कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, की एखाद्या महिलेला अचानक वजन वाढणे, सतत थकवा जाणवणे, केस गळणे, मासिक पाळी अनियमित होणे किंवा मनःस्थितीत वारंवार बदल जाणवणे यामागे नेमके काय कारण असू शकते? अनेकदा हे बदल कामाचा ताण, धावपळीचे जीवन किंवा वाढते वय यांच्याशी जोडले जातात. मात्र, या लक्षणांमागे शरीरातील संप्रेरकांचे असंतुलनही एक महत्त्वाचे कारण असू शकते. आपल्या शरीरात सतत कार्यरत असणारी ही संप्रेरके जणू एका अदृश्य सूत्रधाराप्रमाणे शरीरातील अनेक क्रियांचे नियंत्रण करतात. स्त्रीच्या आयुष्यात तर पौगंडावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच स्त्रीच्या आरोग्याचा विचार करताना शरीरातील संप्रेरकांचे विश्व समजून घेणे आवश्यक ठरते.
संप्रेरके म्हणजे नेमके काय?
शरीरातील विविध ग्रंथींमधून तयार होणाऱ्या आणि रक्ताद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या रासायनिक संदेशवाहकांना संप्रेरके (हार्मोन्स) म्हणतात. मेंदूतील पीयूषिका ग्रंथी (पीट्युटरी ग्लॅंड), मानेतील अवटू ग्रंथी (थायरॉईड ग्लॅंड), अधिवृक्क ग्रंथी (ॲड्रेनल ग्लॅंड), स्वादुपिंड (पॅन्क्रिया) आणि स्त्रियांमधील अंडाशय या संप्रेरकनिर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. शरीराचे चयापचय, वाढ, झोप, भूक, रक्तातील साखरेचे प्रमाण, प्रजननक्षमता, हाडांचे आरोग्य आणि मानसिक स्थिती यांचे नियंत्रण या संप्रेरकांद्वारे केले जाते.
स्त्रियांच्या शरीरात संप्रेरकांचे महत्त्व
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात संप्रेरके महत्त्वाची असतात. मात्र स्त्रियांच्या शरीरात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारे नैसर्गिक संप्रेरकीय बदल अधिक ठळक असतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वाची संप्रेरके आहेत. याशिवाय थायरॉईड संप्रेरके, इन्सुलिन आणि इतर संप्रेरकेदेखील शरीराचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पौगंडावस्थेत मासिक पाळी सुरू होणे, प्रौढ वयात मासिक चक्राचे नियमन, गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक बदल आणि रजोनिवृत्तीच्या काळात होणारे शारीरिक बदल या सर्व प्रक्रियांमध्ये संप्रेरकांचा मोठा सहभाग असतो.
महिलांमध्ये आढळणारे प्रमुख संप्रेरकांशी संबंधित आजार
१. थायरॉईडचे विकार : महिलांमध्ये थायरॉईडचे विकार पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळतात. थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावल्यास वजन वाढणे, थकवा, बद्धकोष्ठता, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आणि मासिक पाळी अनियमित होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही महिलांमध्ये थायरॉईडचे कार्य अतिसक्रिय झाल्यास वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू शकते.
२. पीसीओएस : प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये आढळणारी ही एक महत्त्वाची संप्रेरक व चयापचयाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये अंडोत्सर्जन अनियमित होणे, पुरुषी संप्रेरकांचे प्रमाण वाढणे आणि काही महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध (रेझिस्टन्स) निर्माण होणे असे बदल दिसतात. अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर मुरुम, अतिरिक्त केसांची वाढ, वजन वाढणे आणि गर्भधारणेत अडचणी ही याची काही लक्षणे आहेत.
३. मधुमेह आणि इन्सुलिन प्रतिरोध : इन्सुलिन हे स्वादुपिंडातून तयार होणारे महत्त्वाचे संप्रेरक आहे. ते रक्तातील साखरेचे नियंत्रण करते. गर्भावस्थेत काही महिलांना गर्भावस्थेतील मधुमेह (जेस्टेशनल डायबेटिस) होऊ शकतो. अशा महिलांना पुढील आयुष्यात टाइप २ मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. पीसीओएस आणि रजोनिवृत्तीच्या काळातील चयापचयातील बदलदेखील इन्सुलिन प्रतिरोधावर परिणाम करू शकतात.
स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि संप्रेरकांमधील बदल
पौगंडावस्थेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढीमुळे शारीरिक बदल आणि मासिक पाळी सुरू होते. गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि इतर संप्रेरकांचे प्रमाण वाढते. प्रसूतीनंतर या संप्रेरकांच्या पातळीत मोठे बदल होतात. त्याचबरोबर स्तनपानासाठी आवश्यक असलेल्या प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन या संप्रेरकांची भूमिका महत्त्वाची असते.
रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्यामुळे गरम झटके येणे, रात्री घाम येणे, झोपेचा त्रास, मनःस्थितीत बदल, योनीमार्गात कोरडेपणा आणि हाडांची घनता कमी होणे असे बदल जाणवू शकतात. त्यामुळे या काळात हाडांचे आरोग्य आणि हृदयविकाराचा धोका यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी काय करावे?
संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन हे संप्रेरकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने, भाज्या, फळे, कडधान्ये, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असावा. नियमित चालणे, योगासने आणि स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम केल्याने वजन, इन्सुलिन संवेदनशीलता आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच तंबाखू आणि मद्यपान टाळणेही हितावह आहे.
मात्र, केवळ जीवनशैलीतील बदलांवर सर्व संप्रेरकविकार नियंत्रित होतीलच असे नाही. सतत थकवा, अनपेक्षित वजनबदल, मासिक पाळीतील अनियमितता, केसगळती किंवा इतर त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार थायरॉईड, रक्तातील साखर, संप्रेरकांच्या पातळ्या किंवा इतर तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात. स्वतःहून संप्रेरकांची औषधे किंवा पूरक आहार घेणे टाळावे.
स्त्रीचे आरोग्य हे केवळ प्रजननक्षमतेपुरते मर्यादित नसून तिच्या संपूर्ण आयुष्याशी जोडलेले आहे. संप्रेरकांमधील बदल समजून घेणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणे ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव ठेवून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे, हे प्रत्येक स्त्रीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.



