बारा वर्षीय मुलासह आठ जणांचा मृत्यू

करोनाचा आतापर्यंतचा सर्वांत तरुण बळी; मृतांचा आकडा ३४३


20th September 2020, 12:27 am
बारा वर्षीय मुलासह आठ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : चोवीस तासांत राज्यातील आणखी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पण त्यात पेडणे येथील अवघ्या बारा वर्षांचा मुलगा आणि सुकूर-पर्वरी येथील २५ वर्षीय युवतीचा समावेश असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. मृत झालेला मुलगा व युवतीला इतर गंभीर स्वरूपाचे आजार होते, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. करोनाबळींत मुले आणि युवकांचा समावेश वाढत चालल्याने गोमंतकीयांतील भीती वाढली आहे.

एकाबाजूला मृत्यूंची संख्या वाढत असताना करोनाबाधितांचा आकडाही चढताच आहे. चोवीस तासांत नवे ६४३ बाधित आढळले असून, ४४६ जणांनी करोनावर मातही केली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या ५,९२० झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ३४३ झाला आहे.

नव्या मृत्यूंत पेडणे येथील १२ वर्षीय मुलगा आणि सुकूर-पर्वरी येथील २५ वर्षीय युवतीसोबतच आगशी येथील ६० वर्षीय आणि कुठ्ठाळी येथील ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच बेतोडा-पणजी येथील ७० वर्षीय पुरुष, करासवाडा-म्हापसा येथील ६८ वर्षीय पुरुष, वेर्णा येथील ७८ वर्षीय पुरुष आणि मोयरा-बार्देश येथील ६७ वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. आठही मृत व्यक्तींना करोनासोबतच इतर गंभीर स्वरूपाचे आजार होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य खात्याने आपल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.

राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत २८,०२२ करोनाबाधित सापडले असून, त्यांतील २१,७६० जण करोनामुक्त झाले आहेत. सरकारने दिलेल्या घरी अलगीकरणात राहण्याच्या पर्यायाला करोनाबाधितांकडून मिळणारा प्रतिसाद वाढतच चालला आहे. चोवीस तासांत तब्बल ५६३ जणांनी हा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या ११,७३२ झाली आहे, असेही आरोग्य खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, राजधानी पणजीत चोवीस तासांत पुन्हा ३५ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पणजीतील सक्रिय बाधितांची संख्या ३४१ झाली आहे. करंझाळे, सांतइनेज, भाटले, रायबंदर, मिरामार, आल्तिनो या भागांत नवे बाधित सापडल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.

करोनामुळे बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. सरकारने कोविड हाताळणी व व्यवस्थापनात एक नवा नीचांक गाठला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आतातरी जागे होऊन सरकारने लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करावेत.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

.........................................

ऑक्सिजन वाहतुकीवर निर्बंध नको

करोनाबाधितांसाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे. पण काही राज्ये ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना अडथळे आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही राज्याने ऑक्सिजन वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लादू नयेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने गोव्यासह सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.


हेही वाचा