Goan Varta News Ad

भाजप नको, तर मग पर्याय कोण?

स्वत:चा संसार नीटनेटका करण्याचे सोडून दुसऱ्यांच्या संसाराकडे लक्ष देण्याची ही वृत्ती काँग्रेसला नेमकी कुठे नेणार आहे, हे कळत नाही. काँग्रेसचा पारंपारिक अल्पसंख्याक मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काँग्रेसने त्यांचा भ्रमनिरास केला आहे आणि त्यामुळे त्यांना योग्य पर्याय हवा आहे. आम आदमी पार्टीकडून त्यांना हा विश्वास मिळत असल्याचेही दिसून येते.

Story: दृष्टिक्षेप । किशोर नाईक गावकर |
18th September 2020, 11:15 Hrs
भाजप नको, तर मग पर्याय कोण?

राज्यात २०१७ च्या निवडणुकीत फक्त १३ जागांवर विजय प्राप्त केलेल्या भाजपने विधानसभेतील सर्वांत मोठ्या काँग्रेस पक्षाला मागे टाकून सत्तेवर डाव मांडला देखील. एवढेच नव्हे तर आजच्या घडीला पक्षाचे संख्याबळ २७ वर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त अपक्ष आमदार गोविंद गावडे हे सरकारात मंत्री आहेत. अपक्ष आमदार प्रसाद गावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचाही सरकारला पाठिंबा आहे. हा आकडा तब्बल ४० जागांपैकी ३० वर पोहोचतो. भाजपकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे तरीही काहीजण म्हणतात पुढील निवडणुकीत भाजपचे दहा आमदार देखील निवडून येणार नाहीत. भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे आव्हान देणारेही लोक आहेत. पण या आव्हानाला अनुसरून भाजप सत्तेवर नसेल तर दुसरा कोणता पक्ष सत्तेवर असेल, या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. अर्थात जोपर्यंत भाजपला योग्य पर्याय उभा राहत नाही तोपर्यंत पक्षाच्या स्थानाला धोका नाही, हे सांगण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही.

आजपर्यंत काँग्रेसने देशात आणि राज्यातही सर्वाधिक काळ सत्ता भोगली. काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहण्यासाठी भाजपला बरेच परिश्रम घ्यावे लागले. संघटनात्मक बळ पणाला लावावे लागले. एवढे करून आत्ता कुठे २०१४ मध्ये भाजपला यश मिळाले. इतकी वर्षे काँग्रेसचे सगळे डावपेच, रणनिती, कुरघोड्या भाजपने शिकून घेतल्या आहेत. आजच्या घडीला ह्याच कुरघोड्यांच्या आधारावर भाजप जिथे शक्य असेल तिथे काँग्रेसला पोखरत आहे. राजकारणात नैतिक, अनैतिकतेला काडीचीही किंमत नसते. जिथे सत्ता तिथे कुर्निसात हीच पद्धत राहिली आहे. आता तर भाजपने काँग्रेसपेक्षाही पुढे मजल मारून कोणत्याच पद्धतीने पुन्हा काँग्रेसला सत्ता न देण्याचा चंग बांधला आहे. २०१४ ते २०२० पर्यंतच्या या कालखंडात काँग्रेसने राजकीयरीत्या काहीच बोध घेतलेला दिसत नाही. २०१७ च्या निवडणुकीत काहीच उल्लेखनीय प्रचार न करता काँग्रेसला गोव्यातील लोकांनी भरभरून मते दिली. या मतांचा आदर राखून सत्ता स्थापन करण्यात काँग्रेस अपयशी ठरली. भाजपला कंटाळून लोक आपल्याला निवडतील, अशी आशा बाळगून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काम करीत आहेत. किंबहुना या मानसिकतेतून त्यांना सत्ता लवकर मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसते. जोपर्यंत लोकांच्या आणि विशेष करून मतदारांच्या मनात विश्वासाचे नाते विरोधकांकडून तयार केले जात नाही तोपर्यंत भाजपला सत्तेपासून रोखणे खूपच अवघड आहे, हे कुणीही सांगू शकेल.

