नार्सिसिझमच्या सावलीतली नाती

प्रत्येक स्वार्थी व्यक्ती नार्सिसिस्ट नसते आणि प्रत्येक नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती बदलू शकत नाही असेही नाही.

Story: मनी मानसी |
27th November, 09:43 pm
नार्सिसिझमच्या सावलीतली नाती

आजकाल सोशल मीडियावर एखाद्याने आपले ऐकले नाही, आपल्या भावनांचा विचार केला नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध वागले की लगेच एक शब्द वापरला जातो, 'नार्सिसिस्ट!' नात्यात मतभेद झाले, कुणी स्वतःला प्राधान्य दिले किंवा एखाद्याने माफी मागण्यास नकार दिला की त्याला नार्सिसिस्ट ठरवले जाते. पण नार्सिसिझम हा केवळ एखाद्याला दूषण देण्यासाठी वापरण्याचा शब्द नाही. त्यामागे एक गंभीर मानसशास्त्रीय संकल्पना आहे.

 नार्सिसिझम म्हणजे काय?

 नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (NPD) ही एक व्यक्तिमत्त्वविषयक मानसिक स्थिती आहे. तिचे निदान केवळ पात्र मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून सखोल मूल्यांकनानंतरच केले जाऊ शकते. काही नार्सिसिस्टिक गुणधर्म असणे आणि व्यक्तिमत्त्वविषयक विकार असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुणधर्म दिसून येतात परंतु याचा अर्थ ती व्यक्ती नार्सिसिस्ट आहे, असा होत नाही.

 नार्सिसिझमची वेगवेगळी रूपे.

१. ग्रँडिओज नार्सिसिझम : अशा व्यक्तींना स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला आवडते. त्यांना सतत प्रशंसा हवी असते. स्वतःचे मत अंतिम मानणे आणि इतरांना कमी लेखणे ही त्यांची वैशिष्ट्ये असू शकतात.

२. व्हल्नरेबल नार्सिसिझम : अशा व्यक्ती बाहेरून संवेदनशील, असुरक्षित किंवा दुखावलेल्या वाटू शकतात. मात्र, टीका सहन न होणे, सतत स्वतःकडे लक्ष वेधून घेणे आणि स्वतःला अन्यायग्रस्त समजणे अशा प्रवृत्ती दिसू शकतात.

३. कम्युनल नार्सिसिझम : अशा व्यक्ती सर्वांत मदत करणाऱ्या, त्यागी किंवा समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती वाटू शकतात. मात्र, त्यांच्या चांगुलपणाच्या कृतींमागे कौतुक, मान्यता आणि प्रतिष्ठेची अपेक्षा असू शकते.

 ४. मॅलिग्नंट नार्सिसिझम : हा अधिक चिंताजनक स्वरूपाचे रूप आहे. यात श्रेष्ठत्वाची भावना, सहानुभूतीचा अभाव, आक्रमकता आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती एकत्र दिसू शकते.

नात्यांमध्ये नार्सिसिझम कसा दिसतो?

कुटुंबात अशी व्यक्ती आपल्या निर्णयांनाच महत्त्व देऊ शकते. मुलांच्या भावना, आवडीनिवडी किंवा स्वातंत्र्यापेक्षा स्वतःच्या अपेक्षा महत्त्वाच्या मानू शकते. जोडीदाराच्या नात्यात सतत दोष काढणे, भावनिक अपराधीपणाची जाणीव करून देणे, नियंत्रण ठेवणे किंवा प्रत्येक वादात स्वतःलाच योग्य ठरवणे अशा गोष्टी दिसू शकतात. मैत्रीतही दुसऱ्याच्या यशाचे श्रेय घेणे किंवा सतत स्वतःभोवतीच संभाषण फिरवणे दिसू शकते.

अशा व्यक्तींशी नातं सांभाळताना नेमकी काळजी कशी घ्यावी?

नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीशी नातं असणं ही नेहमीच सोपी गोष्ट नसते. विशेषतः ती व्यक्ती आपला जोडीदार, आई-वडील, भावंड किंवा जवळची नातेवाईक असेल, तर नातं तोडणं हा प्रत्येक वेळी पर्याय असतोच असं नाही. अनेकदा आपल्याला त्या व्यक्तीची काळजीही असते आणि तिच्या वागण्यामुळे होणारा त्रासही सहन करावा लागतो. अशा वेळी समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं.

 १. व्यक्तीशी लढण्याऐवजी वर्तनाला प्रतिसाद द्या.

 समोरच्या व्यक्तीला 'तू नार्सिसिस्ट आहेस' असं सांगून काही साध्य होईलच असं नाही. उलट, त्यामुळे वाद वाढू शकतो. व्यक्तीला लेबल लावण्याऐवजी विशिष्ट वर्तनाबद्दल बोला. उदाहरणार्थ, 'तुम्ही नेहमीच माझा अपमान करता' याऐवजी 'आपण मतभेदाने बोलू शकतो, पण अपमानास्पद भाषेत बोलणं मला मान्य नाही' असं सांगणं अधिक परिणामकारक ठरू शकतं.

 २. मर्यादा ठरवा, पण त्या शांतपणे आणि ठामपणे पाळा.

 प्रेम म्हणजे प्रत्येक गोष्ट सहन करणं नव्हे. तुमच्या वेळेचा, भावनांचा, वैयक्तिक निर्णयांचा आणि स्वातंत्र्याचा आदर होणं आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी स्वीकारार्ह आहेत आणि कोणत्या नाहीत, हे स्पष्ट करा. मर्यादा (Boundaries) म्हणजे समोरच्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न नव्हे तर स्वतःच्या वागण्याबद्दल आणि उपलब्धतेबद्दल घेतलेला निर्णय. उदाहरणार्थ, 'आपण शांतपणे बोलू शकत नसू तर हा संवाद आपण नंतर करू.'

 ३. प्रत्येक वेळी स्वतःचं स्पष्टीकरण देत राहू नका.

 काही नात्यांमध्ये आपण सतत स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. आपल्या भावना समजावून सांगतो, प्रत्येक निर्णयाचं समर्थन करतो आणि शेवटी स्वतःलाच दोष देऊ लागतो. अशा वेळी लक्षात ठेवा, समोरच्याने आपली बाजू मान्य केली नाही म्हणून आपला अनुभव चुकीचा ठरत नाही. आवश्यक तेवढंच स्पष्टीकरण द्या आणि निरर्थक वादातून बाहेर पडा.

 ४. बदलाची जबाबदारी एकट्याने उचलू नका.

 आपल्या प्रेमाने, संयमाने किंवा त्यागाने समोरची व्यक्ती नक्की बदलेल, अशी अपेक्षा ठेवू नका. बदल घडण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःच्या वर्तनाची जाणीव होणं आणि बदलाची तयारी असणं आवश्यक आहे. आपण साथ देऊ शकतो पण दुसऱ्याच्या भावनिक परिपक्वतेची जबाबदारी आपली नाही. नाती टिकवताना स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपा.

 शेवटी, प्रत्येक स्वार्थी व्यक्ती नार्सिसिस्ट नसते आणि प्रत्येक नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती बदलू शकत नाही असेही नाही. मानसशास्त्राचा उद्देश माणसांना लेबल लावणे नाही, तर त्यांचे वर्तन समजून घेणे आणि त्यातून स्वतःसाठी आरोग्यदायी नाती निर्माण करणे हा आहे. 


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४