मॉर्निंग वॉक - चालणारे कमी, नमुने जास्त!

मॉर्निंग वॉक म्हणजे फक्त आरोग्यासाठी चालणं नव्हे, तर माणसांच्या स्वभावांचे भन्नाट नमुने पाहण्याची पर्वणीच! चला, भेटूया या पहाटेच्या रंगमंचावरील काही मजेशीर अवलियांना!

Story: मिश्किली |
31st October, 11:45 pm
मॉर्निंग  वॉक - चालणारे कमी,  नमुने जास्त!

मॉर्निंग वॉक हे एक वेगळंच जग आहे. पहाटेच्या अंधारात इथे माणसं चालायला बाहेर पडतात; पण प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे आजार, अहंकार, अपेक्षा आणि गैरसमज असतात! कुणाला डॉक्टरांनी घाबरवलेलं असतं, कुणाला जगाला आपला फिटनेस दाखवायचा असतो, तर कुणाला दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायचं असतं. सकाळची वेळ शांत आणि प्रसन्न असते, असं म्हणतात. पण मॉर्निंग वॉकला गेल्यावर समजते की हा भ्रम आहे. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून इथे एक वेगळंच महायुद्ध रंगतं. कुणी स्टेप्स मोजत असतं, कुणी दुसऱ्यांच्या आयुष्याचा हिशेब मांडत असतं, तर कुणी राजकारण सुधारत असतं. मॉर्निंग वॉक म्हणजे आपल्या समाजातील निरनिराळ्या नमुन्यांची एक लाइव्ह सर्कसच! फरक एवढाच की सर्कसमध्ये विदूषकांना पाहण्यासाठी तिकीट काढावं लागतं; इथे ते मोफत भेटतात. प्रत्येकाला वाटतं, आपण काहीतरी विशेष करतोय आणि आपल्याइतकं शहाणं जगात दुसरं कुणीच नाही. काही लोक मॉर्निंग वॉक करता करता इतके दूर निघून जातात की परत येण्यासाठी त्यांना रिक्षा करावी लागते. काहीजण प्रत्येक दोन मिनिटांनी थांबतात! थोडं चालायचं, मग थांबायचं; पुन्हा दोन पावलं टाकायची आणि मग बाक शोधायचा. अशा मंडळींनी शक्यतो नियमित आणि वेगाने चालणाऱ्यांसोबत चालणं टाळावं. मॉर्निंग वॉकच्या या रंगमंचावर भेटणाऱ्या काही अफलातून नमुन्यांची ओळख करून घेऊया!

जबरदस्ती वॉक : शरीर बाहेर, आत्मा अजून बेडवर!

या लोकांना सकाळी उठण्यापेक्षा आयुष्यातली कोणतीही दुसरी शिक्षा परवडेल. पण डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवून घाबरवलेलं असतं आणि बायकोने स्पष्ट बजावलेलं असतं, “आता स्वतःच्या तब्येतीची जबाबदारी स्वतः घ्या!” मग हे लोक नाइलाजाने नाइटड्रेसमध्ये, विस्कटलेल्या केसांत आणि चेहऱ्यावर आयुष्य संपल्याचा भाव घेऊन बाहेर पडतात. यांच्या डोळ्यांत झोपेच्या आठवणी असतात, शरीरात भूताने प्रवेश केलेला असतो आणि पावलांत तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्याइतकाही उत्साह नसतो. यांचा वॉक किती किलोमीटरचा आहे, यापेक्षा डॉक्टरांनी आणखी किती वर्षं जगण्याची शक्यता सांगितली आहे, यावर यांचा उत्साह अवलंबून असतो.

पहाटे उठण्याचा राष्ट्रीय पुरस्कार!

