अझर अलीचे नेतृत्व संकटात : अक्रम


13th August 2020, 02:27 am

लाहोर : इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवर चांगलीच टीका केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका जिंकण्यास पाकिस्तानचा संघ अपयशी ठरल्यास अझर अलीच्या कर्णधारपदाला धक्का लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला. त्यामुळे पाकिस्तानला पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने, नुकत्याच पाकिस्तान संघाच्या पराभवावर चांगलीच टीका केली.
पुढील सामन्यात संघाने कामगिरी न सुधारल्यास अझर अलीच्या कर्णधारपदावर संकट येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी करत, विजय मिळवल्यास अझर अलीकडे संघाचे कर्णधारपद कायम ठेवावे. अन्यथा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कर्णधारपदासाठी दुसऱ्या कोणत्यातरी खेळाडूला शोधण्याची गरज असल्याचे, परखड मत वसीम अक्रमने व्यक्त केले आहे.