहे. भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही. आपल्या अंतर्गत बाबींवर कोणी टिप्पणी करू नये, अशी अपेक्षा बाळगणारे देश भारताच्याही अंतर्गत बाबींवर टिप्पणी करणार नाहीत, अशी भारताला आशा आहे, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला समज दिली आहे. 
 केंद्रशासित प्रदेश लडाखची निर्मिती मान्य करण्यास नकार देताना चीन वारंवार आपली भूमिका जाहीर करीत आहे. त्यावर भारताची प्रतिक्रिया काय आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अरुणाचल प्रदेशाविषयीही भारताने आपली भूमिका अनेकवेळा अतिशय स्पष्टपणे मांडली आहे. अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य घटक असून ही बाब चीनच्या सर्वोच्च स्तरावरील नेतृत्वासह सर्व संबंधितांना अनेकवेळा कळविण्यात आली आहे, असेही श्रीवास्तव म्हणाले.

दोन देशांतील चर्चा गोपनीय : परराष्ट्रमंत्री  
सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही दोन्ही देशांमधील गोपनीय बाब आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. चीनशी सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांना एका ऑनलाइन कॉन्फरन्स दरम्यान प्रश्न विचारला गेला होता. सध्या दोन्ही देशांत वाटाघाटी सुरू आहेत. यासंबंधी आधीपासूनच कुठलाही ठोस अंदाज बांधू नये, असेही ते म्हणाले. तिबेटमधील परिस्थितीसोबतच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या घडामोडींबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, लडाखशी कुठलाही संबंध नसलेल्या इतर गोष्टींवर विचार करणे योग्य वाटत नाही. सीमेवर शांतता राखण्यासाठी १९९३ पासून अनेक करारांवर स्वाक्षरी झाल्यापासून भारत आणि चीनमधील संबंध सुधारले आहेत. गत ३० वर्षांपासून आपण सीमेवर शांततेवर आधारित संबंध निर्माण केले आहेत. सीमेवर शांतता पुन्हा बहाल केली गेली नाही आणि ज्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे त्यांचे पालन झाले नाही तर दोन्ही देशांमधील अडसर येण्याचे हे प्राथमिक कारण आहे, असेही ते म्हणाले.  
पाकचा दावा फेटाळला 
पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. भारत सरकारकडून दोन्ही देशांदरम्यान चर्चेची इच्छा व्यक्त करण्याचे संकेत देताना इस्लामाबादला संदेश पाठवण्यात आल्याचा दावा मोईद युसूफ यांनी केला होता. याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कथित संदेशाच्या संबंधात मी स्पष्ट करू इच्छितो की, आमच्याकडून असा कोणताही संदेश पाठवण्यात आलेला नाही असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलेय. सोबतच आपला सल्ला आपल्या देशापुरता मर्यादित ठेवण्याचा सल्लाही भारताकडून पाकिस्तान अधिकार्‍यांना देण्यात आलाय.
हेही वाचा