Goan Varta News Ad

वोडाफोन ग्राहकांना ‘नो रेंज’चा फटका

वर्क फ्रॉम होममध्ये व्यत्यय; पुण्यातील पुराचा परिणाम

|
15th October 2020, 11:04 Hrs
वोडाफोन ग्राहकांना ‘नो रेंज’चा फटका

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : वोडाफोनला शुक्रवारी दिवसभर नेटवर्क नव्हते. त्याचा फटका गोमंतकीय तसेच करोनामुळे घरांतूनच काम (वर्क फ्रॉम होम) करत असलेले सरकारी तसेच खासगी क्षेत्रांतील लाखो कर्मचार्‍यांना बसला.

मोबाईल ही प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट बनली आहे. एकमेकांशी संवाद, समन्वय साधून कमी वेळात काम आवरण्यासाठी तसेच जागेवर बसून जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो. पण या मोबाईलमध्ये वोडाफोन कंपनीचे सीमकार्ड असलेल्या ग्राहकांना शुक्रवारी दिवसभर कोणतेही काम करता आले नाही. सकाळपासून वोडाफोनला नेटवर्कच नसल्याने एकमेकांशी संवाद साधता आला नाही की इंटरनेटद्वारे होणारी कामेही करता आली नाहीत. त्यामुळे वोडाफोन ग्राहकांकडून कंपनीविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

करोनामुळे राज्यातील अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची संधी दिली आहे. सरकारी खात्यांतील अनेक कर्मचारीही घरातूनच काम करत आहेत. घरातून काम करत असताना एकमेकांशी संवाद आणि इंटरनेट या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण शुक्रवारी या दोन्हीही गोष्टी पूर्ण न करता आल्याने खासगी कंपन्यांचे काम ठप्प झाले होते. त्याचा फटकाही काही कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.

पुणे येथे पडलेल्या मुसळधार पावसाचा वोडाफोनचे कामकाज हाताळणार्‍या मुख्य ठिकाणाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वोडाफोनच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर नेटवर्क पूर्ववत होईल, असा विश्वास वोडाफोन कंपनीच्या एका अधिकार्‍याने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.