या लोकांना पहाटे जाग येते आणि ते पुन्हा झोपत नाहीत. घरातील बाकी मंडळी साखरझोपेत असताना यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेजोमय अभिमान असतो -“मी अलार्मशिवाय पाच वाजता उठू शकतो, म्हणजे जगात काहीही करू शकतो!” सूर्योदयापूर्वी उठल्याचा अभिमान मात्र सातव्या आसमानावर असतो. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सूर्यालाही न्यूनगंड यावा. जणू जगातल्या सर्व समस्या यांनी पहाटे पाच वाजता उठून सोडवल्या आहेत. सकाळी पाच वाजता यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस झळकतं - “Early to bed, early to rise, makes a man healthy, wealthy and wise!” त्यानंतर लगेच सूर्योदयाचा फोटो. हे दुसऱ्यांनाही लवकर उठण्याचे सल्ले देतात. पण समोरचा जेठालाल असेल, तर तुम्ही कितीही चंपक चाचा बना, काही उपयोग नाही. यांच्यामुळे उशिरा उठणाऱ्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल अपराधी वाटायला लागतं. स्वतःचा दिनक्रम म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य आणि बाकीचे सगळे लोक म्हणजे आळशी, बेजबाबदार व देशाच्या प्रगतीतले अडथळे, असा यांचा ठाम समज असतो. पहाटेच्या शांततेत हे कुत्र्या-मांजरांपासून कावळ्यांपर्यंत सगळ्यांना जागं करत फिरतात. कोंबड्यालाही यांना पाहून आठवतं की आपल्याला आरवायचं आहे. काही जण अंधारातच वेगवेगळी आसनं आणि शारीरिक कसरती करतात.

गप्पामारू

या मंडळींच्या मते मॉर्निंग वॉक म्हणजे चालण्याची जागा नसून चालतं-फिरतं व्यासपीठ आहे. तीन-चार जणांचा ग्रुप तयार झाला की रस्ता त्यांच्या मालकीचा होतो. चालण्याचा वेग कासवापेक्षा कमी आणि चर्चेचा वेग सोशल मीडियापेक्षाही जास्त! या वर्गात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश असतो. कुणी काय घातलं, कुणी काय केलं, कुणाची सून कुठे गेली, कुणाच्या नवऱ्याचा पगार किती, कुणाचं लग्न कसं चाललंय - जगातल्या प्रत्येक गोष्टीचा तपशील यांच्या चर्चेत असतो. स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय, यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय, याची काळजी यांना अधिक असते. यांच्या चर्चेत एखाद्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली तरी हरकत नाही; फक्त सकाळचा वेळ मजेत गेला पाहिजे. एखादी व्यक्ती गैरहजर असेल, तर तिच्या अनुपस्थितीत तिच्या आयुष्याची हजेरी घेतली जाते. तेव्हा समजतं की, “जेव्हा तुम्ही टेबलावर नसता, तेव्हा तुम्ही मेनूमध्ये असता!” यांना गप्पा मारण्यासाठी विषय लागत नाहीत. एक विषय संपला की दुसऱ्याच्या चारित्र्याची फाइल उघडते. एखाद्याने नवीन गाडी घेतली, तर पैशांचा स्रोत तपासला जातो. कुणी वजन कमी केलं, तर आजाराचा संशय घेतला जातो. कुणी हसतमुख दिसलं, तर त्याच्या आनंदामागचं गुपित शोधलं जातं. यांचा वॉक संपतो; पण गप्पांना ब्रेक लागत नाही. घरात गेल्यावर याच मंडळींच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर सुविचार झळकतो - “Never judge anyone without knowing the whole story.”

फिटनेस फ्रिक :

