Goan Varta News Ad

प्रकाशवस्त्र मुगा

जगरहाटी

Story: शेफाली वैद्य |
20th September 2020, 01:01 Hrs
प्रकाशवस्त्र मुगा

मी मुगा सिल्कची साडी पहिल्यांदा पाहिली ती कॉलेजमध्ये असताना. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी मी गोवा विश्वविद्यालयातर्फे वाराणसीला गेले होते. तिथे आसामहून गुवाहाटी विश्वविद्यालयाचा संघ आला होता. ते बिहू नृत्य सादर करणार होते. त्या सगळ्या मुलींच्या अंगावर सुरेख सोनेरी रंगांच्या रेशमी साड्या होत्या आणि त्यावर लाल आणि काळ्या सुती धाग्याने विणलेले डिझाईन्स. त्या रेशमाचा सोनेरी रंग इतका सुरेख होता की मला वाटलं जणू प्रकाशाचेच धागे विणून कुणीतरी त्यातून वस्त्र बनवलंय. माझ्यापुरतं मी त्या रेशमाचं नामकरणही करून टाकलं, 'प्रकाशवस्त्र'! 

त्या विशिष्ट प्रकारच्या, सोनेरी रेशमाला मुगा म्हणतात आणि त्या मुलींनी घातलेली साडी नव्हती तर मेखेला सादोर नावाचा खास आसामी वस्त्रप्रकार होता हे मला नंतर त्या मुलींनी सांगितलं. पुढे एक-दोन वर्षांनी मी पुण्यात आले, माझं मास्टर्स करायला. विद्यापीठातल्या हॉस्टेल मध्ये माझी रूममेट होती, ती मुलगी नेमकी आसामची होती. मुगाचं वेड माझ्या डोक्यातून गेलं नव्हतंच. मी तिला मुगा बद्दल विचारलं. मुगा रेशीम हा कुठल्याही आसामी स्त्रीचा जिव्हाळयाचा विषय. तिने मला भरभरून सांगितलं.    

मुगा म्हणजे आसामी भाषेत 'सोनेरी'. आसाम हे राज्य फार पूर्वीपासून इथल्या रेशमासाठी प्रसिद्ध आहे. गुवाहाटीजवळ सुआलकुची नावाचं गांव आहे. आसामच्या रेशीम  उद्योगाचं हे माहेरघर. जेमतेम वीस हजार लोकांची वस्ती असलेल्या या सुआलकुचीच्या घराघरातून हातमाग चालतात. आसाममध्ये तीन प्रकारचे रेशमाचे कीडे सापडतात, त्यांच्या कोषातून जो धागा निघतो त्याच्या रंगावरून रेशीम ओळखलं जातं. थोडं जाडसर धाग्यांचं पांढऱ्या रंगाचं रेशीम म्हणजे एरी रेशीम, पातळ धागा पण उत्तम लकाकी असलेलं, कुठल्याही रंगात डाय करता येण्यासारखं मलबरी रेशीम म्हणजे पाट आणि पिवळसर सोनेरी रंगाचे धागे असलेलं रेशीम म्हणजे मुगा. 

पाट रेशीम सर्वात स्वस्त असतं आणि मुगा रेशीम सगळ्यात महाग. कारण मुगाचे कीडे सोम आणि आणि सुआलू नावाच्या जंगलात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या वनस्पतींच्या पानावरच जगतात. मुगाच्या किड्याचं शास्त्रीय नाव आहे अँथेरे आसामेंसीस. फक्त आसाममध्ये हा कीडा सापडतो म्हणून आसामेंसीस. आसाममध्ये राज्य करणाऱ्या आहोम राजघराण्याने मुगा रेशमाला राजाश्रय दिला. एके काळी फक्त राजघराण्यातल्या व्यक्तींनाच मुगा रेशमाची वस्त्रे घालायचा अधिकार होता. मुगा रेशमाची झळाळी आहेच तशी. २००७ मध्ये मुगा रेश्माला GI टॅग मिळाला आहे. आता फक्त आसाममध्ये विणल्या जाणाऱ्या साड्याच मुगा हे नाव वापरू शकतात. 

मुगा रेशमाची मेखेला सादोर लेऊनच आसामी मुली बोहोल्यावर चढतात. माझ्या रूममेटने मला सांगितलं होतं की मुगाची साडी ही आईकडून मुलीला दिली जाते आणि जितक्यावेळा तुम्ही हे रेशीम धुता तितक्या वेळा त्याला झळाळी चढत जाते. मी तिला माझ्यासाठी एक मुगा मेखेला आणायला सांगितलीदेखील होती, पण तिने जेव्हा मला किंमत सांगितली तेव्हा मला नाईलाजाने माझा विचार बदलावा लागला. त्या काळात मुगाची साडी माझ्यासाठी अप्राप्यच होती. मुगाचं उत्पादन कमी होतं त्यामुळे साहजिकच किंमतही वाढते. आजच्या काळात मुगाच्या साड्यांची किंमत साधारण पंधरा हजारापासून सुरु होते आणि साडीसाठी वापरलेल्या धाग्याचा काऊंट व विणलेल्या थ्रेडवर्कच्या कामाच्या दर्जानुसार पन्नास हजारापर्यंत जाऊ शकते. 

मुगा साडी वा मुगा मेखेला हा वस्त्रप्रकार आसाम आणि बंगाल बाहेर फारसा कुणाला ठाऊक नसतो, पण आसामच्या सांस्कृतिक परंपरेचा मुगा सिल्क उद्योग हा फार मोठा भाग आहे. आसाम सरकारने या उद्योगाला प्रोत्साहन देऊन वस्त्र पर्यटनाला राज्यात चालना दिली पाहिजे. पुणे- मुंबईत या साड्या मिळणं तितकंसं सोपं नाही, पण बरेचदा विणकर प्रदर्शनांमधून आसामचे स्टॉल लागतात तिथे ह्या साड्या मिळू शकतात. आजकाल ऑनलाईनही आपण त्या मागवू शकतो. 

(लेखिका साहित्यिक आहेत.)