‘गुनाहों का देवता’: वेध प्रेमछटांचा

प्रेम म्हणजे भौतिकवादी किंवा केवळ शरीर संबंध असे वाटणाऱ्या आजच्या तरुणाईला ही कादंबरी केवळ कल्पनारम्य आहे, असू वाटूच शकते परंतु प्रेम हा विषय मूळात किती खोल असू शकतो, याचा अंदाज घ्यायचा असेल तर या कादंबरीचा मुद्दाम आस्वाद घ्यावा.

Story: बुकशेल्फ |
31st October, 11:51 pm
‘गुनाहों का देवता’:  वेध प्रेमछटांचा

हिंदी साहित्यातील प्रसिध्द कादंबरीकार धर्मवीर भारती यांची १९४९ साली प्रकाशित झालेली ‘गुनाहों का देवता’ ही लोकप्रिय कादंबरी प्रकाशनाच्या ७७ वर्षांनंतर यंदा म्हणजे २०२६ साली माझ्या हाती आली. विशेष म्हणजे, गोवा विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात विशेष अध्ययन म्हणून या कादंबरीचा समावेश असल्याचे समजले आणि वाचण्याची उत्सुकता अधिकच वाढली. मी वाचलेली ही पहिलीच हिंदी कादंबरी असल्याने अर्थात् माझ्या मनात हिंदी साहित्याबद्दल ओढ निर्माण करण्याचे कार्य या कादंबरीने केले, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. इंस्टाग्रामवर वारंवार येणाऱ्या रील्समुळे मी या कादंबरीकडे वळले. वरवर पाहता कुठल्याही सामान्य प्रेमकहाणीसारखीच हीदेखील असेल असा माझा अंदाज होता परंतू वाचून पूर्ण झाल्यावर प्रेमाबद्दलचा माझा एकूण दृष्टिकोणच या कादंबरीने बदलून टाकला.

चंदर आणि सुधा या प्रमुख दोन पात्रांना धरून कादंबरीच्या कथानकाला सुरूवात होते. या दोघांमधील नाते नक्की काय? असा प्रश्न वाचकाला सुरूवातीला पडतो परंतू जसजसे कथानक पुढे सरकते, तसतसे त्या दोघांमधील सखोल नात्याचे बंध वाचकांसमोर उलगडत जातात आणि काही नाती निनावी असू शकतात, हे पटू लागते. सुधाच्या वडिलांचा शिष्य असलेला उच्च शिक्षित चंदर सुधाच्या आयुष्यात तिचा मार्गदर्शक, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या अशी भूमिका बजावतो. नकळतपणे ते दोघेही एकमेकांचे व्यक्तित्त्व घडवतात आणि वरवर केवळ मैत्रीसारखे भासणारे हे नाते किती सखोल आणि गंभीर आहे याची त्या दोघांना कल्पनादेखील नसते.

जेव्हा सुधाचे लग्न ठरते त्यावेळी दोघांनाही आपापल्या मनातील भावनांची जाणीव होते. तत्कालीन समाजमान्य जातिव्यवस्थेचे बळी म्हणून हे दोन निष्पाप जीव एकमेकांवर जिवापाड निस्वार्थ प्रेम करत असूनदेखील एकत्र येण्याचा साधा विचारही करू शकत नाहीत आणि हसत-खेळत सरकणारे कथानक गंभीर आणि दुःखी असे वळण घेते. सुधाच्या वडिलांचा चंदरवर असलेला प्रचंड विश्वास चंदरला अधिक कठोर बनवतो आणि केवळ त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून चंदर सुधाला आपल्या प्रेमाचा त्याग करायला भाग पाडतो. चंदर आणि सुधा यांना धरून सुधाची आत्ते बहीण बिनती, सुधाची जीवलग मैत्रीण गेसू, चंदरची मैत्रीण पम्मी, तिचा भाऊ बर्टी अशा विविध व्यक्तिरेखा आणि प्रेमाविषयी त्यांचे विविध दृष्टिकोण आणि अनुभव या कथानकात प्रवेश करतात. धर्मानुसार बदलणारे प्रेम आणि विवाहाचे विविध कंगोरे त्यांच्या माध्यमातून उलगडतात आणि नकळतपणे वाचकासाठी प्रेमाच्या व्याख्या बदलत जातात.

