एका मुलीचा, एका स्त्रीचा आणि माणुसकी हरवत चाललेल्या समाजाला विचारलेला जाब!आज एक मुलगी म्हणून माझं स्थान काय आहे, हे कुणी सांगू शकेल का?जन्माला आल्यापासूनच एका स्त्रीचं अस्तित्व केवळ पुरुषांच्या करमणुकीचं साधन आहे का? तिचं सौंदर्य, तिचं तारुण्य आणि तिचं शरीर एवढ्यापुरतीच तिची ओळख मर्यादित आहे का? तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही? स्वतःची स्वप्नं नाहीत? स्वतःच्या इच्छेने जगण्याचा अधिकार नाही?आज समाजात घडणाऱ्या घटना पाहिल्या की मन सुन्न होतं. मुलगी या समाजात सुरक्षित आहे का, हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. एखाद्या मुलीकडे पाहताना काही पुरुषांच्या नजरेत माणुसकीपेक्षा वासना अधिक का दिसते? तिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहण्याऐवजी स्वतःच्या हातातील बाहुली समजण्याची ही विकृत मानसिकता कुठून येते.काल-परवा तर उमलण्याआधीच एका निष्पाप कळीला निर्दयीपणे कुस्करलं गेलं. त्या अमानुष कृत्याचा उल्लेख करायलाही मनाला किळस वाटते.
ज्या वयात तिच्या हातात बाहुली असायला हवी होती, ज्या वयात तिने निरागसपणे अंगणात बागडायला हवं होतं, ज्या वयात तिला जगाची ओळखही व्हायची होती, त्या वयात तिच्या बालपणावर एका विकृत मानसिकतेने घाला घातला. मला वाटलं होतं, ही घटना घडल्यानंतर समाजात संतापाचा वणवा पेटेल. प्रत्येक माणूस या अन्यायाविरुद्ध उभा राहील. त्या गुन्हेगाराला कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी समाज एकजुटीने आवाज उठवेल. पण काही दिवसांतच सगळं शांत होतं. राजकीय नेत्यांची मोठमोठी भाषणं होतात. आरोप-प्रत्यारोप होतात. कोणता पक्ष अधिक प्रामाणिक आणि कोणता कमी, हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू होते.
पण त्या निष्पाप जीवाच्या वेदनांचं काय?
अशा प्रसंगांकडे गांभीर्याने पाहण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नसते. एका निष्पाप मुलीच्या वेदनेला राजकारणाच्या तराजूत तोलू नका. तिच्यासाठी आवाज उठवताना पक्ष, जात, धर्म आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवा. कारण ती कोणाची तरी मुलगी नसून आपल्या संपूर्ण समाजाची मुलगी आहे.
पण खरं सांगायचं तर, मी कोण? मी एक मुलगी आहे. माझ्या जन्माच्या क्षणी बाबा म्हणतात, 'माझी परी जन्माला आली!' आई म्हणते, 'माझ्या आयुष्याचा आधार आली.' आजी-आजोबांच्या उतारवयात पुन्हा बालपण फुलवणारी मी त्यांची लाडकी नात असते. माझ्या पैंजणांच्या रुणझुणीने घराचं अंगण प्रसन्न होतं. माझ्या हसण्याने घरातील प्रत्येक कोपरा जिवंत होतो. माझ्या छोट्याशा हट्टात आई-बाबांचं सुख सामावलेलं असतं.
पण वय वाढतं, यौवन फुलतं आणि अचानक माझी ओळख बदलू लागते. मी परक्याचं धन ठरते. एका घरातून दुसऱ्या घरात जाताना अनेक भावना मनात दाटलेल्या असतात. सासरी नवीन नाती जोडताना कधी प्रेम मिळतं, कधी सन्मान, तर कधी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सासरच्या जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन आणि समाजाची बंधनं सांभाळताना मी अनेकदा स्वतःलाच विसरून जाते.
प्रत्येक नातं जपण्याची जबाबदारी माझीच का? प्रत्येकाच्या भावनांचा विचार मीच का करायचा? आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठीही मीच संघर्ष का करायचा? माझ्या वाट्याला येणाऱ्या विकृत नजरा आणि मानसिकतेचा दोष माझा कसा असू शकतो?
एका आईच्या हातात मूल असतं, ते मुलगा असो वा मुलगी. ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करते, त्याची काळजी घेते. मग स्त्रीकडे पाहताना हाच मायेचा आणि आदराचा भाव प्रत्येक पुरुषाच्या मनात का नसावा? प्रत्येक पुरुष असा नसतो, हेही तितकंच खरं आहे. एका बापाचं आपल्या मुलीवर असलेलं प्रेम पाहिलं की स्त्रीच्या अस्तित्वाचं मोल सहज लक्षात येतं. मग दुसऱ्याच्या मुलीकडे पाहताना माणुसकी का हरवते?
माझ्या आई-वडिलांनी मला शिकवण्यासाठी, मोठं करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्वप्नं पाहिली. मग ती स्वप्नं उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणाला दिला? मला रात्री बाहेर पडताना भीती का वाटावी? माझ्या कपड्यांवर, वागण्यावर आणि स्वातंत्र्यावर प्रश्न विचारण्याऐवजी माझ्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या मानसिकतेला प्रश्न का विचारले जात नाहीत?
मला सहानुभूती नको, समानता हवी. दयेची भीक नको, सन्मान हवा. चार भिंतींच्या आत सुरक्षित ठेवण्यापेक्षा समाजात निर्भयपणे जगण्याचा अधिकार हवा.
कायदा, न्यायव्यवस्था आणि शासन आपली जबाबदारी पार पाडतील; पण समाज म्हणून आपण कधी जागे होणार? मुलांच्या मनात लहानपणापासून स्त्रीचा आदर, संमतीचं महत्त्व आणि माणुसकीचे संस्कार कधी रुजवणार? गुन्हा घडल्यानंतर निषेध करण्यापेक्षा तो घडूच नये यासाठी प्रयत्न कधी करणार?
मी मुलगी आहे, स्त्री आहे; पण कोणाच्या मालकीची वस्तू नाही. आई, बहीण, पत्नी या नात्यांपलीकडे माझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मला देवी म्हणून पूजण्याची गरज नाही, माणूस म्हणून सन्मान देण्याची गरज आहे.
आज प्रत्येक मुलगी या समाजाला एकच प्रश्न विचारते आहे...
माझ्या जन्माचा आनंद साजरा करणाऱ्या याच समाजात मला माणूस म्हणून सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार कधी मिळणार?

- कु. तेजल तुलसीदास नाईक
मांद्रे गोवा, फोन नंबर: 9373591020


