नजरेतलं जग

-
घर- नोकरीची तारेवरची कसरत करताना आधार झालेल्या कामवालीमुळे असंख्य जणींना दोन क्षण मोकळा श्वास घेता येतो. पण, हे सर्व करणाऱ्या कामवालीचं आयुष्य किती खडतर आहे, हा प्रश्न किती जणींच्या मनाला शिवतो? आजही कामवाली बाई उशिरा आली गं. तिने दांडी मारली की माझं सगळं वेळापत्रकच बिघडतं. बऱ्याच घरातून हा संवाद चालू असतो.
आपल्या वयानुसार एक छानसं नातं जोडावं कामवाल्या बाईबरोबर. आपापल्या घरातली कामवाली बाई पण एक माणूसच असते. कधी कधी काय होतं. आपण सामान कुठे तरी ठेवतो नि मग विसरून जातो. आपल्या लक्षात राहत नाही आणि जेव्हा शोधतो तेव्हा मिळत नाही झालं की आपला संशय बऱ्याचदा कामवाल्या बाईवर जातो. पण, हे चुकीचे आहे असे मला वाटते. आणि जरी तिने घेतले असे तुम्हाला वाटले तरी तिच्यावर न रागावता समजुतीने सांगितलेत तर तिलाच तिची चूक कळूही शकते कधी तरी. आपण जितके चांगले वागतो तितकी समोरच्याला त्याची चूक आपणहून कळते, असे मला मनापासून वाटते. तिलाही चांगली वागणूक मिळाल्याने आपलेपणा वाटतो आपल्याबद्दल.
मला वाटतं. आपण तिच्याकडून अपेक्षा करायची नाही. सभ्य नागरिकासारखं वागण्याची. आपण तिच्या वागण्याची सीमा समजून घेऊन त्यानुसार वागायचं असं मला वाटतं. तरच राग कमी येऊ शकतो आपल्याला.
काही वेळा कामवाल्या जरा आळशीच असतात. आपल्या मनाप्रमाणे सफाई करून घ्यायची असेल तर आपणही तिला हातभार लावावा असे वाटते. त्याही एक माणूस असतात. समाजाकडून, कुटुंबाकडून वाट्याला येणारी ही उपेक्षाच खरं तर तिच्या मनातली खदखद, असंतोष वाढवण्याचं काम करतात. पण, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. ती बाई विचित्र वागते एव्हढेच दिसते.
धकाधकीच्या दिनचर्येमुळे माणसामाणसांत पूर्वीइतका संवाद उरलेला नाही. साहजिकच एकमेकांजवळ व्यक्त होणं किंवा सुखदु:ख वाटून घेणं, आता जमेनासं झालंय. शिवाय रोजच्या जगण्याच्या स्पर्धेत प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकण्यासाठीच धावत असल्याचं चित्र आहे. अशा आयुष्यात दुसऱ्यासाठी वेळ कुठे मिळणार? तिला पण चहा पाणी द्यावं. काही असेल त्यातलं थोडंसच का असेना खायला द्यावं. बरं वाटतं तिच्याही मनाला. तिलाहि आपण माणूस समजतो याचं. खुश होऊन जाते ती या छोट्याश्या गोष्टीनेही. तिलाही कधी तरी आपले कपडे. खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा कधीतरी छोटीसी भेटवस्तू देत जावी. मनाला बरं वाटण्याचा हक्क तिचा सुद्धा आहेच की. तिला तरी कोण देणार आपुलकीने. आपण प्राण्यांना सुद्धा आपलेपणा प्रेम देतो. नातं कोणतही असू दे त्याला जर माणुसकीचा ओलावा असला तरच ते जोपासलं जातं. मग ते नातं कामवालीसोबतचं का असेना माणुसकीच असावं असं वाटतं.
आमच्या मामीच्या घरी चंद्राक्का आजी फार पूर्वीपासून कामाला होती. आता ती थकली होती वयोपरत्वे. तिचं उभं आयुष्य लोकांची धुणीभांडी. झाडूपोछा करण्यात गेलं. फार मनापासून करायची ती घरातल्या साऱ्यांचं. कुठलंही काम सांगितलं तरी आनंदानं करायची नेहमी. आम्ही पाहुणे म्हणून गेलो तरी तोंड भरून हसायची मनापासून. आपुलकीनं बोलायची साऱ्यांशी. पाहुणे आलेत आता आपल्याला जादा काम पडेल असा विचारही कधी शिवत नसायचा तिच्या मनात. झेपेल तसा आपला हात चालवत राहायची नेहमी. आपणही तिला समजुतीने समजावलं आपल्याला कशा प्रकारचं काम अपेक्षित आहेत ते तर ते काम त्या सहजपणे करतात नि आपलाही समाधान होतं.
घरातल्या अतिशय खराब असणाऱ्या भांड्यातून तिला चहा पाणी तसेच खाणं दिलं जातं. मला आजही आठवतंय आमच्या आजोळी रघू नावाचा गडी होता. तो लोकांकडे घर शाकारायला जायचा. तेव्हा त्याला दुपारी जेवण घरात बसून दिलं असेल, असं आठवत नाही. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची भांडी प्रत्येकाच्या घरी असायची आणि त्या भांड्यातून त्याला जेवण दिलं जायचे.
हा एक मात्र खरं. काही वेळेला त्यांच्यापुढं काय बोलावं तेच कळत नाही. काही बायका भांडी स्वच्छ करत नाहीत. सारं खरकटं वगैरे काढून, पाणी घालून एकत्र ठेवलेली भांडी सुद्धा ही बया स्वच्छ धुऊ शकत नसेल, तर काय बरं करावं? घासण्या वेगवेगळ्या ठेव, साबणात पाणी राहू देऊ नकोस, हे तर सांगून सांगून कंटाळा येतो. उत्तर हेच हिचं, की तसंच तर करते मी!
एक दिवस साडेआठ, दुसऱ्या दिवशी सव्वानऊ आणि जर कधी मी ही जायच्या आत जाऊन यावं म्हटलं, तर बाई दारात आठ वाजताच हजर! कारणं तर विचारायच्या फंदातच पडू नये कधी. कारणे सांगण्यातही तरबेज असतात त्या. पण, आपल्यालाही गरज असते याची जाणीव ठेऊन ऍडजस्ट करावं. दुसरं काय!
(लेखिका साहित्यिक आहेत.)