जया बच्चन यांच्या विधानाने राज्यसभेत पडसाद

रविकिशन, कंगनवर चढवला हल्ला


15th September 2020, 05:46 pm

नवी दिल्ली : चित्रपटसृष्टी आणि अमली पदार्थाच्या संलग्नतेचे पडसाद मंगळवारी राज्यसभेतही उमटले. सपा खासदार जया बच्चन यांनी या मुद्यावरून भाजप खासदार रविकिशन तसेच चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.
राज्यसभेत शून्य तासात बोलताना जया बच्चन म्हणाल्या, ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावले, तेच त्याला आता गटार म्हणत आहे. मी याच्याशी सहमत नाही. या कठीण प्रसंगात सरकारने मनोरंजन उद्योगासोबत उभे राहिले पाहिजे. कारण सरकार संकटात असताना हे क्षेत्र नेहमीच सरकारच्या मदतीसाठी पुढे आले आहे. या क्षेत्रातील काही लोक वाईट असतील, पण त्यासाठी संपूर्ण चित्रपट उद्योगाची प्रतिमा तुम्ही डागाळू शकत नाही. या क्षेत्राची हत्या करू शकत नाही, याकडे बच्चन यांनी लक्ष वेधत या क्षेत्राच्या बचावासाठी सरकारने पुढे आले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
जया बच्चन यांनी नाव न घेता हा हल्ला केला असला तरी, त्यांच्या या विधानानंतर चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत आणि भाजपा खासदार रविकिशन यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रविकिशन म्हणाले, मी लोकसभेत जे बोललो, त्याला जया बच्चन पाठिंबा देतील, माझ्या बाजूने उभ्या राहतील. चित्रपटसृष्टीतील सगळेच अमलीपदार्थ घेत नाहीत, पण काही जण निश्चितपणे या चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या कारस्थानात सहभागी आहेत.
जयाजी, तुमच्या मुलीला तारुण्यात असताना कोणी पिटले असते, तिला अमलीपदार्थ दिले असते आणि तिचे शोषण केले असते तर, त्यावेळीही तुम्ही हीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती का, अभिषेक सातत्याने अन्याय होत आहे, शोषण होत आहे अशी तक्रार करत-करत एकदिवस फासावर लटकले गेले असते तरी, तुम्ही अशाच वागल्या असत्या का? थोडी सहानुभूती आमच्याबाबतही दाखवा. -कंगना राणावत, अभिनेत्री