जगातील प्रत्येक गोष्टीला नाव असते. नावातूनच तिची ओळख निर्माण होते. मुलांचे नाव ठेवतानाही आई-वडील अनेक विचार करतात. देवदेवतांची, फुलांची, कर्तृत्ववान व्यक्तींची नावे ठेवली जातात. प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलाने मोठे व्हावे, आयुष्यात काहीतरी साध्य करावे. याच विचारातून तिनेही आपल्या मुलाचे नाव ‘कृतार्थ’ ठेवले होते. पण या नावामागे केवळ एखादी अपेक्षा नव्हती, तर एका आईच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव दडला होता.
काहींना हे नाव उच्चारायला कठीण वाटले. काहींनी अर्थ विचारला, तर काहींनी गंमतीने विचारले, “पहिल्याच बाळाला कृतार्थ झालीस? आणखी नको का?” पण तिला माहीत होते की ती खरोखरच कृतार्थ झाली होती.
अत्यंत अज्ञानात असलेल्या तिच्यासारख्या मुलीला लग्न, संसार, मातृत्व या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती नव्याने शिकत होती. लग्नानंतर सात-आठ महिने झाले तरी मूल झाले नाही म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी नवऱ्यालाही सोबत आणायला सांगितले. मात्र हे घरी सांगण्याचे धाडस तिच्यात नव्हते. योगायोग असा की त्याच महिन्यात तिला दिवस गेले.
गर्भधारणेची कोणतीही विशेष माहिती नसल्यामुळे ती नेहमीप्रमाणे घरातील कामे करत होती. विहिरीवरून पाणी आणणेही सुरू होते. वाटेवर भेटणाऱ्या स्त्रिया तिला जड वस्तू उचलू नकोस, असे सांगत. चार महिन्यांनंतर डॉक्टरांकडे गेल्यावर तिला सरकारी दवाखान्यात नाव नोंदवण्याचा सल्ला मिळाला. तिथले डॉक्टर आणि परिचारिका तिला आपुलकीने समजावून सांगत. परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तिने सरकारी दवाखान्यातच उपचार घेण्याचे ठरवले.
सातव्या महिन्यात तिला खाणे-पिणेही जमत नव्हते. घरातून सहकार्य मिळण्याऐवजी बोलणीच ऐकावी लागत. एकदा डॉक्टरांच्या बोलण्याचा अर्थ न समजल्यामुळे ती घाबरून रडू लागली. तेव्हा परिचारिकेने समजावले, “बाय, रडू नको. भुरग्याखातीर किती तरी करचें पडता.” बाळाला काही झालेले नाही, हे समजल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिला माहेरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले.
नववा महिना सुरू झाला होता. एक मंगळवारची पहाट. चार वाजल्यापासून पोटात कळा येऊ लागल्या. तिने आईला उठवले. आईने बाळंतपणाची चाहूल ओळखली; पण तिला अजून महिना बाकी असल्याचा विश्वास होता. सकाळी घरात गाणे ऐकू येत होते. त्या गाण्याच्या गोड सुरांत ती रुग्णालयात पोहोचली. परिचारिकेने तिला धीर दिला.
दहा वाजता डॉक्टर आले. तपासणीनंतर प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली. वेदना असह्य होत्या. ऑक्सिजन, सलाईन आणि डॉक्टर-परिचारिकांची धावपळ सुरू झाली. अर्ध्या तासात बाळाचा जन्म झाला. मात्र तिचा त्रास संपला नव्हता. रक्तस्राव आणि इतर गुंतागुंतींमुळे पुन्हा डॉक्टरांना बोलवावे लागले. बाळाने गर्भातच शौच केले असल्यामुळे त्याचे काही अंश पोटात राहिले होते. तिची अवस्था पाहून माहेरच्या भावंडांना एकच वाटत होते, ‘आम्हाला बाळ नको, आमची बहीण सुखरूप हवी!’
सकाळी जन्मलेल्या बाळाला तिने संध्याकाळी पहिल्यांदा डोळे उघडून पाहिले. मृत्यूच्या दारातून परत आल्यासारखा अनुभव तिने घेतला होता. डॉक्टर, परिचारिका आणि आया यांच्या प्रयत्नांमुळे तिला नवे आयुष्य मिळाले होते. त्याच दिवशी तिला आईपणाचा खरा अर्थ उमगला. आई होणे म्हणजे केवळ बाळाला जन्म देणे नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्याने होणे!
म्हणूनच तिने मुलाचे नाव ‘कृतार्थ’ ठेवले. तिच्यासाठी तो केवळ मुलगा नव्हता, तर तिच्या पुनर्जन्माचा साक्षीदार होता.
आजही मुलगा हवा म्हणून अनेक स्त्रियांना वारंवार गर्भधारणा आणि प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा विचार किती जण करतात? मुलगा-मुलगी असा भेद न करता प्रत्येक बाळाचे स्वागत आनंदाने व्हायला हवे. केवळ जन्म देणे पुरेसे नाही, तर त्याचे योग्य संगोपन, शिक्षण आणि प्रेमाने वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
चार वर्षांनी पुन्हा मातृत्वाची चाहूल लागली तेव्हा तिने नवऱ्याला एकच विनंती केली होती, पहिल्या बाळंतपणाचा अनुभव प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या सोबत राहून घ्यायला हवा. स्त्रीला त्या काळात काय सहन करावे लागते, हे समजले तर कदाचित त्यालाही वाटेल, एकच मूल पुरे!
कारण आई कृतार्थ तेव्हाच होते, जेव्हा तिच्या मातृत्वाचा सन्मान होतो आणि तिच्या मुलाच्या जन्माचा आनंद संपूर्ण कुटुंबाला मनापासून होतो.

- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)