कथानकाच्या सुरूवातीला आदर्श वाटणारा चंदर हळू-हळू बदलत जातो. ज्या प्रेमाने त्याला नकळतपणे घडवलं, तेच प्रेम त्याच्यापासून भौतिकरित्या दूर गेल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वात असुरी बदल जाणवू लागतात. तो विचलित मनःस्थितीत असताना पम्मी ही त्याची घटस्फोटित इसाई मैत्रीण त्याच्याशी शारीरिक जवळीक साधते आणि संभोग म्हणजेच प्रेम अशी त्याची भावना होते. त्याचे आयुष्य दिशाहीन बनते आणि कथानकात देखील भयाणता जाणवते. प्रेमासारखी सुंदर भावना संस्कारक्षम, सकारात्मकतेबरोबरच नकारात्मक आणि विनाशक कशी असू शकते, याचा प्रत्यय वाचकाला येतो. कठोर नियतीच्या जाळ्यात अडकलेल्या चंदरच्या वेदना वाचकाला देखील असह्य करतात. 

लिंग, अनुभवविश्व आणि कालपरत्वे प्रेमाच्या व्याख्या कशा बदलू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गुनाहों का देवता’. प्रेम म्हणजे निस्वार्थ त्याग, आयुष्यातील संघर्षातून तावून सुलाखून निघाल्यानंतर व्यक्तीला उजळवते ते खरे तेज आणि त्या संघर्षासाठी व्यक्तीला जे सक्षम करते, तेच खरे प्रेम, असा संदेश आशयातून व्यक्त होतो.

कादंबरीच्या कथानकाचे तीन भागात विभाजन करता येते. पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात चंदर आणि सुधाला एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची जाणीवच नसते. खेळकर अशा वातावरणाची अनुभूती या भागात येते. मध्यात त्यांना प्रेमाची जाणीव होते आणि सुधाचे लग्न झाल्यामुळे त्यांची ताटातूट होते. चंदरच्या व्यक्तिमत्त्वात नकारात्मक बदल घडतात आणि कथानक भयाण आणि शोकपूर्ण असे वळण घेते आणि शेवटी उत्तरार्धात आशावाद दिसतो जिथे चंदर पूर्वपदावर येतो. आता सुखान्त होणार असे वाचकाला वाटू लागते, तितक्यात कादंबरीचा धक्कादायक असा शेवट होतो.

कादंबरीचा शेवट अत्यंत अनपेक्षित आणि भावनिक आहे. शेवटच्या काही पानांमध्ये लेखक वाचकाला खोल अंतर्मुख करून सोडतो. विस्तृत वर्णनांनी परिपूर्ण अशा या कादंबरीचा शेवट खूपच जलद वाटतो. कादंबरीची मांडणी इतकी प्रगल्भ आणि सखोलरित्या झाली आहे की वाचकाचे अनुभवविश्व आणि संवेदनशीलतेनुसार कथानकाचे आणि आशयाचे भिन्न अर्थ निघू शकतात.

आदर्शवादी नायक चंदर हा सुधासाठी देवापेक्षा कमी नसतो. ती मनोमन त्याची पूजा करते. तोच चंदर विविध कारणांमुळे खूप कठोर बनतो. आपल्या आयुष्यातील माणसांना वेदना देतो आणि त्यामुळेच ‘गुनाहों का देवता’ हे अनोखे आणि सर्जनशील असे शीर्षक चपखलपणे या कादंबरीच्या बाबतीत लागू पडते.

कादंबरीत तत्कालीन भारतीय समाजव्यवस्था, विवाहसंस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते. काही ठिकाणी लेखक पारंपरिक हिंदू जीवनमूल्यांकडे सहानुभूतीने पाहताना जाणवतात.

प्रेम म्हणजे भौतिकवादी किंवा केवळ शरीर संबंध असे वाटणाऱ्या आजच्या तरूणाईला ही कादंबरी केवळ कल्पनारम्य आहे, असू वाटूच शकते परंतू प्रेम हा विषय मूळात किती खोल असू शकतो, याचा अंदाज घ्यायचा असेल तर या कादंबरीचा मुद्दाम आस्वाद घ्यावा. ही कादंबरी प्रेमाच्या अशा स्वरूपाचा शोध घेते, जे केवळ शारीरिक आकर्षणापलीकडे जाऊन त्याग, समर्पण आणि आत्मिक नात्याशी जोडलेले आहे. 

  पुस्तकाचे नाव – ‘गुनाहों का देवता’

  लेखक – धर्मवीर भारती