आंतरलिंगी व्यक्तींना आदराची गरज का?

आंतरलिंगी व्यक्ती ही निसर्गाची कोणतीही चूक नसून ती मानवी विविधतेचाच एक सुंदर भाग आहे. आता गरज आहे ती पूर्वाग्रहांऐवजी आदराची, लपवाछपवीऐवजी आधाराची आणि निःशब्दतेऐवजी समजुतीची हातमिळवणी करण्याची!

Story: मन गोवेकरांचे |
31st October, 11:59 pm
आंतरलिंगी व्यक्तींना  आदराची गरज का?

निसर्गाने मानवी शरीराची रचना केवळ दोन चौकटींतच म्हणजेच स्त्री किंवा पुरुष बांधलेली नाही. परंतु, आपली समाजव्यवस्था आजही मानवी शरीराचा स्वीकार या दोनच ढोबळ टप्प्यांत करते. या चौकटीत न बसणाऱ्या ‘आंतरलिंगी’ व्यक्ती आजही आपल्याच समाजात उपेक्षेचे व कुचेष्टेचे धनी ठरतात. नुकताच २६ ऑक्टोबर रोजी ‘आंतरलिंगी जागृती दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने या घटकाविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

निसर्गाची एक नैसर्गिक विविधता ‘आंतरलिंगी’ ही कोणतीही शिक्षा, शाप किंवा नैतिक दोष नसून मानवी विकासाची एक नैसर्गिक विविधता आहे. लिंग विकासाची प्रक्रिया गुणसूत्रे आणि संप्रेरके यांच्यावर आधारित असते. जेव्हा यात काही नैसर्गिक फरक किंवा विविधता निर्माण होते, तेव्हा जन्मतःच किंवा वयात आल्यावर बालकांच्या शारीरिक लक्षणांमध्ये पारंपरिक स्त्री किंवा पुरुष या व्याख्येत न बसणारे बदल दिसून येतात. जागतिक पातळीवर सुमारे ०.०५ ते १.७ टक्के लोक हे आंतरलिंगी गुणसूत्रांसह किंवा लक्षणांसह जन्माला येतात असा अंदाज आहे. भारतात यावर कोणतीही ठोस अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ही संख्या बरीच मोठी असणार हे नक्की. मात्र, माहितीच्या अभावामुळे अनेक कुटुंबे ही बाब लपवून ठेवतात आणि ही मुले आयुष्यभर एकटेपणा व मानसोपचारांच्या विळख्यात जगतात.

सहानुभूतीच्या नावाखाली होणारा अन्याय शतकानुशतके या व्यक्तींना केवळ एक ‘कुतूहल’ किंवा ‘समस्या’ मानले गेले. समाजात निर्माण होणारी भीती आणि लाज यामुळे अनेकदा पालकांवर दबाव आणून बालपणाताच कोणतीही पूर्वसंमती न घेता शस्त्रक्रिया केल्या जातात. हे सर्व मुलांच्या संरक्षणासाठी केले जात असल्याचे भासवले जात असले, तरी बऱ्याचदा ती काळजी नसून पूर्वापार चालत आलेला पूर्वग्रह असतो. यामुळे या व्यक्तींना नैराश्य, चिंता, सामाजिक बहिष्कार आणि न्यूनगंडाचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, अपुऱ्या माहितीमुळे गोंधळलेले पालकही प्रचंड मानसिक तणावाखाली जगतात.

आंतरलिंगी आणि ट्रान्सजेंडरमधील फरक अनेकदा लोकांचा असा गैरसमज होतो की ‘आंतरलिंगी’ आणि ‘ट्रान्सजेंडर’ दोन्ही एकच आहे. पण यात मोठा फरक आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींची लिंग ओळख त्यांच्या जन्माच्या वेळी ठरवलेल्या लिंगापेक्षा भिन्न असते, तर आंतरलिंगी व्यक्तींच्या शरीराची रचना किंवा शारीरिक गुणधर्मच नैसर्गिकरीत्या वेगळे असतात. भारतात ‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ अंतर्गत आंतरलिंगी व्यक्तींनाही कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. या कायद्यानुसार शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सार्वजनिक सेवांमध्ये भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे. परंतु, केवळ कागदावर कायदे असण्याने लोकांची मानसिकता बदलत नाही. जोपर्यंत समाजाची भीती आणि अज्ञान संपत नाही, तोपर्यंत कायद्याचे खरे चीज होणार नाही.

आपली जबाबदारी आणि उपाययोजना या स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे:

रुग्णालय आणि वैद्यकीय नियम: बालकांच्या आरोग्याला, भविष्यातील संमतीला आणि दीर्घकालीन कल्याणाला केंद्रस्थानी ठेवणारे वैद्यकीय नियम तयार करायला हवेत.

पालकांसाठी समुपदेशन: पालकांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून भीतीपोटी ते कोणताही लपवाछपवीचा मार्ग स्वीकारणार नाहीत.

व्यावहारिक सर्वसमावेशकता: विशेषतः आपल्या गोव्यातल्या शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांनी गोपनीय आधार प्रणाली, सुयोग्य नोंदी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक वातावरण निर्माण केले पाहिजे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, आंतरलिंगी व्यक्ती ही निसर्गाची कोणतीही चूक नसून ती मानवी विविधतेचाच एक सुंदर भाग आहे. आता गरज आहे ती पूर्वाग्रहांऐवजी आदराची, लपवाछपवीऐवजी आधाराची आणि निःशब्दतेऐवजी समजुतीची हातमिळवणी करण्याची!