राज्यात अलीकडेच प्रुडंट मीडियाने राज्यातील एकूणच राजकीय वातावरणाचा अंदाज घेणारे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाची मोठ्या प्रमाणात बदनामी केली गेली. अर्थात या सर्वेक्षणात आपले बिंग फुटेल याची भीती असलेल्यांनीच हे खटाटोप केले असतील याबाबत शंका नाही. तरीही सर्वसाधारणत: जे लोक बोलतात त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणे शक्य नाही, हेच या सर्वेक्षणाने दाखवून दिले. भाजपाबाबत ५५ टक्के नाराज आहेत पण म्हणून त्याचा फायदा विरोधकांना होईल हा अंदाज या सर्वेक्षणाने नाकारला. भाजपच्या मतांची टक्केवारी तशीच शाबूत आहे. लोक भाजपला दोष देतील, टीका करतील, शिव्याशाप सुद्धा करतील पण दुसऱ्या कुणाला मत देणार नाहीत, असेच यातून दिसून येते. मग केवळ पत्रकार परिषदा घेऊन आणि मोठ मोठी सनसनाटी पत्रके जारी करून काँग्रेसला सत्ता मिळणार आहे काय? विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनीही सध्या सामाजिक माध्यमांचा आधार घेतला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राज्याचा दौरा किंवा वेगवेगळ्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची भेट घेतलेली पाहायला मिळालेली नाही. सध्या करोना संसर्गामुळे ते शक्य नसले तरी ह्याच सामाजिक माध्यमांचा वापर करून ते राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांकडे संवाद साधू शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. चोडणकर यांच्याजागी दुसरा अध्यक्ष पक्षाला मिळू शकला नाही, तर मग चोडणकर यांनाच कायम राखण्यात काय तक्रार आहे. चोडणकर यांची फौज सध्या सक्रिय आहे. अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, विजय भिके आदी आपल्यापरीने पक्षाचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे एकटेच सक्रिय आहेत. बाकी प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो यांनी जणू निवृत्तीच घेतली आहे. आमदार घरात बसून राहणार आणि पदाधिकारी किंवा कार्यकर्ते रान उठवणार असे होत नाही.

गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदार रोहन खवंटे, मगोचे एकमेव आमदार सुदिन ढवळीकर हे आपल्यापरीने सरकारविरोधात वेगवेगळे मुद्दे लावून धरत आहेत. परंतु पक्षाचा विस्तार किंवा जनतेशी थेट संवादासाठी त्यांच्याकडून कोणताच पुढाकार घेतला जात असल्याचे दिसून येत नाही. विरोधकांची ही अशी परिस्थिती असेल तर मग भाजपला पर्याय म्हणून जनता या पक्षांकडे का म्हणून पाहणार? या एकूणच परिस्थितीत ‘आम आदमी पार्टी’ मात्र कोणताही गाजावाजा न करता काम करीत आहे. अलीकडे पक्षाने बरीच आघाडी घेतली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे विषय हाताळणे, करोनाच्या काळात वेगवेगळे उपक्रम राबवणे तसेच दिल्लीतील विकासकामांची माहिती गोमंतकीयांना देऊन आपल्या कार्यपद्धतीबाबत येथील लोकांना परिचित करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांना आता प्रत्यक्ष फिल्डवर पाठवण्यासाठी राहुल म्हांबरे यांच्याकडे निमंत्रकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाकडे लोक आकर्षित होत असल्याचे निष्कर्ष आढळून आले आहेत. या सर्वेक्षणामुळे काँग्रेसच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. हे सर्वेक्षण म्हणजे बनाव आणि फेक असल्याचा आरोप करून ‘आप’ कडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला ते लोकांना देतात. स्वत:चा संसार नीटनेटका करण्याचे सोडून दुसऱ्यांच्या संसाराकडे लक्ष देण्याची ही वृत्ती काँग्रेसला नेमकी कुठे नेणार आहे, हे कळत नाही. काँग्रेसचा पारंपारिक अल्पसंख्याक मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काँग्रेसने त्यांचा भ्रमनिरास केला आहे आणि त्यामुळे त्यांना योग्य पर्याय हवा आहे. आम आदमी पार्टीकडून त्यांना हा विश्वास मिळत असल्याचेही दिसून येते. काँग्रेसने ताबडतोब स्वत:त सुधारणा घडवून आणली नाही तर भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचे श्रेय त्यांनाच जाईल यात तिळमात्र शंका नसावी.