Goan Varta News Ad

कांदा निर्यातबंदीवर पुनर्विचार करा

शरद पवार यांचा केंद्र सरकारला सल्ला

|
15th September 2020, 05:48 Hrs

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पवार केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई बंदर आणि बांग्लादेशच्या सीमेवर अडकून पडला आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला ४०० कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सरकारच्या निर्णयाने पाकचा फायदा
कांद्याच्या निर्यातीसंदर्भात शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून त्यांना या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले. भारताकडून आखाती देशात जो कांदा निर्यात केला जातो, त्या निर्यातीचा भारताचा वाटा या बंदीमुळे कमी होणार आहे. त्याचा लाभ पाकिस्तानसारखा देश घेऊ शकतो त्यामुळे भारताने या निर्णयाचा फेरविचार करण्याची आत्यंतिक गरज आहे, असे पवार म्हणाले.