नोकरी सांभाळून मच्छीमारी वारसा संवर्धन करणारा विराज

समाजमाध्यमांसह देशीविदेशी पर्यटकांना देतो प्रत्यक्ष मासेमारीचा अनुभव

Story: अजय लाड |
05th November, 11:24 pm
नोकरी सांभाळून मच्छीमारी वारसा संवर्धन करणारा विराज

गोवन वार्ता
मडगाव :
सरकारी नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी पारंपरिक मासेमारी वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम बेतुल येथील विराज मोटे करत आहेत. मित्रांच्या सहकार्याने त्यांनी सुरू केलेल्या ‘कोस्टल फिशिंग गोवा’ या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून मच्छीमारांची कौशल्य, पारंपरिक पद्धती, किनारपट्टीवरील जीवनशैलीची ओळख देश-विदेशातील पर्यटकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे करून देण्याचे काम करणारा विराज हा खरा अ‍ॅम्बेसिडर बनत आहे.
गोव्याची पारंपरिक मासेमारी संस्कृती आणि पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्या चालत आलेली मच्छीमारीची कौशल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने विराज यांनी हा उपक्रम सुरू केला. आजची युवा पिढी पारंपरिक मासेमारी व्यवसायापासून दूर जात असल्याने हे ज्ञान आणि कौशल्य कालांतराने लुप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वारशाचे जतन व्हावे आणि त्याची ओळख जगभरातील लोकांना व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम व्यावसायिक नफ्यासाठी नसून पारंपरिक संस्कृती जपण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. यातून पर्यटनालाही हातभार लागत आहे.
कोस्टल फिशिंग गोवाच्या माध्यमातून गोव्यातील पारंपरिक मासेमारीच्या विविध पद्धतींची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखवली जातात. यामध्ये काटाळे मारून मासे पकडणे, खेकडे पकडण्याचे कौशल्य, नदी आणि खाडीच्या पाण्यात पागेर म्हणजेच हाताने जाळे फेकून मासेमारी करणे, तसेच पारंपरिक गळ टाकून मासे पकडणे यांचा समावेश आहे.
याशिवाय खाडीच्या पाण्यात उतरून चिखलातून खेकडे आणि खुबे गोळा करणे, खडकांवरून कालवे काढणे अशा पारंपरिक कौशल्यांचीही ओळख करून दिली जाते. या माध्यमातून पर्यटकांना केवळ मासेमारीचे तंत्र शिकायला मिळत नाही, तर स्थानिक मच्छीमारांचे जीवन आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नातेही अनुभवता येते.
विराज मोटे हे केपे येथे रजिस्ट्रेशन कार्यालयात सरकारी सेवेत कार्यरत आहेत. नोकरीच्या जबाबदार्‍यांमधून वेळ मिळाल्यावर आणि विशेषतः सुट्टीच्या दिवशी ते बेतुल जेटी परिसरात पर्यटकांसाठी पारंपरिक मासेमारीची सत्रे घेतात. या उपक्रमात त्यांच्या मित्रांचेही सहकार्य लाभते. विराज उपलब्ध नसताना त्याचे मित्र समाजमाध्यमांवरील पेजचे व्यवस्थापन करतात, तर मासेमारीच्या प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण करण्यासाठीही ते सोबत असतात.


विविध हॉटेल्सच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बेतुल येथे येतात. स्थानिक मच्छिमारांसोबत प्रत्यक्ष पाण्यात उतरून जाळे फेकणे, मासेमारीची पारंपरिक तंत्रे शिकणे आणि खाडीतील मासेमारीचा अनुभव घेणे, अशी संधी पर्यटकांना मिळते. या उपक्रमाला पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मोटे यांनी सांगितले. गोव्याची मासेमारी संस्कृती हा केवळ व्यवसाय नसून राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सरकारी नोकरी सांभाळून स्वतःच्या वेळेत या वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करणार्‍या विराज मोटे यांचा उपक्रम त्यामुळे वेगळेपण जपणारा ठरत आहे. देशीविदेशी पर्यटकांना मासेमारी व्यवसायातील अडचणींची जाणीव करून देत त्याचा अनुभव घेता येत असल्याने या उपक्रमाला भविष्यातही मोठा वाव आहे.
पारंपरिक वारशातून पर्यटनाच्या नव्या संधी
समुद्र आणि मासेमारी क्षेत्रात मोठी क्षमता आहे. पारंपरिक मासेमारीचे ज्ञान आणि कौशल्य अभिमानाने पुढे नेण्याची गरज आहे. या वारशाला पर्यटनाची जोड दिल्यास स्थानिक मच्छीमारांसाठीही नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असा विश्वास विराज मोटे यांनी व्यक्त केला आहे.      

हेही वाचा
सर्व पहा