प्रॉन्स कोळीवाडा

Story: चमचमीत रविवार |
31st October, 11:48 pm
प्रॉन्स कोळीवाडा

साहित्य

पहिल्या मॅरिनेशनसाठी
कोळंबी – ५०० ग्रॅम
मीठ – चवीनुसार
हळद – १/४ टीस्पून
लिंबाचा रस – १ टेबलस्पून
वाटणासाठी
ताजी कोथिंबीर – एक छोटी मूठ
लसूण – १० ते १२ पाकळ्या
आले – अर्धा इंच
हिरव्या मिरच्या – ३
पाणी – आवश्यकतेनुसार
मसाला आणि तळण्यासाठी
काश्मिरी लाल तिखट – १.५ टेबलस्पून
तिखट – १ टेबलस्पून
धणेपूड – १ टेबलस्पून
गरम मसाला – १/२ टीस्पून
जिरेपूड – १/२ टीस्पून
काळे मीठ – १/२ टीस्पून
काळी मिरी पूड – १/४ टीस्पून
आमचूर पावडर – १/२ टीस्पून
चाट मसाला – १/२ टीस्पून
हिंग – चिमूटभर
लिंबाचा रस – १ टीस्पून
तेल – १ टेबलस्पून
अंड्याचा पांढरा भाग – १
बारीक बेसन – ३ टेबलस्पून
कॉर्नफ्लोअर – ४ टेबलस्पून

कृती

एका भांड्यात कोळंबी घेऊन त्यात मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा. कोळंबी १५ मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा.

तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा.

कोळंबी मॅरिनेट झाल्यावर त्यात तयार केलेले वाटण आणि सर्व मसाले घाला. त्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करा, जेणेकरून कोळंबीला मसाल्याचा छान थर लागेल. आता त्यात अंड्याचा पांढरा भाग, बेसन आणि कॉर्नफ्लोअर घालून चांगले एकजीव करा. तळण्यासाठी कोळंबी तयार आहे.

कढईत तेल गरम करा. तेलाचे तापमान साधारण १७० अंश सेल्सिअस असावे. कोळंबी थोडी थोडी करून तेलात सोडा. ती हलकी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर चाळणीत काढून ५ मिनिटे बाजूला ठेवा. आता गॅसची आच मोठी करून तेल पुन्हा थोडे अधिक गरम करा. ५ मिनिटे ठेवलेली कोळंबी पुन्हा गरम तेलात सोडून थोडा वेळ तळा. ती कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तळलेली कोळंबी चाळणीत काढा, म्हणजे अतिरिक्त तेल निथळून जाईल.

गरमागरम कुरकुरीत प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे! त्यावर थोडे चाट मसाला किंवा चिरलेली कोथिंबीर भुरभुरून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.