आजकाल मधुमेह, स्थूलता आणि वजन कमी करण्याच्या विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. गेल्या काही वर्षांत Ozempic सारखी औषधे आणि GLP-1 आधारित वजन कमी करण्याची औषधे विशेष चर्चेत आली आहेत. या औषधांमुळे भूक कमी होणे, तृप्ती वाढणे आणि वजन कमी होण्यास मदत होते. योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली ही औषधे प्रभावी उपचार ठरू शकतात. मात्र स्थूलतेचे व्यवस्थापन केवळ औषध घेण्यापुरते मर्यादित नाही. त्यासाठी शरीर आणि मन या दोन्हींचा विचार करणे आवश्यक आहे.
GLP-1 (Glucagon-Like Peptide-1) आणि GIP (Glucose-Dependent Insulinotropic Polypeptide) हे अन्न ग्रहण केल्यानंतर आतड्यांमधून स्रवणारे हार्मोन्स आहेत. त्यांना Incretin Hormones म्हणतात. रक्तातील ग्लुकोज वाढल्यावर हे इन्सुलिनचे स्रवण वाढवण्यास मदत करतात आणि जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात.
GLP-1 रक्तातील ग्लुकोज वाढलेले असताना ग्लुकागॉनचे स्रवण कमी करण्यास, पोटातून अन्न पुढे जाण्याचा वेग मंदावण्यास आणि भूक व तृप्ती नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील केंद्रांवर परिणाम करण्यास मदत करते. GIP देखील इन्सुलिनचे स्रवण वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे या हार्मोन्सच्या स्रवणाला उत्तेजित करणारे महत्त्वाचे घटक आहेत; प्रथिनेही या प्रक्रियेत योगदान देतात.
भूक लागणे आणि पोट भरल्याची भावना निर्माण होणे ही केवळ इच्छाशक्तीशी संबंधित प्रक्रिया नाही. त्यामागे हार्मोन्स, मज्जासंस्था, आतडे आणि मेंदू यांच्यातील समन्वय असतो. अन्न पोटात आणि आतड्यांमध्ये पोहोचल्यानंतर शरीर अनेक संकेत निर्माण करते. हे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात आणि भूक, अन्न सेवन व तृप्ती यांचे नियमन करतात. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये अन्न सतत उपलब्ध आहे. अतिशय आकर्षक आणि चविष्ट पदार्थ, सततचे खाद्यपदार्थांचे जाहिरातीकरण, तणाव, कंटाळा आणि खाण्याच्या सवयी यामुळे शारीरिक भूक नसतानाही खाणे होऊ शकते. शरीराचे नैसर्गिक भूक आणि तृप्तीचे संकेत आणि आपले प्रत्यक्ष खाण्याचे वर्तन यांच्यात विसंगती निर्माण होते.
आतडे आणि मेंदू यांच्यात हार्मोन्स, मज्जासंस्था आणि इतर चयापचयविषयक संकेतांद्वारे सतत संवाद होत असतो. या संवादाला Gut–Brain Axis म्हणतात. GLP-1 आणि GIP सारखे हार्मोन्स या संवादाचा महत्त्वाचा भाग आहेत.
परंतु आपण नेहमीच शारीरिक भुकेमुळे खातो असे नाही. कधी कंटाळा, तणाव, दुःख, एकटेपणा, भावनिक अस्वस्थता किंवा स्वतःला बक्षीस देण्याची भावना यामुळेही आपण अन्नाकडे वळतो. अन्न आपल्याला तात्पुरता आनंद, दिलासा किंवा आधार देऊ शकते.
काही वेळा आपल्याला अन्नाची नव्हे, तर विश्रांतीची, संवादाची, भावनिक आधाराची, सुरक्षिततेची किंवा कोणीतरी आपल्याला समजून घेण्याची गरज असते. अशा वेळी आपल्या खाण्याच्या सवयींमागील भावनिक कारणे ओळखणे महत्त्वाचे ठरते. एकटेपणा, तणाव किंवा भावनिक कारणांमुळे खाण्याची सवय असल्यास, त्या कारणांवर काम करणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशन घेणेही आरोग्याच्या प्रवासाचा भाग असू शकतो.
GLP-1 आधारित औषधे भूक कमी करण्यास आणि वजन व्यवस्थापनात मदत करू शकतात. परंतु वजन कमी होणे आणि संपूर्ण आरोग्य सुधारणे या एकाच गोष्टी नाहीत. योग्य पोषण, पुरेसे प्रथिने, स्नायूंची ताकद टिकवणे, नियमित हालचाल, शक्तिवर्धक व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचे व्यवस्थापन यांना तितकेच महत्त्व आहे.
आरोग्याच्या प्रवासात स्वतःच्या वर्तनाकडे दोष देण्याऐवजी समजून घेण्याची गरज असते. कोणत्या परिस्थितीत आपण अधिक खातो, कोणत्या भावना आपल्याला अन्नाकडे वळवतात, कोणत्या सवयी नकळत तयार झाल्या आहेत, याचे निरीक्षण करणे ही बदलाची पहिली पायरी ठरू शकते. भावनिक भूक आणि शारीरिक भूक यांतील फरक समजून घेणे, खाण्यापूर्वी क्षणभर थांबून स्वतःच्या गरजा ओळखणे आणि भावनांना हाताळण्यासाठी इतर आरोग्यदायी मार्ग शोधणे यामुळे खाण्याच्या सवयींमध्ये जागरूकता निर्माण होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल, ध्यान, विश्रांती, आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणे, जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे आणि अर्थपूर्ण नाती जपणे यांचा उपयोग होऊ शकतो. काही वेळा एकटेपणा, अपूर्ण भावनिक गरजा किंवा दीर्घकाळ मनात साठलेल्या भावना यांकडे लक्ष देणेही आवश्यक असते. गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणे ही कमजोरी नसून स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याची एक महत्त्वाची पायरी आहे. आपल्या सवयी, भावनिक गरजा, अन्नाशी असलेले नाते, अर्थपूर्ण मानवी संबंध आणि जीवनातील आनंद यांचाही विचार करणे आवश्यक आहे.
वजन कमी करणे हे ध्येय असू शकते; पण केवळ वजन कमी करणे नव्हे, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी होणे हे अधिक मोठे ध्येय आहे.

आहार, जीवनशैली, शारीरिक हालचाल, झोप आणि भावनिक स्वास्थ्य यांचा एकत्रित विचार करणाऱ्या सर्वांगीण आरोग्यदृष्टिकोनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

- डॉ. स्नेहल नाईक
म्हार्दोळ


