Goan Varta News Ad

जुगार, अमली पदार्थांचे गोवा केंद्र बनू नये यासाठी...

जुगार आणि अमली पदार्थांचे गोवा केंद्र बनत असेल तर त्याची सखोल माहिती मिळवून त्यामागील सूत्रधारांची पाळेमुळे खणून काढण्याची जबाबदारी सरकारने हाती घेतली पाहिजे.

Story: अग्रलेख |
14th September 2020, 06:47 Hrs
जुगार, अमली पदार्थांचे  गोवा केंद्र बनू नये यासाठी...

उत्तर गोवा जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने कळंगुट येथील एका तारांकित हॉटेलात शनिवारी रात्री छापा टाकून ४२ पर्यटकांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगण, दिल्ली अशा विविध राज्यांतून ही मंडळी ‘पर्यटनासाठी’ गोव्यात आली होती. काही लाख रुपयांची रोकड आणि कॅसिनो चालविण्यासाठी लागणारी उपकरणे व यंत्रणा पोलिसांनी छाप्यावेळी जप्त केली. गोवा-महाराष्ट्र दरम्यानच्या पत्रादेवी सीमेवर अबकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने एका ट्रकमधून बेकायदा महाराष्ट्रात नेला जात असलेला मद्याचा साठा रविवारी जप्त केला. या मद्यसाठ्याची किंमत अंदाजे नऊ लाख रुपये आहे. पकडला जाण्याच्या भीतीने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळून जाणे पसंत केले असून, ट्रकची किंमत सुमारे अकरा लाख रुपये आहे. अबकारी अधिकाऱ्यांनी मद्यासह ट्रकही जप्त केला. सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू गेले तीन महिने देशभरात गाजत असून त्याचा तपास सध्या सुरू आहे. सुशांतसिंह राजपूतशी जवळीक असलेले अनेक जण अमली पदार्थांच्या सेवनात आणि व्यवहारात सहभागी असल्याचे आता उघड होत आहे. मुंबईच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शनिवारी नावेली येथील एका फ्लॅटवर छापा टाकून ख्रिस कॉस्ता नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. घरातील संबंधित साहित्य आणि कॉस्ता याला घेऊन अधिकारी मुंबईत गेले. एका महिन्यापूर्वी हणजूण येथे पोलिसांनी छापा टाकून तेथे चाललेली रेव्ह पार्टी उधळून २३ जणांना अटक केली. तेथे पोलिसांना अमली पदार्थ सापडले. एका अभिनेत्याच्या घरी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

गोव्यात गेल्या काही दिवसांत नजरेस आलेल्या या घटनांमध्ये जुगार, अमली पदार्थ, मद्य हे मध्यवर्ती सूत्र दिसून येते. वर दिलेली जंत्री केवळ काही घटनांची आहे. याशिवाय मडगावात स्वप्नील वाळके या सराफाचा खून झाला, सांताक्रुझ येथे गुंडांच्या दोन टोळ्यांत चकमक झडून एक ठार झाला, तिसवाडीत जमीन मालकाला धमकावण्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह कुख्यात गुंडांवर गुन्हा नोंद झाला, राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वादांतून मारामारीच्या घटना घडल्या. या साऱ्या गुन्ह्यांचे स्वरुप वेगळे असल्यामुळे त्यांचा समावेश पहिल्या यादीत केलेला नाही. परंतु पहिल्या यादीतील गुन्ह्यांचे स्वरुप पाहता गोव्यात फक्त किनारपट्टीतच नव्हे तर इतरही ठिकाणी मद्याची तस्करी, जुगाराची रेलचेल, अमली पदार्थांची उपलब्धी हे सहजसाध्य झाले आहे. पुन्हा ही जंत्री पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या प्रकरणांपुरती मर्यादित आहे. राज्यात रेव्ह पार्ट्या सुरू असतात असे विरोधकांचे आरोप आहेत. अमली पदार्थांच्या व्यवहाराचे गोवा केंद्र बनले आहे असा अनेकांचा दावा आहे. बेकायदा मद्यनिर्मिती आणि भेसळीच्या मद्याचे उत्पादन व वाहतूक गोव्यातून सुरू असते असे आरोप अनेकदा झाले आहेत. यातील काही प्रकरणे ठाऊक असूनही पोलिसी कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे असे किती बेकायदा प्रकार रात्रंदिन गोव्यात सुरू असतात याबाबतचा विचारही भीतीदायक ठरतो. राजकारण्यांच्या आशीर्वादाशिवाय हे प्रकार चालत नसतात असे सर्रास म्हटले जाते.

करोना एकीकडे पसरतच आहे. करोनाचे बाधित वाढत असले तरी लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राज्यांच्या सीमा खुल्या होऊन आंतरराज्य वाहतूक सुरू झाली. गोव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले पर्यटन सुरू झाले. साधारणपणे निर्बंध शिथिल होऊ लागले तसे हे गुन्हेगारी प्रकार अधिकाधिक संख्येने उघडकीस येऊ लागले आहेत. याचा अर्थ आंतरराज्य सीमा खुल्या झाल्यानंतर पर्यटक म्हणून जे लोक गोव्यात येताहेत ते पर्यटकच आहेत की आणखी कोणी, हा प्रश्नच आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडताच काही हॉटेल चालकांनी अनैतिक आणि बेकायदा व्यवसायांत उतरणे पसंत केले आहे की काय, असाही गंभीर प्रश्न आहे. नोकरी गमावलेल्या युवक आणि मध्यमवयीनांपैकी काही जण जुगार, अमली पदार्थ यासारख्या बेकायदा प्रकारात गुंतत चालले आहेत की काय, असाही एक प्रश्न आहे. या प्रकारांची व्यापक स्तरावर दखल घेतली गेली पाहिजे. तुरळक एक दोन छापे मारून, अटकांच्या जुजबी कारवाया करून परिस्थितीत सुधारणा अजिबात होणार नाही. जुगार आणि अमली पदार्थांचे गोवा केंद्र बनत असेल तर त्याची सखोल माहिती मिळवून त्यामागील सूत्रधारांची पाळेमुळे खणून काढण्याची जबाबदारी सरकारने हाती घेतली पाहिजे. भावी पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे प्रकार असेच सोडून देऊन चालणार नाहीत.