मनगटावर स्मार्टवॉच, कानांत एअरपॉड्स, पायांत महागडे शूज आणि डोक्यात एकच विचार - आज किती लोकांना आपला फिटनेस दाखवता येईल? हे चालताना रस्त्याकडे कमी आणि घड्याळाकडे जास्त पाहतात. किती स्टेप्स झाल्या, किती कॅलरीज जळल्या, किती किलोमीटर झाले या आकड्यांवरून स्वतःच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवतात. जणू हे त्यांचं शरीर नसून एखाद्या कंपनीचं प्रोजेक्ट आहे आणि रोजचा फिटनेस रिपोर्ट मॅनेजरला सादर करायचा आहे. पाच किलोमीटर धावले की स्टेटस तयार. फोटो व संगीत असे की देशासाठी एखादं मोठं युद्ध जिंकूनच परतले आहेत. खाली कॅप्शन - “Discipline is everything!” यांच्यासाठी फिटनेस म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याइतकाच सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करण्याचा व्यवसाय असतो. ज्या दिवशी कुणी यांच्या स्टेटसला लाइक देत नाही, त्या दिवशी यांचा हार्ट रेट स्मार्टवॉचपेक्षा जास्त असतो. काही जण मध्येच बॉक्सिंग किंवा शीर्षासन करून आसपासच्या मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यांचं लक्ष प्रोटीन शेकवर जास्त असतं. वजनात तीनशे ग्रॅमचा फरक पडला तरी चिंता सुरू होते. वजन वाढलं तर मूड खराब, कमी झालं तर उत्साह दुप्पट. जणू शरीरातील चरबी नव्हे, तर शेअर बाजारातील निर्देशांक रोज वर-खाली होत असतो. यातले काही जण प्रत्यक्षात शरीरापेक्षा मोबाईलचाच अधिक व्यायाम करतात. सूर्य उगवला की फोटो, झाडं दिसली की फोटो, थोडा दम लागला की फोटो आणि शेवटी कॅप्शन - “Morning well spent!” यात काही New Year Resolution वाले पण असतात. “My goal for this year is not to become more गोल!!” जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे अगदी नियमित वॉकला येतात. नवीन शूज, नवा ट्रॅकसूट, स्मार्टवॉच आणि चेहऱ्यावर फिटनेसचा जबरदस्त निर्धार! पण जानेवारी संपेपर्यंत शूज कपाटात, ट्रॅकसूट हँगरवर आणि स्मार्टवॉच बॅटरी संपून पडलेलं असतं. रोज जाणाऱ्यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीला जाऊ नये, रिजोल्यूशन वाल्यांची गर्दी जी असते.

सिनियर सिटिझन

या लोकांनी आयुष्यभर धावपळ केलेली असते. आता चालण्याचा वेग कमी झाला असला, तरी उपदेशाचा वेग अजूनही एक्सप्रेस असतो. थोडं चालायचं, बाकावर बसायचं आणि मग आजच्या पिढीचा उद्धार करायचा. “आमच्या वेळी मोबाईल नव्हते. आम्ही आई-वडिलांचा आदर करायचो. आजकालच्या मुलांना काही कळत नाही. आम्ही तर रोज चालत शाळेत जायचो!” यांच्या आठवणींचं वैशिष्ट्य असं की भूतकाळात सगळं चांगलं होतं आणि वर्तमानात सगळंच बिघडलंय. त्यांच्या काळात लोक साधे होते, नाती घट्ट होती, अन्न शुद्ध होतं आणि माणसांत माणुसकी होती. फक्त त्या सुवर्णकाळातही काही समस्या असतील, हे त्यांच्या आठवणींच्या संग्रहालयात उपलब्ध नसतं. विशेषतः मुलं परदेशात असतील, पेन्शन नियमित मिळत असेल आणि स्वतःची तब्येत व्यवस्थित असेल, तर जीवनाचं तत्त्वज्ञान आणखीच खुलतं. तरुण पिढीने शिस्त पाळली, मोबाईल बाजूला ठेवला आणि मोठ्यांचं ऐकलं, तर जगातल्या सगळ्या समस्या सुटतील, अशी यांची खात्री असते. घरखर्च, नोकरीची असुरक्षितता, गृहकर्ज, शिक्षणाचा वाढता खर्च आणि भविष्याची अनिश्चितता यांचं गणित मात्र यांच्या सल्ल्यात नसतं. कारण ज्यांच्या डोक्यावरचं छप्पर सुरक्षित आहे, त्यांना दुसऱ्यांच्या डोक्यावरचं आभाळ किती महाग झालंय, हे समजावून सांगावं लागत नाही. हे अविवाहित तरुणांना पाहिलं की लग्नाचा विषय काढतात - “आता तुझा नंबर आहे. वय निघून जातंय. वेळेत लग्न कर!” मग हेच लोक स्मशानभूमीत सापडले तर युवा त्यांना म्हणतात, “काका, आता तुमचा नंबर, तो तुमच्या आधी गेला बघा!” मग त्यांना या वाक्यावरून लेक्चर मिळतं.

मॉर्निंग वॉकच्या या रंगमंचावर अजूनही काही नमुने बाकी आहेत... ते पाहूयात पुढच्या रविवारी!