Goan Varta News Ad

इफ्फी पुढे ढकलण्याचा निर्णय अपेक्षित व योग्यच

कराेनाच्या साथीचा कहर सुरू असताना आंतरराष्ट्रीय महोत्सव व्हर्च्युअल पद्धतीने घेणेही योग्य ठरले नसते. जानेवारीत सुद्धा अतिशय मर्यादित स्वरुपातच हा महोत्सव भरवावा लागेल.

Story: अग्रलेख |
25th September 2020, 10:44 Hrs
इफ्फी पुढे ढकलण्याचा  निर्णय अपेक्षित व योग्यच

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००४ मध्ये गाेव्यात आल्यापासून इफ्फी म्हणजे गोव्याची एक शान बनली आहे. दर वर्षी इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील मान्यवर जगभरातून गोव्यात काही दिवस मुक्कामासाठी येतात. यात कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असे पडद्यावरील तसेच पडद्यामागील प्रतिनिधी असतात, त्याहून अधिक संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपट शौकीन हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात. या निमित्ताने उत्तमाेत्तम चित्रपटांचे प्रदर्शन होते, त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरील झगमगत्या दुनियेचे प्रदर्शनही मांडले जाते. मनोहर पर्रीकर यांनी नेटाने प्रयत्न करून हा महोत्सव गोव्यात आणला आणि त्याला कायमस्वरूपी घर मिळवून दिले. त्याआधी इफ्फी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई अशा महानगरांमधून फिरत असायचा. यंदाच्या इफ्फीची मात्र तयारी सुरू होण्याआधीच करोनाच्या विषाणूंनी देशभराप्रमाणेच गोव्यातही ठाण मांडले. या साथीमुळे सर्व कार्यक्रमांवर आणि एकूणातच जनजीवनावर निर्बंध आले. अशा परिस्थितीत इफ्फीची तयारीही सुरू करणे जमले नव्हते. आता नोव्हेंबर-डिसेंबरमधील हा महोत्सव पुढे ढकलून जानेवारीमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. गोवा सरकारनेही या निर्णयाला आपली सहमती कळविली आहे. प्राप्त परिस्थितीत हा योग्यच निर्णय आहे. कराेनाच्या साथीचा कहर सुरू असताना आंतरराष्ट्रीय महोत्सव व्हर्च्युअल पद्धतीने घेणेही योग्य ठरले नसते. जानेवारीत सुद्धा अतिशय मर्यादित स्वरुपातच हा महोत्सव भरवावा लागेल. २०२० वर्ष इफ्फीविना जाईल हे आता नक्की झाले आहे.

....

लडीवाळ आवाजाचे एसपी

वयाच्या विसाव्या वर्षी तेलगू चित्रपटांत गायन सुरू केल्यानंतर गेली सुमारे पाच दशके एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा भारतीय चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास चालू राहिला. गेल्या महिन्यात कोविडची लागण झाल्यामुळे त्यांचे गायन थांबले, मात्र ते कायमचे थांबेल असे त्यांच्या चाहत्यांना वाटले नव्हते. दुर्दैवाने कोविडमधून ते पूर्णपणे सावरू शकले नाही आणि वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलगू चित्रपटांतून पार्श्वगायनात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ते दक्षिण भारतापुरते मर्यादित राहिले. तेलगूनंतर तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांमधील अनेक अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी म्हटली. १९८१ मध्ये आलेल्या ‘एक दुजे के लिए’ या कमल हासन आ​णि रती अग्निहोत्री यांच्या अभिनयाने साकारलेल्या दु:खद प्रेमकहाणीच्या चित्रपटाने ​मोठे यश मिळविले. या चित्रपटातील पार्श्वगायनाद्वारे बालसुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दणक्यात प्रवेश केला. देशभरातील चित्रपट संगीताच्या शौकिनांपर्यंत त्यांचा लडिवाळ आवाज पोहाेचला. एकूण १६ भारतीय भाषांतून त्यांनी ४० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटांतील आघाडीचा अभिनेता सलमान खानसाठी बालसुब्रमण्यम यांनी सातत्याने पार्श्वगायन केले. गायनातील अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या बालसुब्रमण्यम यांचे कोविडमुळे जाणे चटका लावणारे ठरले.

....

फटक्यांचे बादशहा डीन जोन्स

ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू आणि दिग्गज फलंदाज डीन जोन्स यांच्या आकस्मिक निधनाचा क्रिकेटविश्वाला मोठाच धक्का बसला आहे. वयाच्या साठीतही प्रवेश न केलेले डीन जोन्स सध्या आखातात चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे समालोचन करण्यासाठी मुंबईत होते. सहकारी गोलंदाज ब्रेट ली याच्याशी हॉटेलमध्ये क्रिकेटवर गप्पा करून झाल्यानंतर ते अचानक कोसळले, त्यांना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले, धावतपळत इस्पितळात नेण्यात आले. तरी काही क्षणांतच हृदयक्रिया बंद पडली. डीन यांनी कसोटी सामन्यांत खात्रीशीर फलंदाज म्हणून नाव कमविले होतेच, त्याहून अधिक त्यांनी एक दिवसीय सामन्यांत आक्रमक फलंदाज म्हणून गोलंदाजांच्या पोटात धडकी भरविली होती. १९८६ मध्ये चेन्नई येथील कसोटी सामन्यात कडक उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होत असताना त्यांनी ठोकलेले जिगरबाज द्विशतक संस्मरणीय खेळी ठरले. त्या सामन्यानंतर डीन जोन्स हे पुढील सात-आठ वर्षे ऑ​स्ट्रेलियन संघाचे नियमित सदस्य बनले. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी समालोचनात चांगलेच नाव कमविले. क्रिकेटमध्ये टी-२० प्रकार आल्यापासून नवनवीन फटके खेळण्यावर फलंदाजांचा भर असतो. डीन जोन्स यांनी १९८५ ते १९९५ या दशकात आक्रमक फलंदाजी करताना मारलेले नावीन्यपूर्ण फटके क्रिकेटशौकीन विसरणार नाहीत.