खरेदी म्हटलं की स्त्रियांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. मग ती साडी असो, ड्रेस असो, कुर्ती असो किंवा एखादी छोटीशी पर्स... दुकानाच्या काचेपलीकडे दिसणारा एखादा सुंदर ड्रेस मनात घर करून बसतो आणि मग तो मिळवण्यासाठी सुरू होतो एक अट्टहास. पण ही खरेदी म्हणजे काही साधी गोष्ट नसते. तो असतो एक वेगळाच चक्रव्यूह... त्यात एकदा शिरलं की बाहेर पडताना हातात पिशव्या, पर्स हलकी आणि मनात समाधानापेक्षा प्रश्नच जास्त असतात.
शॉपिंगला जायचं ठरलं की आधी कपाट उघडून पाहायचं. आपल्याकडे काय नाही, काय घ्यायचं आहे, कोणत्या रंगाची कमतरता आहे, याची मनात उजळणी होते. पण दुकानात गेल्यावर मात्र सगळे बेत मनात गुंडाळून ठेवले जातात. समोर दिसणारा गुलाबी ड्रेस आवडतो, पण साईज मिळत नाही. दुसरा छान दिसतो, पण त्याचा रंग मनासारखा नसतो. तिसऱ्याची साईज आणि रंग दोन्ही छान असतात, पण डिझाईन काही मनाला पटत नाही. शेवटी दुकानदाराला दहा वेळा वेगवेगळे कपड्यांचे प्रकार दाखवायला लावूनही आपण म्हणतो, "नाही हो, अजून काहीतरी वेगळं दाखवा!"
कधी कधी तर दुकानदाराच्या चेहऱ्यावरचे भावच सांगत असतात की आता यांना काय दाखवावं? पण आपलं शोधकार्य काही थांबत नाही. कारण आपल्याला फक्त कपडा विकत घ्यायचा नसतो, तर मनाला भावणारा, आपल्यावर खुलणारा आणि पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवणारा असा काही प्रकार हवा असतो.
साडी खरेदी तर त्याहून वेगळंच प्रकरण! साडीच्या दुकानात गेल्यावर रंगांची, पोतांची, नक्षींची अशी काही दुनिया समोर उलगडते की कोणती घ्यावी आणि कोणती ठेवावी हेच कळत नाही. एक साडी आवडते, दुसरी त्याहून सुंदर दिसते. तिसरीचा पदर मन मोहून टाकतो. शेवटी दोन-तीन साड्या घरी येतात. पण गंमत अशी की लग्नसमारंभ, सणवार किंवा एखादा खास कार्यक्रम आला की पुन्हा कपाट उघडून प्रश्न उभा राहतो, "नेसावं तरी काय?" मागच्या वेळी नेसलेली साडी पुन्हा नेसायची नाही आणि नवीन घेतलेली साडी अजून नेसायची संधीच मिळालेली नसते.
ड्रेस, साड्या, कुर्ता, लेगिंग्ज, दुपट्टे, ब्लाऊज, पर्सेस अशा सगळ्यांची कपाटात हजेरी लागलेली असते. कपाटाचं दार उघडताना एखादा ड्रेस बाहेर डोकावतो, तर दुसरीकडे साडीचा पदर अडकलेला असतो. कपडे इतके असतात की त्यांना ठेवायला जागा अपुरी पडते. मग सुरू होतं कपाट आवरण्याची मोहीम. नको असलेले कपडे वेगळे काढले जातात. पण एखादा ड्रेस हातात घेतला की आठवतं, "हा त्या वाढदिवसाला घेतला होता." दुसरी साडी पाहिली की वाटतं, "ही अजून एकदा तरी नेसायला हवी." तिसरा ड्रेस पाहिला की, "याचं मॅचिंग काहीतरी घेतलं तर छान दिसेल!" अशा आठवणींच्या आणि शक्यतांच्या गुंत्यात कपडे पुन्हा कपाटात जाऊन बसतात.
एवढं सगळं असूनही एखाद्या कार्यक्रमाला जायचं ठरलं की घरभर कपड्यांचा पसारा... एक ड्रेस घालून पाहायचा, दुसरा काढायचा. त्यावर कोणते कानातले घालायचे, कोणती बांगडी शोभेल, कोणती पर्स न्यायची, चपला कोणत्या घालायच्या, यात बराच वेळ होतो. आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहताना अचानक वाटतं, आज काहीतरी कमी आहे. मग पुन्हा कपाटाची उलथापालथ...
पुरुष मंडळींच्या दृष्टीने हा सगळा प्रकार म्हणजे निव्वळ वेळेचा आणि पैशांचा अपव्यय. त्यांना प्रश्न पडतो, "एवढे कपडे आहेत, तरी नवीन कशाला हवेत?" पण स्त्रियांच्या मनातल्या खरेदीच्या गणिताला साधं बेरीज-वजाबाकीचं सूत्र लागू होत नाही. प्रत्येक कपड्यामागे एक वेगळी भावना असते, एखादी आवड असते, स्वतःला सुंदर पाहण्याची इच्छा असते.
खरं तर स्त्रियांना केवळ कपडे खरेदी करायचे नसतात. त्यांना स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो. रोजच्या संसाराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून रंगांशी, सौंदर्याशी, आवडीशी थोडं नातं जोडायचं असतं. कधी स्वतःला खूश करायचं असतं, तर कधी मनातल्या हौसेला वाट मोकळी करून द्यायची असते.
पण तरीही एक प्रश्न कायम राहतोच... कपाट भरलेलं असताना मनासारखा ड्रेस का मिळत नाही? आणि मनासारखा ड्रेस मिळाला तर तो घालायला योग्य कारण का मिळत नाही? म्हणूनच स्त्रियांच्या कपाटात कपड्यांची गर्दी असते आणि मनात मात्र पुढच्या खरेदीची यादी तयार असते.कारण खरेदीचं चक्रव्यूह एकदा सुरू झालं की त्यातून बाहेर पडणं कठीणच. उद्या कुठे जायचं असेल तर आज पुन्हा एकदा बाजारात डोकावून येऊ, या विचारानेच या चक्रव्यूहाचं पुढचं आवर्तन सुरू होतं. आणि हो, कपाटात जागा नाही हे खरं असलं तरी मनात मात्र एका नव्या ड्रेससाठी जागा नेहमीच शिल्लक असते...

- सौ. मंजिरी वाटवे
पर्वरी , फोन नंबर: 8275383477


